आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचऱ्याच्या समस्येवर प्रकाश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुरिमाच्या (७ जून ) अंकात प्रकाशित झालेल्या ‘किती फेकाल?’ या संपादकीय लेखाद्वारे मृण्मयी रानडे यांनी स्वच्छ पर्यावरणात अडसर ठरत असलेल्या कचऱ्याची महत्त्वाची समस्या ऐरणीवर आणली. कचऱ्याची नीट विल्हेवाट न लावल्यास त्याचे सार्वजनिक आरोग्यावर अनेक दुष्परिणाम संभवतात. चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, सुरक्षित अन्न, सेंद्रिय शेती, रोग फैलावणाऱ्या किटकांचे नियंत्रण, त्याचबरोबर मानवी विष्ठा, प्रदूषित पाणी, घरगुती सांडपाणी आणि घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, स्वच्छतेला पोषक वर्तन, स्वच्छ समुदाय आणि चागंल्या सामाजिक व सांस्कृतिक वातावरणाची गरज असते.

जैव व अजैविक विघटनशील असे कचऱ्याचे दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल. त्यापैकी ‘जैव विघटनशील’ या प्रकारात भाज्या आणि फळांचा उरलेला भाग, केळीची पाने, नारळाच्या करवंट्या, अंड्याची टरफले, वाळलेली फुले, फांद्या, मांसाहारी कचरा (प्राण्यांची हाडे, कोंबडीचे पंख इ.), स्वयंपाकघरातील कचरा, राख आणि कोळसा, चहा/काॅफी पावडर, झाडलोटीचा कचरा. ‘अजैविक विघटनशील’ या प्रकारात कागद, वह्या, पुस्तके, वर्तमानपत्रे, पुठ्ठे, वस्तूंची खोकी, दुधाच्या पिशव्या, तुटलेली प्लास्टिक भांडी, पाण्याच्या बाटल्या, रिकाम्या टूथपेस्ट इ., औषधी गोळ्यांची वेष्टणे, अन्नपदार्थासाठी वापरले जाणारे अॅल्युमिनिअम फाॅइल, काचेच्या बाटल्या आणि काचेचे तुकडे, लाकूड, कापड, तुटलेल्या चामड्याच्या चपला आणि बॅग्स, रबरी स्लिपर्स, विद्युत वायर्स, खराब झालेल्या बॅटऱ्या व बल्ब आणि इलेक्ट्राॅनिक्स कचरा इ. कचऱ्याचा समावेश असतो.

घरात, व्यवसायात, उद्योगात निर्माण होणाऱ्या सेंद्रिय आणि असेंद्रिय वस्तू ज्यांची काहीच किंमत नाही, त्या वस्तूंना कचरा असे संबोधले आहे. मानवी विष्ठा, मूत्र आणि सांडपाणी वगळून सर्व उर्वरित कचऱ्यास घनकचरा असे म्हणतात. जैव विघटनशील कचरा जीवशास्त्रीय प्रक्रियेद्वारे पूर्णपणे विघटित होऊ शकतो. त्यासाठी हवा उपलब्ध असली किंवा नसली तरी चालू शकते. अजैविक विघटनशील कचऱ्याचे जीवशास्त्रीय प्रक्रियेद्वारे विघटन होऊ शकत नाही. या कचऱ्याचे पुनर्वापरास योग्य व अयोग्य असे दोन प्रकार आहेत. पुनर्वापरास योग्य : ज्या कचऱ्याला आर्थिक मूल्य आहे पण ज्याची विल्हेवाट लावायची आहे आणि जो त्याच्यातील ऊर्जामूल्याच्या साहाय्याने पुन्हा वापरात आणता येऊ शकेल. उदा. प्लास्टिक, कागद, कपडा इ.

पुनर्वापरास अयोग्य : ज्या कचऱ्याला आर्थिक मूल्य नाही, ज्याच्यातून काहीच निघत नाही. उदा. कार्बन, थर्माकोल, टेट्रा पॅक इ.
रंग, उगमस्थान आणि विषाणूंचे प्रमाण या आधारे सांडपाण्याचे दूषित आणि सांडपाणी असे दोन प्रकार पडतात. स्वच्छताघर, शौचालयातून येणारे पाणी हे दूषित पाणी. अशा पाण्यात रोगजंतूंचे प्रमाण अधिक असते. तर स्वयंपाकघर, स्नानगृह, कपडे धुतलेल्या पाण्याला सांडपाणी असे म्हणतात. अशा पाण्यात रोगजंतूंचे प्रमाण तुलनेने कमी असते. स्वच्छ पर्यावरण हवे असेल तर घनकचऱ्याची नीट विल्हेवाट लावावी लागेल. कचरा अधिक चांगल्या रीतीने कोठे फेकता येतो, याची जाण ठेवावी लागेल. त्याचबरोबर कचऱ्याचा साधन म्हणून उपयोग कसा करता, याकडे कटाक्ष असायला हवा. उदा. रिकाम्या बाटल्या पुन्हा वापरणे, विकणे किंवा त्या रिसायकलिंग बिनमध्ये टाकणे, कंपोस्ट खत तयार करणे, इंधनासाठी वापरणे.

आपण हे करू शकतो
घरातील कचरा एका खड्ड्यात गोळा करावा व तो कंपोस्टच्या खड्ड्यात टाकावा. Á घरातील सांडपाण्यासाठी बाहेरच्या बाजूला एक खड्डा खोदून (सोक पिट) किंवा परसबागेत ते पाणी सोडून त्याचा वापर करता येतो. Áआवश्यक असेल तेव्हाच (शक्यतो कमीत कमी वेळा) डिस्पोजेबल वस्तूंचा वापर करावा.
डाॅ संजय जानवळे, बीड
dr. sanjayjanwale@rediffmail
बातम्या आणखी आहेत...