आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Sangita Deshpande Article About Food For Diabetics

कमीत कमी प्रक्रिया केलेले अन्न चांगले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील लेखामध्ये glycemic index (जीआय) व glycemic loadप्रारंभिक माहिती पाहिली. मधुमेही रुग्णांचा आहार बघताना वरील दोन घटकांचा विचार करणे आवश्यक ठरते. प्रत्येक पदार्थामध्ये कर्बोदकांचे प्रमाण वेगवेगळे असते. कर्बोदकांच्या प्रकारानुसार रक्तातील साखरेचे प्रमाण किती शीघ्रतेने वाढणार आहे हे ठरत असते. जीआय म्हणजे ग्लुकोजच्या तुलनेत इतर पदार्थांमुळे वाढणा-या रक्तशर्करेचे कोष्टक होय. रक्तातील शर्करा जेवढी झपाट्याने वाढते तितकी ती स्वादुपिंड (pancreas) व इन्सुलिनला घातक ठरते. रक्तगत शर्करा जेवढी लवकर वाढते त्याच तुलनेत रक्ताचा स्राव वाढतो व त्यामुळे रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते. जास्त जीआय असलेले पदार्थ सातत्याने सेवन केल्यास, दिवसभरातील एकंदर रक्तगत शर्करा वाढलेली राहते.
याचबरोबर glycemic loadही संकल्पना समजून घेणे आवश्यक ठरते. glycemic load जीआयवर आधारित असते. ग्लायसेमिक लोड पदार्थामध्ये असलेल्या कर्बोदकाची प्रत दर्शविते. मधुमेही रुग्णांनी किंवा स्थूल रुग्णांनी आपला आहार ठरवत असताना पदार्थाचे जीआय व ग्लायसेमिक लोड गृहीत धरून आहाराचे नियोजन करावे. काही पदार्थांचे जीआय उदाहरणादाखल देत आहोत.
धान्यापैकी गव्हाचा इंडेक्स दर्जानुसार 40 ते 48पर्यंत जातो. ज्वारीचा इंडेक्स साधारणत: 71पर्यंत जातो व मध्यम प्रतीच्या तांदळाचा 75च्या पुढे जातो. याचाच अर्थ मधुमेही व मेटॅबॉलिक सिंड्रोम असणा-या रुग्णांनी गव्हाचा वापर इतर धान्याच्या तुलनेत अधिक करावा. फळांमध्ये सर्वात कमी जीआय पेअर, पीच व प्लम/अलुबुखारचा असून सर्वात जास्त जीआय टरबुजाचा आहे. ब-याच मधुमेही वा स्थूल व्यक्ती टरबूज पचावयास हलके समजतात व त्यामुळे त्याचे सातत्याने सेवन करतात. इतका जास्त जीआय असलेल्या पदार्थाचे सेवन केल्याने स्वादुपिंडावर व रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम होतात. अनुषंगाने रक्तगत मेदांचे व मेदपेशींचे प्रमाण वाढते.
पदार्थाचे जीआयप्रमाणे तीन प्रकारांत विभाजन केले जाते. कमी, मध्यम व जास्त.
कमी जीआय असणारे पदार्थ
या पदार्थांमध्ये जास्त कोंडायुक्त पदार्थांचा समावेश होतो. हे पदार्थ त्यातील कार्बोदके पचायला वेळ लावतात व परिणामी रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहाते. कमी जीआय पदार्थांच्या यादीमध्ये जास्त स्नेह असणारे पदार्थ, जास्त प्रथिने असणारे पदार्थ, भाज्या, शेंगा येतात.
ब्राउन राइस, शेंगदाणेदेखील याच वर्गात मोडतात. सर्वसाधारणपणे जीआय 55 व त्यापेक्षा कमी असणा-या सर्व पदार्थांचा कमी जीआय गटात समावेश होतो.
मध्यम जीआय पदार्थांमध्ये बासमती तांदळासारख्या पदार्थांचा समावेश होतो. ज्या पदार्थांचा जीआय 55 ते 69 या दरम्यान असतो अशा सर्व पदार्थांचा मध्यम जीआयमध्ये समावेश होतो. यामध्ये कच्ची केळी, नारळ, पास्ता, दूध व दुध्यजन्य पदार्थ, हिरवे वाटाणे, मनुका अशा पदार्थांचा समावेश होतो.
जास्त जीआय असणारे पदार्थ : ज्या पदार्थांचा जीआय 70 वा त्याहून अधिक असतो अशा पदार्थांचा यामध्ये समावेश होतो. यात मध व बहुतेक सर्व गोड पदार्थ मोडतात. त्याचप्रमाणे रेड वाइन वगळता सर्व मद्यांचा यात समावेश होतो. त्याचबरोबर बटाटा, बीट, टरबूज, अननस, व्हाइट ब्रेड, मैद्याचे व बेकरीतले पदार्थांचा जीआय अतिशय जास्त असतो.
वरील माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, ज्या पदार्थांचा जीआय जास्त आहे अशा पदार्थांचे सेवन मधुमेही व स्थूल व्यक्तींनी करू नये.
जीआय ब-याच गोष्टींवर अवलंबून असतो. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे पदार्थ तयार करण्याची पद्धत. पदार्थ जितका लवकर शिजवला जातो तितका त्याचा जीआय जास्त असतो असा एक सर्वसामान्य नियम आहे. एखाद्या पदार्थावर होणा-या प्रक्रियेवरसुद्धा जीआय अवलंबून असतो. यासाठी आपण तांदळाचे उदाहरण घेऊ.
तांदळाचा भात प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास त्याचा जीआय भांड्यात शिजवलेल्या भातापेक्षा जास्त असतो. त्याच प्रकारे तांदळावर भिजवणे व आंबवणे या प्रक्रिया करून तयार केलेल्या इडलीचा जीआय भातापेक्षा अधिक असतो. त्यामुळे सुज्ञ व्यक्तींनी या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच आपला आहार ठरवावा.