आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Sangita Deshpande Article About Food To Be Eaten In Pre monsoon Days

पावसाळ्याच्या पूर्वसंध्येला काय खाल?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आहार ही अशी संकल्पना आहे जी व्यक्तिपरत्वे, स्थानपरत्वे, देशपरत्वे व ऋतुपरत्वे बदलते. प्राचीन काळापासून ऋतुचर्या व त्या त्या ऋतूतील आहाराला महत्त्व आहे. ऋतूप्रमाणे आहार ही संकल्पना वैज्ञानिक वाटत नसली तरीही त्यामागे खूप वैज्ञानिक कारणमीमांसा व बरेच सिद्धांत आहेत.

सध्या ग्रीष्म-वर्षाऋतू संधिकाल आहे. प्रत्येक ऋतूमध्ये सूर्योदय व सूर्यास्त यामध्ये बराच बदल होत असतो. ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशिरा होतो, तर शिशिर ऋतूमध्ये सूर्योदय उशिरा होऊन सूर्यास्त लवकर होतो. सूर्योदयाची वेळ व दिवसा असणारे कमाल तापमान यावर शरीरातील चयापचय अवलंबून असतो. त्याचप्रमाणे पचन, तृष्णा, आहार पचवण्याची क्षमता व क्षुधा या सर्व गोष्टी अवलंबून असतात व म्हणून प्रत्येक ऋतूनुसार आहार भिन्न स्वरूपाचा असावा. संधिकालामध्ये वातावरणात अत्यधिक अनियमितता असल्याने आहाराबद्दल विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारण नियमाप्रमाणे जे गुण उपस्थित असतात त्याच्या विरुद्ध गुणात्मक आहार घेणे अपेक्षित असते. मात्र, संधिकालामध्ये हा नियम प्रत्येक वेळेस लागू होत नाही. ग्रीष्म व वर्षाऋतू या ऋतुसंधिकालामध्ये आहार वातनाशक, अलायुरू (पचावयास हलका) व सुकोष्ण असावा म्हणजेच आहार हा स्निग्ध, उष्ण गुणात्मक असावा.

वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचे प्राबल्य असल्याने वातदोषाचे विकार वाढतात. त्यामुळे ग्रीष्म ऋतूमध्ये जे अतिशीत पदार्थ खाण्याची सवय लागलेली असते ती टाळावी. शीतपेये, आईस्क्रीम, अतिशीत जलपान या काळामध्ये घेणे टाळावे. गोघृत (तूप) स्वयंपाकात जरूर वापरावे. तूप वातशामक व अग्निवर्धक असल्याने त्याचा उपयोग या ऋतूत फायदेशीर ठरतो. संधिकालामध्ये तापमान उष्ण असल्यास त्या वेळी शीत पदार्थांचा वापर करण्यास हरकत नाही. संधिकालात वातावरणात आमूलाग्र बदल होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम प्रकृतीवर होत असतो. याच दिवसांमध्ये प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने ती वाढवण्याकरिता योग्य तो आहार घेणे गरजेचे असते. ग्रीष्म व वर्षाऋतू संधिकाल संपताच तीव्र अग्निमांद्य निर्माण होते व भूक मंदावते. अशा वेळी पचावयास अत्यंत हलका, उष्ण व प्रमाणामध्ये अल्प असाच आहार सेवन करणे गरजेचे असते. त्यामुळे खूप जास्त प्रमाणात फळे, कोशिंबिरी टाळाव्यात. आहारात वापरण्यात येणारे धान्य भाजून वापरणे संयुक्तिक ठरते. यात भाजणीचे थालिपीठ, दशमी, भाजलेल्या तांदळाची खिचडी अथवा भात याचा वापर करावा. त्याचप्रमाणे मूग, राजगिरा, नाचणीसत्त्व, सातूचे पीठ, ज्वारी यापासून तयार होणारे पदार्थ मुबलक प्रमाणात वापरावेत. आहारात आले, पुदिना, मिरी, सुंठ, दालचिनी या पदार्थांचा वापर वाढवावा. ताकाची कढी, आमटी व त्याला साजूक तुपाची फोडणी उत्तम. आले, पुदिना, दालचिनी घातलेले चिकन सूपही योग्य आहारात मोडते. वर्षा ऋतूमध्ये सर्वत्र आर्द्रता/ओलावा असल्याने आपली पचनशक्तीसुद्धा क्षीण झालेली असते. त्यामुळे पाण्याचा वापरसुद्धा मोजकाच करावा. त्याचबरोबर पोटभरून खाणे, वारंवार खाणे, थंड पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे. ऋतुसंधिकालात आहाराचा विचार करताना तापमानातील बदलाचा प्रामुख्याने विचार करावा.
(sangitahdesh@rediffmail.com)