आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Sanjay Janwale Article About Irresponsible Girls Riding Two Wheelers

या मुलींना रोखायचे कसे ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकाळचे अकरा वाजले असतील. एका हॉस्पिटलातील शस्त्रक्रियेच्या कॉलनंतर मी माझ्या हॉस्पिटलकडे दुचाकीवर स्वार होऊन निघालो. अत्यंत वर्दळीच्या जालना रोडवर साठे चौकानजीक रस्त्याच्या डाव्या बाजूने अत्यंत सावकाशपणे मी जात असतानाच दुचाकीवरून अत्यंत वेगात जाणा-या एका मुलीनं मला ओव्हरटेक केलं. रस्त्यावर पुढे-पुढे जाण्याची तिला एवढी घाई झाली होती, की तिने तिच्यापुढे दुचाकीवरून जाणा-या एका तरुण मुलाला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. नेमक्या त्याच वेळी तो मुलगा रस्त्याच्या डाव्या बाजूला आला. त्या मुलीच्या दुचाकीनं त्या मुलाच्या गाडीला धक्का दिला.

तो प्रसंग पाहून माझ्या काळजाचा ठोका जणू चुकला. दोघंही रस्त्यावर पडले. ट्रॅफिक जाम. नशीब बलवत्तर होतं म्हणून दोघांनाही फारसं लागलं नव्हतं. किरकोळ खरचटल्याच्या जखमा असतील. अठरा ते वीस वर्षे वयाची ती मुलगी अंगानं चांगलीच लठ्ठ होती. एवढी की तिची गाडी सांभाळणंही कठीण जात होतं. त्यांना मदत करण्यासाठी सर्वच प्रवाशांनी आपापली वाहनं रस्त्यातच लावून घटनास्थळी धाव घेतली. ती मुलगी उठली अन् तडक त्या मुलाकडे गेली अन् त्याच्या श्रीमुखात दोन भडकावत त्याच्याशी तावातावाने भांडू लागली. स्त्रीदाक्षिण्य म्हणून जमा झालेली सारी मंडळी अवाक् झाली.

भांडण नंतर करा, प्रथम तुम्ही दवाखान्यात चला असा तिथल्या उपस्थितांचा सूर. पण कुणाचंही, अगदी पोलिसांचंही ऐकण्याच्या मन:स्थितीत ती मुलगी नव्हती. शेवटी मी न राहवत तिला दोन शब्द सुनावले. एक तर चूक त्या मुलीची, कसलाच दोष नसणा-या त्या मुलाला वरून ती भांडत होती. खरी परिस्थिती जेव्हा तिला स्पष्टपणे सांगितली तेव्हा ती शांत झाली.
तिने हेल्मेट घातले नव्हते. चूक असताना आपल्याबरोबर इतरांचा जीव धोक्यात घालणा-या त्या मुलीचे ‌वर्तन योग्य होते का? वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत अन् स्वत: जिवाची प‌र्वा न करणा-या या मुलीला समजून सांगेल तरी कोण?

या घटनेनंतर एका आठवड्याच्या आत मला आणखी एक अनुभव आला. एका यू टर्नच्या सुमारे दोनशे फुटांवर मानवनिर्मित एक दुभाजक आहे. त्या रस्त्यावरून मी माझ्या गाडीने समोरच्या यू टर्नवरून दुस-या रस्त्यावर जाण्याच्या बेतात असताना एका दुचाकीवरून ट्रिपलसीट जाणा-या मुलींनी मला माझ्या डाव्या बाजूनं ओव्हरटेक केलं. लगेच वाहन उजवीकडे वळवून त्या मानवनिर्मित दुभाजकावरून गाडी घालण्याचा प्रयत्न केला. गाडीवरचं तिचं नियंत्रण सुटलं. त्या तिघीही रस्त्यावर पडल्या. रस्त्याच्या पलीकडल्या बाजूनं भरधाव वेगात एक ट्रक आला. प्रसंगावधान बाळगून ट्रकचालकानं करकचून ब्रेक लावला. काळ आला होता पण वेळ आलेली नव्हती. त्या तिघीही सुखरूप होत्या.वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली करणा-या या कॉलेजातल्या मुलींना समज येईल तरी केव्हा?

काॅलेजच्या मुलामुलींनी दुचाकी वापरणं आजकाल रूढ झालं आहे. ट्यूशन, कॉलेजसाठी त्यांना अपरिहार्यपणे त्याचा वापर करावा लागतो. पौगंडावस्थेतील तरुण मुले नागमोडी वळणे घेत किंवा कर्णकर्कश हॉर्न वाजवत वा-याच्या वेगानं दुचाकी चालवतात, यात काही नवीन नाही. आता मुलीही तितक्याच बेजबाबदारपणे वाहने चालवू लागल्या आहेत. नुकत्याच नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोनं प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात दररोज ९४ तर राज्यात ३८ जणांचा दुचाकी अपघातात मृत्यू येतो. केवळ या आकड्यांवर दृष्टिक्षेप टाकून अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या घरच्यांच्या वेदनेचा अंदाज आपल्याला येणार नाही कदाचित.
या दोन्ही प्रसंगांतील मुलीचं रस्त्यावरचं वर्तन योग्य होतं का? तुम्ही असं काही पाहिलंय का? रस्त्यावरचे अपघात कमी करण्यासाठी काय करता येईल? या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी तुम्ही मदत करणार ना?