आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आग्रहाचा अतिरेक नको

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील लेखामध्ये आहार किती प्रमाणात सेवन करावा, याबद्दल माहिती आपण बघितली. एकंदर प्रत्येक पदार्थाची मात्रा ही एकमेकांना पूरक असणे गरजेचे असते. आयुर्वेदाने स्पष्टपणे उल्लेख केला आहे की, आहार हा षड‌्रसात्मक असावा व हे सहाही रसयुक्त आहार योग्य मात्रेत घ्यायला हवेत. भारतीय आहार पद्धतीमध्ये आपण एकदल व द्विदल धान्यं सेवन करतो, त्याचबरोबर तुरट, कडसर रसात्मक भाज्या, चटण्या, कोशिंबिरी खातो. तिखट लोणचे, ठेचा यांचाही आपल्या दैनंदिन जीवनात समावेश असतो. हे सर्व पदार्थ एकमेकांच्या तुलनेत योग्य मात्रेत असणे गरजेचे असते. यालाच परिग्रह असे म्हणतात. बऱ्याच वेळा अनेक व्यक्तींच्या आहारात एकच एक रसयुक्त पदार्थ येतात. साधारणपणे लहान मुलांमध्ये मधुर रसात्मक पदार्थ जास्त सेवन केले जातात. त्याचप्रमाणे काही लोक अत्यंत तिखट पदार्थ अधिक सेवन करतात. त्यामुळे एकाच रसाने युक्त पदार्थांचा अतिरेक होतो व त्यांचे दुष्परिणाम दिसायला लागतात. याच कारणास्तव आहारातील प्रत्येक रसयुक्त पदार्थाचे प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.

आहार सेवन करतानाचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे ‘जीर्णेअग्निघात’. पूर्वीचे अन्न पचल्याशिवाय अन्न सेवन करू नये, हा अगदी साधा पण अत्यंत महत्त्वाचा नियम जो बहुतांश वेळा पाळला जात नाही. बऱ्याच वेळा वेळ झाली म्हणून, भूक नसतानाही, आग्रहापोटी आपण जेवत असतो. अशा प्रकारे सातत्याने अगोदरचा आहार पचल्याशिवाय पुढचा आहार घेतल्यास फक्त पचनाचेच विकार होतात असं नाही, तर ही सवय आपणास बऱ्याच जीर्ण व्याधींकडे घेऊन जाते.

आपल्या शरीराला आहाराची गरज आहे का, याची खात्री केल्याशिवाय आहार सेवन करू नये. आपले शरीर हलके आहे का? पाचक स्राव व्यवस्थित स्रवले आहेत का? आपले मूत्र व मल विसर्जन व्यवस्थित झाले आहे काय? आदी सर्व गोष्टींची उजळणी करूनच आहार सेवन करणे योग्य ठरते. या सर्वांच्या बरोबर आपणास योग्य भूक लागली असल्यासच आपण जेवणे इष्ट ठरते. सर्वसाधारण व्यक्तींनी दोन जेवणांच्या मध्ये सहा तासांचे अंतर ठेवावे व तीन तासांनी अत्यंत अल्प प्रमाणात आहार सेवन करावा, असे शास्त्रसंमत आहे. आहार सेवन करताना आपण ज्या देशामध्ये राहतो त्याचप्रमाणे आहार सेवन करावा. उदा. आपण महाराष्ट्रात राहून तेलंगणामधील आहार नित्याने सेवन करणे योग्य नाही. त्याचप्रमाणे भारतात राहून पाश्चात्त्य संस्कृतीचा आहार आपण घेणे योग्य नाही. उष्ण प्रदेशात राहून उष्ण स्वरूपाचा आहार सेवन करणे योग्य नाही. किंवा शीत प्रदेशात राहून खूप शीत आहार घेणे योग्य नाही. रुक्ष प्रदेशात राहात असताना आपल्या आहारात शीत पदार्थांचा समावेश असावा व समुद्रकाठी राहात असताना त्याविरुद्ध आहार सेवन करावा. आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा आपल्या प्रकृतीवर खूप परिणाम होत असतो, तसाच परिणाम आहारावरसुद्धा होत असतो. त्यामुळे आपण ज्या प्रदेशात राहतो त्याच प्रदेशात उपयुक्त असणारा आहार घ्यायला हवा. बरेच स्थलांतरित लोक आपल्या मूळ प्रदेशातील आहार सातत्याने घेत असतात व त्यामुळे त्यांना पचनाचे, त्वचेचे इ. आजार होण्याची शक्यता असते.

आहार खूप जलद गतीने किंवा खूप हळुवारपणे सेवन करू नये. आहार सेवन करत असताना आपली लाळ त्या पदार्थात मिसळणे आवश्यक आहे. आपल्या मुखामध्येच आपले पचन चालू होते व आपण जलदगतीने आहार सेवन केल्यास त्यात लाळ योग्य प्रकारे न मिसळल्यामुळे आपले पचन बिघडते.

जास्त जलद गतीने आहार सेवन केल्यास आपणास जेवल्याचे समाधान मिळत नाही. व अशा कारणास्तव आपल्याकडून आहार जास्त प्रमाणात सेवन केला जातो व परिणामी आजार निर्माण होण्याची शक्यता असते. जास्त शीघ्र गतीने आहार सेवन केल्यास वारंवार भूक लागते व आपण जास्त आहार सेवन करतो. जलद गतीने आहार सेवन केल्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही. आम्लपित्त, मलावष्टंभ व इतर पोटाचे आजार निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आहार सेवन करताना आहारावर पूर्ण लक्ष केंद्रित करून तो योग्य गतीने सेवन करावा. (क्रमश:)

डाॅ. संगीता देशपांडे औरंगाबाद
sangitahdesh@rediffmail.com
बातम्या आणखी आहेत...