आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr Sanjay Padole Artilce About Homeopathy Treatment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुग्णांच्या सदोष जनुकांवर उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होमिओपॅथी एक खूप प्रगतिशील वैद्यकीय शास्त्र आहे; परंतु या शास्त्राचा सखोल अभ्यास नसल्यामुळे बरीच डॉक्टर मंडळी त्याकडे दुर्लक्ष करतात, तसे पाहता या शास्त्राची उपचारपद्धती ही शरीराच्या अति सूक्ष्म भागावरती म्हणजे रुग्णांच्या जीन्सवरदेखील उपचार करून त्यात योग्य ते बदल घडवून आणू शकते आणि ही गोष्ट आता दिवसेंदिवस रुग्णांना होणार्‍या फायद्यावरून सिद्ध होत आहे.

आपल्याला भविष्यामध्ये कोणकोणत्या त्रासाला सामोरे जावे लागेल, त्याची एक ब्ल्यू प्रिंट ही आपल्या जीन्सवर अधोरेखित झालेली असते. त्याला जेनेटिक कोड असे म्हणतात. हे जेनेटिक कोड आपल्याला आपल्या पूर्वजांकडून अनुवांशिकरीत्या मिळत असते. गर्भसंस्कार ही एक प्रथा आपल्या पूर्वजांनी मांडली होती, जी दिवसेंदिवस लुप्त होत चालली आहे. गर्भसंस्कार म्हणजे आई व बाळ दोघांची शास्त्रीय पद्धतीने काळजी घेणे व नियमित उपचार करून आईचे व बाळाचे मानसिक व शारीरिक स्वास्थ सांभाळणे.

आई-वडील दोघांचे स्वास्थ्य ठीक नसेल, तर होणार्‍या बाळाच्या जेनेटिक कोडमध्ये दोष येतो
आईचे स्त्रीबीज व वडिलांचे शुक्राणू दोघे जेव्हा एकत्र येऊन गर्भधारणा होते तेेव्हा आई व वडील दोघांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ उत्तम असेल, तर जन्माला येणारे अपत्य सुदृढ व निरोगी होण्याची टक्केवारी जास्त असते. तेच जर याउलट झाले व दोघांचे स्वास्थ्य ठीक नसेल, तर अशा वेळेस त्या होणार्‍या बाळाच्या जेनेटिक कोडमध्ये दोष निर्माण होतात आणि त्याचा परिणाम होणार्‍या बाळावर नक्कीच दिसून येतो. परिणामी, गरोदरपणात होणार्‍या समस्येला सामोरे जावे लागते, जसे की बाळामध्ये अानुवंशिक व्याधी निर्माण होणे जसे की किडनीचे आजार, हृदयाचे आजार, अवयवाचे व्यंगत्व, कॅन्सर, मतिमंदपणा, ऑटिझम, थायरॉइड ग्रंथींचे आजार, मधुमेह, लठ्ठपणा, इत्यादी प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. तसेच बर्‍याच महिलांमध्ये गर्भजल कमी होण्याचा त्रास दिसून येत आहे.

याचे प्रमुख कारण ताणतणाव व आईचे खालवलेले स्वास्थ्य, गरोदरपणामध्ये आईची व्यवस्थित काळजी न घेणे. या सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण उपचार सुरू ठेवूनदेखील बर्‍याच महिलांमध्ये गरोदरपणातील समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचे कारण गर्भधारणेच्या वेळेस चुकीच्या पद्धतीत दोषयुक्त झालेली जेनेटिक कोडची स्थापना. आई-वडिलांची लैंगिक संबंध ठेवते वेळेसची शारीरिक व मानसिक स्थिती या जेनेटिक कोडच्या स्थापनेला करणीभूत असते.

समस्या दूर करायची, तर गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध वापरावे
आपल्या शरीरातील अवयव निर्मितीसाठी आवश्यक जीन्स हे वेगवेगळ्या न्यूक्लिक अॅसिडच्या साखळीतून बनलेले असतात. जे शरीरातील वेगवेगळ्या प्रोटीनसाठी लागणारी माहिती पुरवत असते. शरीराच्या व अवयवाच्या निर्मितीसाठी या प्रोटीन्सची प्रमुख भूमिका असते. प्रत्येक व्यक्तीचा जेनेटिक कोड वेगवेगळा असतो आणि त्यानुसारच त्याची शारीरिक व मानसिक घडण होत असते, दोन व्यक्ती एकसारख्या कधीच नसतात. कारण कुठलेही असू शकते; परंतु जर या जेनेटिक कोडमध्ये चुकीच्या पद्धतीने रचना झाली असेल, तर जीन्सकडून शारीरिक वाढीसाठी प्रोटीनला मिळणारी माहितीदेखील चुकीची जाते आणि त्याप्रमाणे शारीरिक दोष निर्माण होतात आणि भविष्यामध्ये भयंकर आजाराला सामोरे जावे लागते. या समस्येवर जर आपल्याला मात करायची असेल तर आपण होमिओपॅथिक औषधींचा गरोदरपणात तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने जरूर वापर करावा. कारण होमिओपॅथिक औषधी जीन्सवरदेखील कार्य करून होणारे दुष्परिणाम दूर करण्यास मदत करते.

वैयक्तिक चिकित्सेवर आधारित शास्त्र
होमिओपॅथी हे एकमेव असे शास्त्र आहे जे वैयक्तिक चिकित्सेवर आधारित असून यामध्ये प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी आहे हे शोधले जाते आणि त्यानुसार उपचार केले जातात, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते हे आजच्या आधुनिक जेनेटिक शास्त्राने शोधले असले, तरी हा सिद्धांत होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानिमन यांनी २०० वर्षांपूर्वीच मांडला आहे आणि त्याच सिद्धांतानुसार ही उपचार पद्धती काम करत आहे. जर आपण या उपचारांचा योग्य वेळी उपयोग केला, तर आपण भविष्यात उद्भवणार्‍या समस्येला टाळू शकतो.
डॉ. संजय ग. पडोळे, औरंगाबाद.
drsanjay.padole@gmail.com