आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आहारातून कर्करोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्पादन वाढीसाठी विविध रसायनांचा, किटकनाशकांचा वापर शेतकरी आणि व्यापारी वर्गानं करायला सुरुवात केली. परिणामी उद्योग व्यवसाय वाढले, ही जरी जमेची बाजू; मात्र या सर्व गोष्टींचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होईल, याचा विचार तितक्या तीव्रतेने करण्यात आला नाही. त्याचा परिणाम आपण सर्व जण भोगत आहोत.

आहार हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असून योग्य आहारावरच मानवाचे आरोग्य अवलंबून असते. बहुतांश आजारांचे कारण हे चुकीचा आहार आहे, याची बऱ्यापैकी लोकांना जाण आहे. सध्याच्या काळात हृदयविकार, मधुमेह, स्थुलता या चयापचयात्मक आजारांसोबत कर्करोगाचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. लहान मुलांमध्येदेखील आता कर्करोग बऱ्याच प्रमाणात आढळून येतो. मागील काही वर्षांमध्ये कर्करोग होण्याचे मूळ कारण हे तंबाखू सेवन, धूम्रपान इत्यादी व्यसने आहेत, यावर जास्त जोर दिला गेला. मात्र चुकीचा आहार, आहार तयार करायच्या चुकीच्या पद्धती, किंबहुना आहार उत्पन्न करण्याच्या चुकीच्या पद्धती याला कारणीभूत असू शकतात, असे आता निदर्शनास येत आहे.
 
जागतिक लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ व इतक्या लोकसंख्येला पुरेल इतके अन्नधान्याचे उत्पादन, भाज्यांचे उत्पादन, फळांचे उत्पादन, दुधाचे उत्पादन व मांसाचे उत्पादन ही एक मोठी समस्या जगासमोर होती. अन्नधान्य उत्पादन करत असताना शेतकरीवर्गाच्या अडचणी, धान्य, भाजीपाला, फळे यांना होणारा जंतूंचा व किटकाचा प्रादुर्भाव अशा अनेक समस्यांना शेतकरीवर्गाला सामोरे जावे लागते. या प्रश्नाचे उत्तर जगाला कृषी व फळभाज्या उत्पन्न क्षेत्राकडून मिळाले.
 
संकरित बियाणांचे उत्पादन वाढले. सर्व अन्नधान्ये संकरित बियाणांपासून तयार होऊ लागली. अतिशय जहाल अशा किटकनाशकांचा उपयोग फळे व भाज्यांच्या उत्पादनात होऊ लागला. परिणामी शेतकऱ्यांचे अन्नधान्य व फळभाज्यांचे उत्पादन परिणामकारक वाढले व जगाची भूक चांगल्या प्रकारे भागत राहिली. संकरित बी-बियाणे, असेंद्रिय खते व जहाल किटकनाशके यामध्ये दिवसेंदिवस नवनवीन संशोधन होऊन फक्त उत्पादन कसे वाढेल, याकडे पूर्ण जगाचे लक्ष वेधून राहिले.
 
मागील ५० ते ६० वर्षांपासून हा कृषी क्षेत्राचा प्रवास चालू आहे व यामुळे बरेच देश अन्नधान्य व फळभाज्या उत्पादनात स्वावलंबी झाले आहेत. त्याचप्रमाणे दुधाच्या उत्पादनात वाढ होण्याकरिता संकरित जनावरे तयार करण्यात आली व जेथे एक गाय दोन-तीन लिटर दूध देत असे, तेथे १५-२० लिटर दूध देत आहे. यामुळे दुधाची उपलब्धता तर मुबलक झाली, त्यासोबत शेतकरीवर्गाची आर्थिक परिस्थिती पण सुधारली. यामुळे दुग्ध व्यवसाय खूप भरभराटीला लागला. फक्त अन्नधान्य उत्पादन, दुग्ध उत्पादन व फळभाज्या उत्पादन मुबलक प्रमाणात वाढल्याने खाद्यपदार्थ, हवाबंद पदार्थांचा व्यवसाय व उपाहारगृहांचा व्यवसाय भरभराटील आला.
 
या सर्व गोष्टी होत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट नकळत घडत होती ती म्हणजे, ‘आहार’ जो मानवी जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, त्याचे बाजारीकरण झाले. व्यापारीकरण झाले. या शृंखलेमधील प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या फायद्यासाठी उत्पादन वाढवण्यासाठी, आपले उत्पादन टिकवण्यासाठी विविध रसायनांचा वापर करू लागली. त्याचबरोबर विविध असेंद्रिय खतांचा वापर करू लागली. या माध्यमातून या क्षेत्रातील उद्योजकांना खूप मोठे अवजार रसायनांच्या माध्यमातून मिळाले. उद्योग व्यवसाय वाढले, ही जरी जमेची बाजू बघितली तरी या सर्व गोष्टींचा दूरगामी परिणाम मानवी आरोग्यावर काय होईल, याचा विचार तितक्या तीव्रतेने नाही करण्यात आला व त्याचा परिणाम आपण सर्व जण भोगत आहोत.
 
सर्वसाधारणपणे जो शेतकरी खतांचा, किटकनाशकांचा उपयोग करतो, तो खूप जास्त शिक्षित नसतो. आपण जे धान्य शेतात पिकवत आहोत, त्याचा दूरगामी परिणाम हे धान्य सेवन करणाऱ्या व्यक्तीवर काय होणार आहे, आपण वापरत असलेली किटकनाशके व खते यांचा आरोग्यावर काय परिणाम होणार, याची जाण व समज त्याला नसते. ही किटकनाशके नेमकी किती प्रमाणात वापरायची, त्यांची योग्य मात्रा काय असावी, त्यांच्या वापरामध्ये आरोग्याच्या दृष्टीने किती अंतर असावे, अशा एक ना अनेक प्रश्नांची अचूक उत्तरे त्यांना माहीत नसतात. परिणामी अशा अन्नधान्य व फळभाज्यांचा उपयोग आपण सातत्याने करतो. ही किटकनाशके, असेंद्रिय खते यांचे प्रमाण अन्नामध्ये येऊन सातत्याने त्याचा शरीरावर दूरगामी परिणाम होतो.
 
या सर्वांचा परिणाम म्हणून कर्करोगासारखे आजार समाजामध्ये वाढताना दिसून येतात. ही समस्या फक्त अन्नधान्यापुरती मर्यादित नसून अन्न क्षेत्रातील व खाद्यपदार्थ उत्पादन करणाऱ्या सर्व उद्योगांबाबत आहे. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या शेतकरी बंधूंना या क्षेत्रामध्ये शिक्षित करणे आवश्यक आहे.
 
sangitahdesh@rediffmail.com
बातम्या आणखी आहेत...