आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Sangita Deshpande Article About Foods To Be Eaten During Fasts

आज माझं व्रत आणि दिवसभर चरत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रावणमास चालू झाला की, सणवारांची रेलचेल सुरू होते. यामध्ये सणांसोबतच व्रतवैकल्ये व उपवाससुद्धा असतात. चातुर्मासातील उपवासांना तर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सोमवार, शनिवार, चतुर्थी, ऋषिपंचमी, हरतालिका, पितृपक्षापासून नवरात्रापर्यंत सण व उपवास यांची रेलचेल असते. नेमके याच महिन्यांमध्ये उपवास का असावेत, असा प्रश्न मनात येतो. याचे शास्त्रीय कारण बघितल्यास असे लक्षात येते, की या काळात वातावरण आर्द्र, दमट झालेले असते. अशा सततच्या वातावरणामुळे आपली पचनशक्ती मंदावते, अग्नीही क्षीण झालेला असतो. आपली पचनशक्ती मंदावल्याने आपण तिला आराम देणे अपेक्षित असते व त्यामुळेच या काळामध्ये आहार अत्यंत अल्प घेणे किंवा जितका कमी जाईल तितका चांगला. या वातावरणात आहार अल्प व पचायला हलका घेतल्यास अपचन, ज्वर, अतिसार, उलट्या या विकारांपासून आपण दूर राहू शकतो. पावसाळा हा आजार होण्यास अनुकूल काळ असल्याने आपला अग्नी आपण प्राकृत ठेवणे गरजेचे असते. अन्यथा बर्‍याच आजारांना सामोरे जावे लागते. म्हणूनच या ऋतूमध्ये भरपूर उपवास व मांसाहार वर्ज्य करण्याचे संकेत दिलेले असावेत.

हे सर्व माहीत असताना आपण मात्र नेमके उलटे वागतो. एकादशी आणि दुप्पट खाशी या म्हणीप्रमाणे आपण आपल्या आहारावर व मनावर संयम ठेवून पचनशक्तीला आराम देण्यापेक्षा उलट आपण त्यावर अधिक भार टाकतो. किंबहुना पचनशक्तीला अजून जास्त ताण देतो. ‘आज माझं व्रत आणि दिवसभर चरत’ या उक्तीप्रमाणे आपण उपवास म्हटले की दिवसभर खात राहतो.

अनेक वेळा तर आपण तो पदार्थ खाण्यासाठी उपवास करतो. साबुदाणा खिचडी, बटाटा वेफर्स, बटाट्याचा शिरा, शेंगदाण्याची आमटी, गुळाचे व दाण्याचे लाडू, उपवासाची जिलेबी असे नाना तºहेचे पदार्थ आपण शोधून काढले आहेत, ज्यांचे सेवन आपण उपवासाला करतो आणि येथूनच आपण आपले आरोग्य बिघडविण्यास सुरुवात करतो. उपवास या शब्दाचा अर्थ जर बघितला तर तो उपाशन या शब्दापासून आला आहे. म्हणजे नेहमीचे जेवण अथवा आहार सोडून काही उप म्हणजे त्या खालील पचायला हलके पदार्थ खाणे होय.

खर्‍या अर्थाने श्रावणातील उपवास या शब्दाचा अभिप्रेत अर्थ पाहिल्यास उप म्हणजे जवळ व वास म्हणजे राहणे. संत लोकांच्या संगतीत राहणे म्हणजे उपवास असे चरकसंहितेत उपवासाचे स्पष्ट वर्णन केले आहे व त्यात त्यांनी संत लोकांच्या सहवासात राहणे म्हणजे उपवास, शरीराचे शोषण करणे म्हणजे उपवास नव्हे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

अशा या उपवासाच्या दिवशी कोणते पदार्थ सेवन करावेत हा एक प्रश्न नेहमी आपल्याला असतो. उपवासाला उपयुक्त असणारे पदार्थ सात्त्विक व पचायला हलके असावेत. धार्मिक उपवासांमध्ये दूध, तूप, मध, गरम पाणी यांचा समावेश असावा, त्यामध्ये कंदमुळे व फळे नंतर आली असावीत. आता तर विविध चविष्ट पदार्थ उपवासाच्या आहारात घुसले आहेत. ते कधी व कुणी घुसवलेत देव जाणे.

उपवास करत असताना साळीच्या लाह्या, सर्वात उपयुक्त. त्याचबरोबर भाजणीचे धान्य घेण्याससुद्धा हरकत नसावी, कारण धान्य भाजून घेऊन सेवन केल्यास ते पचावयास हलके होते. यासोबत राजगिरा किंवा ज्वारीच्या लाह्यांचे सेवनसुद्धा उपयुक्त आहे.

यासोबत मुगासारख्या डाळींचे कढण याला संस्कृतमध्ये सूप म्हणतात, भाजून घेतलेल्या तांदळाची पेज किंवा ज्या भाज्या पचायला हलक्या असतात त्या भाज्यांचे सूपसुद्धा चालतील.

थोडक्यात धार्मिक उपवासांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळे, मनुका, काजू, सेवन करण्यापेक्षा जे अन्न पचायला हलके आहे, सात्त्विक व आरोग्यकर आहे ते उपवासाचे अन्न समजून सेवन करावे.
sangitahdesh@rediffmail.com