आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फलरस: सेवनपूर्व चिकित्सा गरजेची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोग्यविषयक या सदराच्या मागच्या भागात आपण फळांच्या रसाबद्दल काही माहिती बघितली. फळं आणि वनस्पतींचे रस कुणी घ्यावेत, कशा स्वरूपात घ्यावेत, आणि ते सेवन करतांना घ्यावयाची काळजी याबद्दल आजच्या भागात जाणून घेऊ या.
 
फळांचे रस करण्याची पद्धत प्राचीनकालीन असून फळांचे रस व त्यापासून विविध पेय बनवण्याची परंपरादेखील प्राचीन आहे. लिंबू, अननस, डाळिंब यांच्या रसांपासून सरबतंसुद्धा केली जातात. त्याचप्रमाणे आवळ्याच्या रसाचा वापरही आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात केला जातो. उसाचा रस तर उन्हाळ्याचा उकाडा नक्कीच घालवतो. सर्वच फळांचे रस हे अनारोग्यकर असतात, असे नाही. काही काही वेळेस त्या फळांचे सेवन हे रसाच्या माध्यमातून करणे योग्य ठरते. याचे सर्वांत चांगले उदाहरण म्हणजे आवळा.
 
आवळा हा अत्यंत गुणकारी असून त्रिफळांमधील आवळा एक महत्त्वाचा घटक आहे. आवळ्याच्या सेवनाने आम्लपित्त, मधुमेह, त्वचाविकार, नेत्रविकार अशा बऱ्याच व्याधीत उपयोग होतो. त्याशिवाय आवळा हे एक उत्तम रसायनदेखील आहे. अशा आवळ्याचा उपयोग नियमित व योग्य मात्रेत करायचा झाल्यास त्याचा रसाच्या माध्यमातून होऊ शकतो. नुसता आवळा नियमित खाणे व योग्य मात्रेत खाणे बऱ्याच वेळा शक्य होत नाही. त्याचा रस, साधारण २० ते ६० मिली, आपणास बऱ्याच विकारांमध्ये लाभदायक ठरतो. २० ते ६० मिली रस मिळण्याइतके आवळे खाणे शक्य नसल्याने त्याचा रस काढून घेणे सोपे जाते.
 
मात्र आवळ्यासारखे इतर फळांचे नाही. इतर फळे आपण नैसर्गिक स्वरूपात खाणेच जास्त योग्य ठरते. फळांचे रस करताना त्यात होणारे जैवरासायनिक बदल शरीरास अपायकारक ठरू शकतात.
 
फळांच्या रसाबद्दल फार मोठा गैरसमज समाजामध्ये आढळतो. तो म्हणजे फळांचे रस आरोग्यकारक असून त्यांचे सेवन मुलांनी, वृद्धांनी किंवा काेणीही व्यक्तींनी दररोज करावे.
तसे बघता सर्व फळे पचायला हलकी नसतात. फळांमध्ये भरपूर प्रमाणात शर्करा असल्याने ती तशी यकृतासाठी पचवायला जडच असतात. त्यामुळे नियमित फळांचे रस सेवन करणे अपेक्षित नाही. ज्या व्यक्ती दररोज भरपूर व्यायाम करतात, ज्यांना पचनाचे विकार, स्थूलता, मधुमेह असे विकार नाहीत, त्यांनी फळांचे रस सेवन करण्यास हरकत नाही. मात्र लहान मुलांना, ज्यांचे बैठे काम आहे अशा व्यक्तींना, नियमित फळांचे रस देणे योग्य नाही.
 
फळांचे रस गोड लागण्याकरिता त्यात बऱ्याच वेळा साखर घातली जाते. अशा प्रकारे हे रस पचण्यास अजून जड होतात व परिणामी या रसांच्या नियमित सेवनाने बऱ्याच चयापचयात्मक आजारांची सुरुवात होऊ शकते.
 
फळांचे रस सेवन करताना त्यात बऱ्याच वेळा दुधाचा उपयोग केला जातो. ज्याला आपण मिल्कशेक या नावाने ओळखतो. आरोग्याच्या दृष्टीने बघता फळांच्या रसात दूध टाकून घेणे सयुक्तिक नाही. अशा प्रकारचा संयोग हे विरुद्ध अन्न आहे. फळांच्या रसातील आम्लता व दुधामधील प्रथिने व इतर घटक एकत्र व सातत्याने घेतल्यास पचनाच्या विकारांची सुरुवात होऊन त्यातून गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मिल्कशेकसारखे पदार्थ सातत्याने घेणे टाळावे.
 
 sangitahdesh @rediffmail.com
बातम्या आणखी आहेत...