आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr Sangita Deshpande Article About Fasts During Navratri

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरात्रातील उपवास कसे कराल ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू सणवारांमध्ये नवरात्राला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. नऊ दिवस दुर्गामातेची पूजा व उपवास या पद्धतीने हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. नवरात्रातील उपवास हा देवीसाठी केलेल्या त्यागाचा छोटासा भाग. हे उपवास म्हणजे शरीर, मन व आत्मा यांच्या आरोग्यासाठी एक पर्वणीच होय. या उपवासामध्ये दैनंदिन जीवनशैलीमधून बाहेर पडून मनाला व शरीराला जास्तीत जास्त आरोग्यसंपन्न करण्याचा हा एक प्रयत्न असतो. हे उपवास म्हणजे खराब किंवा पापावर चांगल्या गोष्टींचा विजय. हे उपवास फक्त खाण्याचे उपवास नसावेत म्हणजे शरीराची व मनाची योग्य प्रकारे आरोग्याकडे वाटचाल होऊ शकते.
श्रावण, भाद्रपदातील इतर उपवास व नवरात्रातील उपवास यामध्ये फरक आहे. नवरात्रातील उपवास हा स्वार्थ व परमार्थ यासाठीचा प्रदीर्घ त्याग आहे. मात्र हे उपवास अत्यंत चुकीच्या पद्धतीने केले जातात.

नवरात्रामध्ये सद्वृत्तीच्या पालनाला असाधारण महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार या सद्वृत्ती पालन करणा-या व्यक्तीमध्ये कुठले ही शारीरिक किंवा मानसिक विकार लवकर होत नाहीत.
नवरात्रातील या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये अल्पश: लंघन हा प्रकार अभिप्रेत आहे. पचण्यास अत्यंत हलके अन्न, फक्त जल किंवा विविध पेय पदार्थांचे ग्रहण. अन्न भाजून सेवन करणे ज्यास आपण दशमी म्हणतो, किंवा फलाहार घेणे हे अभिप्रेत आहे. बहुतांश लोक नवरात्रात नियमित स्वरूपात शेंगादाणे, साबुदाणा, बटाट्याचे पदार्थ, तळीव पापड्या, दुधाचे गोड पदार्थ यांचे दोन्ही वेळेस व नऊ दिवस सेवन करतात. यामुळे शरीरावर व मनावर जो परिणाम होणे अपेक्षित आहे तो परिणाम होत नाही. किंबहुना हे उपवास झाल्यावर लोक पचनसंस्था बिघडल्याने आजारी पडताना दिसून येतात.

याउलट, हेच उपवास योग्य प्रकारे केल्यास त्याचे खूप चांगले परिणाम आपणास दिसून येतात. या उपवासामुळे बरेच चयापचयात्मक आजार नियंत्रणात येतात. या काळात योग्य व आवश्यक मूल्यांकनासकट नियंत्रित आहार घेतल्यास शरीर जास्तीत जास्त आरोग्यकर होते. यामुळे बुद्धीची चंचलता कमी होऊन मन एकाग्र होण्यास मदत होते. मानसिक शक्ती वाटून मन:शांती, धैर्य व शाश्वतता हे मनाचे गुण वाढतात. सातत्याने व प्रदीर्घकाळ नियंत्रित किंवा Calorie restricted diet (CLD) घेतल्यास शरीरास हलकेपणा येणे, सुस्ती जाणे, शरीराची मरगळ जाणे ही प्रारंभिक लक्षणे दिसतात. उपवास करत असताना लघवीतील विषाक्त पदार्थांची साधारणपणे दहा पटींनी वाढ होते व हे विषाक्त पदार्थ लघवीवाटे शरीराबाहेर निघून जातात. परिणामी शरीरातील मेद, मेदाम्ल, रक्तातील शर्करा, उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतात. स्थूल व्यक्तींचे वजन कमी होण्यास सुरुवात होते व त्यामुळे शरीरामध्ये बरेच चांगले चयापचयात्मक बदल दिसून येतात.

मात्र हे उपवास करताना आहारासाठी अत्यंत योग्य पदार्थांची निवड करणे गरजेचे असते. यामध्ये ताक, लिंबूपाणी, कोकम या पेयांचा वापर करावा. ज्या व्यक्तींना खोकला, सर्दी किंवा दमा आहे त्यांनी सुंठयुक्त काळा चहा किंवा ग्रीन टीचा वापर करावा. फळांमध्ये संत्री, मोसंबी, डाळिंब, अननस व सफरचंद यांचा वापर करावा. उपवासाच्या शेवटच्या दिवसांमध्ये नारळाचे पाणी घेणे योग्य ठरते. उपवास करत असताना पाण्याचे सेवन भरपूर करावे.

अन्नपदार्थांची गरज पडल्यास राजगि-याचे पीठ, राजगि-याच्या लाह्या यांचे सेवन करावे. ज्या व्यक्तींना या प्रकारे उपवास शक्य नाही व तरीही उपवास करण्याची इच्छा आहे, त्यांनी अन्न भाजून घेऊन सेवन करावे. भाजलेले अन्न पचण्यास खूप हलके असते.
ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी आपली रक्तातील साखर एकदम कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. उच्च रक्तदाब असणा-या व्यक्तीसुद्धा उपवास करू शकतात. मात्र योग्य ती काळजी घेऊन उपवास करावेत. ज्या व्यक्तींना अर्धडोकेदुखी (Migraine) आहे, ज्यांना यकृत किंवा किडनीचे आजार आहेत, anginaसारखे आजार असणारे, अत्यंत अशक्त व्यक्ती, गरोदर स्त्रिया यांनी असे उपवास टाळलेले बरे.
या उपवासासोबत इच्छा, द्वेष, काम, क्रोध, मत्सर हे जे मनाचे धारणीय वेग आहेत यांचे धारण करण्याचा पूर्ण प्रयत्न करावा. अशा प्रकारे केलेला उपवास निश्चितपणे मनाची व शरीराची शक्ती वाढवून अनारोग्यावर विजय मिळवून देतो व विजयादशमीचा आपला आनंद द्विगुणित करतो.