आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्‍गोबाई! अरेच्‍चा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘एखाद्या स्त्रीला, कायम वा वारंवार, कामेच्छा होत नसेल आणि तिला किंवा जोडीदाराला याचा त्रास जाणवत असेल, तरच याला कामनिरसता म्हणता येईल,’ अशी एक सर्वमान्य व्याख्या आहे. निव्वळ एखादीला कामक्रीडेबाबत अनिच्छा आहे, पण याबाबत तिची काही तक्रार नाही, त्याचीही तिच्याबद्दल नाही आणि दोघांची एकमेकांबद्दलही काही तक्रार नाही; तर मग हा काही ‘आजार’ समजला जात नाही.
 
‘महिलांसाठी खास व्हायग्रा’ आलंय बरं का बाजारात. नेहमीप्रमाणे ते सध्या फक्त अमेरिकेत उपलब्ध आहे. पण येईल लवकरच, ‘इंडिया’त. ‘भारता’त यायला थोडा वेळ लागेल.
बातमीनुसार हे खास स्त्रियांसाठी निर्माण केलेलं कामेच्छावर्धक आहे. चांगलं देवाब्राम्हणांच्या साक्षीनं लग्न तर झालंय पण तिला आता ‘ह्यात’ काही इंटरेस्ट उरला नाही, ही स्थिती बऱ्याचदा आढळते. ‘निष्काम कर्मयोग’ हा एक प्रॉब्लेमच आहे, निदान या क्षेत्रात. आज काय डोकं दुखतंय, उद्या कंबर, परवा आणखी काही; हे असंच चालू राहातं मग. लांब राहावं म्हटलं तर नवऱ्याला वैताग, जवळ येऊ द्यावं म्हटलं तर बायकोला वैताग आणि डॉक्टरांना सांगावं म्हटलं तर त्यांनाही हे सगळं ऐकून घ्यायला आणि औषध द्यायला कटकटीचंच वाटतं.
 
बायकांच्या काम-निरसतेवर आधीही एक औषध होतं; टेस्टॉस्टेरॉन; म्हणजे तेच ते, पुरुष ज्या संप्रेरकामुळे ‘पुरुष’ बनतो ते! हा नर-रस नारीला कामेच्छावर्धक ठरतो. पण तो देणं जरा गोचीकारकच असतं. तो वापरता येतो त्यातल्या त्यात पाळी बंद झालेल्या बायकांच्यात. आता मुळात अशा हरी हरी करायच्या वयात हरित मन राखणाऱ्या किती? शिवाय त्याचे नको नको ते साइड इफेक्ट असतात. त्यामुळे हे टेस्टॉस्टेरॉन काही या क्षेत्रातलं मान्यताप्राप्त औषध नाही. म्हणून या नव्या औषधाचं, फ्लिबेनसेरीनचं कवतिक.
 
फ्लिबेनसेरीन हे काही, टेस्टॉस्टेरॉनसारखं, संप्रेरक नाही. मेंदूतल्या नसानसांत होणाऱ्या संदेशवहनात ढवळाढवळ करून ते कामेच्छावर्धक परिणाम साधतं. ते पुरुष संप्रेरक वगैरे नसल्यामुळे सगळ्या वयातल्या स्त्रियांना चालतं. पण सगळ्यांप्रती सारखाच परिणाम होतो असं मात्र नाही. भाग्याची अंगठी जशी कुणाला लाभते , कुणाला नाही; तसाच हा प्रकार. परिणाम जाणवायलाही किमान महिनाभर गोळ्या घ्याव्या लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्लिबेनसेरीनने ‘इच्छा’ वाढली तरी ‘तृप्ती’ची गॅरंटी नाही.
या फ्लिबेनसेरीननी प्रश्नांचं एक मोठं मोहोळच उठवलंय.
 
मुळात बायका हीच एक डोकेदुखी असल्याचं सार्वजनिक मत आहे, त्यात बायकांचा अभ्यास म्हणजे आणखी डोकेदुखी आणि त्यातही या असल्या बाबतीतला अभ्यास म्हणजे विचारायलाच नको. या बाबतीतला शास्त्रीय अभ्यास सुरू झाला मोकळ्याढाकळ्या अमेरिकेत. तिथल्या मास्टर्स आणि जॉन्सन जोडीनं कामचक्र वर्णिलं आहे. कामातुरता (arousal), उच्चस्तर अवस्था (plateau), कामतृप्ती (orgasm) आणि कामशमन (resolution) अशा टप्प्यांमधून कामक्रीडा जात असते. रोजमेरी बसून वगैरे संशोधकांनी लैंगिक उत्तेजना (stimulus) मग कामातुरता (arousal) मग कामेच्छा (desire) आणि मग कामतृप्ती (orgasm) असा क्रम मांडला आहे. रोजमेरी यांच्या मते पुरुषांची कामतृप्ती वीर्यपतनाशी संपते. स्त्रियांत मात्र कामतृप्ती (orgasm) हा शेवट नसून त्याद्वारे जोडीदाराशी मानसिक, भावनिक, प्रेममय तादात्म्य हा कळसाध्याय आहे.
 
स्त्रियांमध्ये आधी लैंगिक उत्तेजना (stimulus) मग कामातुरता (arousal) आणि मग कामेच्छा (desire) असा क्रम आहे आणि पहिल्या दोन पायऱ्या या सर्वस्वी वातावरण आणि जोडप्याच्या वागणुकीवर अवलंबून आहेत. गोळीवर नाहीत. गोळी खाल्यामुळे डायरेक्ट तिसरा अंक सुरू होणार काय? आणि झाला तरी पहिले दोन अंक न बघता तिसऱ्याची रंगत ती काय असणार? पुरुषांचे कामविचार, कामाचार ‘नाही संभोगसुख तर नाही प्रेमभावना’ या घोषवाक्यानुसार चालतात. पण स्त्रियांचं याच्या नेमकं उलट असतं; ‘प्रेमभावाशिवाय निरर्थक आहे संभोग’ हे त्याचं घोषवाक्य. हे प्रेम, समर्पण, तादात्म्य या गोळीनेच काय गोळीबारानेही साधता येणार नाही. फ्लीबेनसेरीन म्हणजे काही वशीकरण गुटी नाही.
 
लैंगिक आचारात, ‘नॉर्मल कामासक्ती’ कशाला म्हणायचं, हे एक त्रांगडंच आहे. नॉर्मल म्हणायचं कशाला, आणि ते मोजायचं कसं? अमुक इतक्या मिठ्या? तमुक इतके मुके? का अमुक अमुक काळात तमुक तमुक, कामुक चाळे? का अमुक वेळात तमुक वेळा संभोग? नॉर्मल कामासक्ती ठरवता ठरवता एवढी त्रेधा उडते तर कामनिरसता कशाला म्हणायचं हे ठरवणंही अवघड. शिवाय हा समागम कुणाशी? कसा? निव्वळ यौनमैथुन? का गुदमैथुनही? आणि मग मुखमैथुन? शिवाय हस्तमैथुनाचं काय? चालेल का नाही? आणि समलिंगी संबंध? एखाद्या समलिंगी संबंध ठेवणाऱ्या स्त्रीला फ्लीबेनसेरीन द्यायचं का नाही?
यातल्या काही किंवा सगळ्याला अनैसर्गिक मानणारी जनता आहे; या साऱ्याचा सुखेनैव उपभोग घेणारीही जनता आहे. ‘त्याची/तिची तयारी आहे, माझा होकार आहे, मग हरकत घेणारे तुम्ही कोण?’ हा त्यांचा प्रश्न आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र असं मानतं की, परस्पर सहमतीनं आणि पुरेशी स्वच्छता बाळगून हे होत असेल तर कुणी मधे पडायचं कारणच काय?
 
एकपतीव्रत/एकपत्नीव्रत हाच सध्याचा प्रस्थापित, समाजमान्य लैंगिक व्यवहार आहे. ‘व्रत’ म्हटलं की त्याबरोबर ‘वैकल्य’ही आलंच. वैकल्य म्हणजे स्वतः जाणूनबुजून भोगलेला त्रास. जीवशास्त्राला अशी दाट शंका, नव्हे खात्रीच आहे, की माणूस हा मूलतः अनेक जोडीदार राखणारा प्राणी आहे. तेव्हा माणसानं स्वतःवर लादलेलं एकपती/पत्नीव्रताचं बंधन हे अनैसर्गिक असून एक ‘वैकल्य’च आहे. तेव्हा कालानुक्रमे एकाच जोडीदाराबद्दलची असोशी कमी होत जाणारच; कामेच्छा सरत जाणारच. नभात चंद्रमा जरी तोच असला आणि एकांती कामिनीही जरी तीच असली तरी ‘ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी’ असा अनुभव येणारच. आता यावर गोळी हे उत्तर असूच शकत नाही. मुळात कामेच्छा उगवते कोठून हेच धड माहीत नाही तर कामनिरसतेचा काय अभ्यास करणार कप्पाळ! कामेच्छेवर परिणाम घडवणाऱ्या अनेक बाबी आहेत. आजारपण, वय, वयानुरूप कमी कमी होणारी संप्रेरके, नात्यातील ताणतणाव, भांडणे, नैराश्य निवारक औषधांचं सेवन, धार्मिक-सांस्कृतिक समजुती, कमअस्सल स्व-प्रतिमा, वगैरे वगैरे. शिवाय तिची तयारी आणि त्याचा होकार; किंवा, तिचा होकार आणि त्याची तैयारी, याचंही टायमिंग जुळायला हवं. गोळीने हे नक्कीच होणार नाही.
 
थोडक्यात वर नमूद कारणांपैकी कशाने तरी कामेच्छा गेली तर ती गोळीने थोडीच परत येणार आहे? मदन आणि रतीचे सूरच जर जुळत नसतील तर कितीही गोळ्या खाल्या तरी मदनबाण हुकणारच, रती कटाक्ष चुकणारच. ना मदन रतीरत होणार ना रती मदनरंगी रंगणार!
पण आपण कितीही आदळआपट केली, तरी कामविकार असतात हे सत्य आहे. त्यांचा जमेल तितका आणि जमेल तसा अभ्यास करायला हवा, हेही सत्य आहे. अशाच अभ्यासातून जी आहेत ती औषधं निपजली आहेत, हेही सत्य आहे. अभ्यास अवघड असला, तरी अशक्य नक्कीच नाही. तसं तर गर्भनिरोधन, टेस्ट ट्यूब बेबी वगैरे अशक्यच होतं एके काळी. तेव्हा प्रयत्ने किम् दरिद्रता?

अभ्यास करायचा तर कामनिरसतेची व्याख्या करायला हवी. ‘एखाद्या स्त्रीला, कायम वा वारंवार, कामेच्छा होत नसेल आणि तिला किंवा जोडीदाराला याचा त्रास जाणवत असेल, तरच याला कामनिरसता म्हणता येईल,’ अशी एक सर्वमान्य व्याख्या आहे. निव्वळ एखादीला कामक्रीडेबाबत अनिच्छा आहे, पण याबाबत तिची काही तक्रार नाही, त्याचीही तिच्याबद्दल नाही आणि दोघांची एकमेकांबद्दलही काही तक्रार नाही; तर मग हा काही ‘आजार’ समजला जात नाही. पण याच परिस्थितीचा जर कुणाला जाच वाटायला लागला, तर याला आजाराचं लेबल लावून, उपायाचा शोध घेणं आवश्यक आहे. बहुतेक कामविकारांच्या व्याख्या अशाच असतात.  (पूर्वार्ध)
 
 shantanusabhyankar@hotmail.com
बातम्या आणखी आहेत...