आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या 'मिक्स' भाज्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजी हा भारतीय आहाराचा एक अविभाज्य घटक आहे. उत्तर ते दक्षिण व पूर्व ते पश्चिम आपणास विविध भाज्यांचा उपयोग आहारात होताना दिसून येतो. बऱ्याच वेळा या भाज्या एकट्या वापरल्या जातात किंवा दोन किंवा तीन भाज्या एकत्र करूनदेखील वापरल्या जातात. ही भाज्यांची संयुगेही विविध स्वरूपाची असून अशी संयुगे करण्याची विविध कारणे असतात. बऱ्याच वेळा भाज्या एकमेकांना पूरक म्हणून एकत्र केल्या जातात, तर काही वेळा त्यांचा संयोग हा आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतो. काही वेळा तर फक्त चांगली चव लागावी, यासाठी विविध भाज्या व फळेसुद्धा एकत्र केली जातात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने भाज्यांची संयुगे कितपत योग्य आहेत, याचा विचार करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, बहुतांश घरांमध्ये भाजीला चव येण्यासाठी इतर भाज्यांमध्ये टमाटे व कांदे टाकले जातात. अनेक भाज्यांमध्ये बटाटाही हमखास घातला जातो. कांदे, टमाटे, बटाटे अशी मिक्स भाजीसुद्धा लोकप्रिय आहे. पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक यांचासुद्धा इतर भाज्यांसोबत वापर होतो. यामध्ये काही भाज्या पारंपरिक असून अलीकडच्या काळात नवनवीन संयोगाचा प्रयोग होताना दिसून येतो. या सर्वांची काही उदाहरणे आपण पाहू.

बऱ्याच भाज्यांमध्ये कांदा चवीसाठी वापरण्यात येतो. कांदा हा शीत गुणधर्माचा असून पचण्यासाठी जड असतो. कांदा हा बलकारक असून हृदयरोग, रक्ताचे विकार यांमध्ये तो लाभकारक आहे. कांद्यामधील allyl sulphide हे तत्त्व त्याचे औषधी गुणधर्म वाढवते. पचायला हलक्या असणाऱ्या भाज्या कांदा घालून वापरण्यास हरकत नाही. भाज्यांमध्ये कांदा वापरताना एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, कांदा खूप वेळ न टिकणारा पदार्थ आहे. त्यामुळे ज्या भाज्यांमध्ये कांद्याचा वापर होतो त्या भाज्या खूप वेळ ठेवू नयेत, त्या लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे बऱ्याच भाज्यांमध्ये टमाटेसुद्धा चवीसाठी वापरतात. टमाट्यांमध्ये असलेले lycopene हे तत्त्व बऱ्याच आजारांमध्ये उपयुक्त ठरते. त्यामुळे पत्ता कोबी व टमाटे, ब्रोकोली व टमाटे अशा मिश्र भाज्या कर्करोगामध्ये विशेषत्वाने फायद्याच्या ठरतात.

टमाट्याच्या आंबटगोड चवीमुळे भाज्यांना वेगळी चव येते व भाज्या अधिक खाल्ल्या जातात. मिक्स वेजसारख्या भाज्यांमध्ये टमाट्यामुळे एक वेगळी चव येते. मात्र ज्या लोकांना पचनाचे विकार आहेत, सांध्यांचे वा अॅलर्जीसारखे आजार आहेत, त्यांनी भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात टमाट्यांचा वापर टाळावा. टमाट्याच्या सालीमध्ये solanine नावाचे सक्रिय तत्त्व असते, ज्याचा अतिप्रमाणात टमाटे खाल्ल्यास आतड्यांवर परिणाम होऊ शकतो. टमाट्यासोबत काही पदार्थ वर्ज्य करावेत. महाराष्ट्रीय जेवणामध्ये कोशिंबिरीचे खूप महत्त्व आहे. कांदा, टमाटे, दही यांची कोशिंबीर आपण नेहमी खातो. मात्र दही व टमाटे हे विरुद्ध अन्न अाहे, असाही एक मतप्रवाह आहे.

त्याचप्रमाणे पालक व टमाटेसुद्धा एकत्र करून खाण्याची प्रथा आहे. हे दोन्ही पदार्थ पचण्यासाठी जड आहेत. हे एकत्र चवीला जरी चांगले लागत असतील तरी आरोग्याच्या दृष्टीने त्यांचा संयोग सातत्याने सेवन करणे चुकीचे आहे. पंजाबी भाज्यांच्या मसाल्यांमध्ये टमाटे, दह्याचा खूप वापर होतो. त्यामुळे असा अति वापर टाळावा. बटाटा व टमाटे हेसुद्धा असेच संयोग आहे. या दोन्ही भाज्या पचायला जड आहेत. बटाटे पिष्टमय आहेत, तर टमाट्यातही तंतुमय पदार्थ कमी आहेत. त्यामुळे अशा मिक्स भाज्या नियमित खाऊ नयेत. टमाटे फूलकोबी, पत्ताकोबी, सिमला मिरची, मेथी यांसारख्या भाज्यांमध्ये घालून खाण्यास काही हरकत नाही. (क्रमश:)

डाॅ. संगीता देशपांडे, औरंगाबाद
sangitahdesh@rediffmail.com
बातम्या आणखी आहेत...