आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजुन मी विझले कुठे रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांसाठी व्हायग्रा बाजारात येऊ घातलंय, हे मागच्या लेखांकात वाचलं. औषध तयार करून त्याला एफडीएची मान्यता मिळेपर्यंतचा प्रवास वाचूया आजच्या पुढच्या भागात.
 
संबंधित व्यक्तीला जर प्राप्त परिस्थितीचा त्रास होत नसेल, तर वैद्यकशास्त्रानं तिथे नाक न खुपसणंच उत्तम. व्याख्येपाठोपाठ या विषयावरचे अनेक अभ्यास प्रसिद्ध झाले. काही अभ्यासकांच्या मते तब्बल ४३% महिलांना हा ‘त्रास’ जडला आहे म्हणे!
 
हे आकडे पाहता या अवस्थेला ‘विकृती’ म्हणण्याऐवजी ‘सहज प्रकृती’ का म्हणू नये असाही प्रश्न आहे. रे मोयनिहान या पत्रकाराने ब्रिटिश मेडिकल जर्नलमधील आपल्या निबंधात असा खुला आरोप केला आहे की, शास्त्रज्ञांनी काम-नीरसतेवर औषध वगैरे काही शोधलं  नसून एक तथाकथित औषध खपवण्यासाठी ‘काम-नीरसता’ या आजाराचा शोध औषध कंपन्यांनी लावला आहे. या आजाराची व्याख्या करू पाहणारे आणि यावर औषध शोधणारे सगळेच औषध कंपन्यांना मतलेले आहेत. निसर्गतःच कमी अधिक होणारी कामासक्ती, आजाराच्या व्याख्येत कोंबून, त्यावर ‘इलाज’ विकण्याचा हा धंदा! जी गोष्ट ४३% जनतेला लागू आहे, त्याला ‘आजार’ कसं म्हणावं बरं? उलट एका सुंदर आणि आत्यंतिक व्यक्तिनिष्ठ अनुभवाचं हे टोकाचं वैद्यकीयीकरण आहे! शुद्ध बाजारीकरण आहे!
 
पण अभ्यासक म्हणतात, जिचं जळतं तिला कळतं. प्रत्यक्ष रुग्णांचे अनुभव न बघता निव्वळ लांबून शेरेबाजी करणं सोपं आहे, प्रसिद्धीही सहज मिळते पण अंतिमतः ते अहिताचंच आहे. व्यसनाधीनता, नैराश्य एवढंच काय वयानुरूप होणारी गुडघ्यांची झीज आणि गुडघेदुखीही, आधी आजारात मोडली जात नव्हती. पण या साऱ्यावर आज अभ्यास आहेत, उपाय आहेत आणि यापासून फायदा झालेले शेकडो लोक आहेत. तेव्हा अभ्यासली कामनीरसता आणि शोधलं औषध तर त्यात एवढं बावचळण्यासारखं काय आहे? प्रवास चुकतमाकत, ठेचकाळतच होणार आहे, पण म्हणून आधीच हातपाय गाळून बसून कसं चालेल? औषधांचे शोध लागतात तसे आजारांचेही लागतात हे सत्यच आहे. कामनीरसता बहुआयामी आहेच, त्याचे उपायही तसेच असतील. गोळी हा फक्त एक पर्याय आहे. औषधांचा उपचार हा, समुपदेशन वगैरे अन्य उपायांबरोबर करायचा आहे. तेव्हा गोली को गोली मारो, वगैरे फिजूल आहे.
 
दुसरीकडे स्त्रीवाद्यांचा प्रत्येक गोष्टीला आक्षेप आहे. त्यांच्या मते बायकांना काय वाटतं ते आजवर पुरुषच परस्पर ठरवत आलेत. स्त्रियांची कामभावना, कामतृप्ती वगैरे निव्वळ पुरुषी दृष्टिकोनातून अभ्यासली गेली आहे. बहुसंख्य संशोधक हे पुरुष असल्यामुळे असं होणारच. अगदी वैद्यकीय महाविद्यालयातल्या शरीरशास्त्राच्या पुस्तकातील स्त्री जननेंद्रियांच्या चित्रालासुद्धा त्यांचा आक्षेप आहे. या चित्रांमध्ये योनिमार्ग अगदी रुंद दाखवलेला असतो. वास्तविक तो अगदी फटीसारखा असतो. शिष्निका हा स्त्रीचा सर्वात महत्त्वाचा काम-अवयव असतो, पण वैद्यकीय पुस्तकात या शिष्निकेला काडीइतकीही किंमत दिलेली नसते. पुरुषकेंद्री कामविज्ञानाचा भर यौनसंबंध कसे सौख्यपूर्ण होतील यावर आहे तर स्त्रियांचे कामसौख्य शिष्निकेच्या मर्दनात सामावले आहे. लिंगाचा योनिमार्गात प्रवेश होणं, समागम होणं, स्त्रीला कमी महत्त्वाचं आहे. (योनिमार्गाच्या बाहेरच्या तीनचार सेंटिमीटर पल्याड स्पर्श संवेदनाच नसतात, पण लिंगाच्या लांबीला पुरुषांच्या नजरेत अवास्तव महत्त्व आहे. लिंगवर्धक, निरुपयोगी (पण प्रसंगी उपद्रवी) उपायांचं मार्केट चांगलंच तेजीत आहे.) बरेच पुरुष वीर्यपतन झालं की, हतवीर्य होऊन झोपून जातात. स्त्रीच्या कामतृप्तीसाठी शिष्निका मर्दनाची जबाबदारी त्यांच्या गावीही नसते. आपली ही गरज नवऱ्याच्या कानावर घालण्याइतका संवादही नसतो. गोळीमुळे कामेच्छा वाढली तरी तृप्तीची गॅरंटी नाही ते यामुळेच. ‘तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे? अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे?’ हा अनुभव आपल्याला वाटतो त्यापेक्षा सार्वत्रिक आहे!!
 
या क्षेत्रातल्या शास्त्रीय अभ्यासाला बळ आलं ते व्हायग्राच्या यशामुळे. १९९८मध्ये व्हायग्राचा जन्म झाला. लिंगाला ताठरता येण्यासाठी हे चांगलंच लागू पडलं. हे नसांवर नाही तर लिंगाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर परिणाम करतं. लिंगाला होणारा रक्तपुरवठा व्हायग्राने वाढतो आणि परिणामी लिंगाची ताठरता वाढते. पुरुषांना फायदा होतो, तर स्त्रियांनाही काही ना काही तरी फायदा असणारच; अशा विचारांनी याही दिशेने संशोधन जोरात सुरू झालं. आठ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ‘व्हायग्रा’ फेम फायझर कंपनीनी व्हायग्राचा स्त्रियांच्या कामविकारांवर काहीही उपयोग नसल्याचं सांगत, संशोधन थांबवलं. याबाबतीत जननेंद्रियांवर नाही, तर मेंदूवर असर करणारं औषध हवं, असं या टीमचं मत पडलं. फ्लिबेनसेरीन हे नेमकं असंच औषध आहे. मूलतः नैराश्यनिवारक म्हणून अभ्यासलेल्या या औषधाचा हा कामेच्छावर्धक पैलू लक्षात आल्यावर त्या दिशेनं संशोधन सुरू झालं. पण हे सारं संशोधन सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलं. औषध कंपन्यांच्या आश्रयाने ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर द स्टडी ऑफ विमेन्स सेक्शुअल हेल्थ’ अशा भारदस्त नावाची एक संस्थादेखील स्थापन झाली. औषध कंपन्यांची तळी उचलून धरणं हे हिचं काम. लगोलग विरुद्ध गटाकडून लैंगिकतेच्या या वैद्यकीयीकरणाविरुद्ध, बाजारीकरणाविरुद्ध चळवळी सुरू झाल्या. फ्लिबेनसेरीनचा जन्म २००९चा पण एफडीए मान्यता मिळायला २०१५ उजाडलं. छप्पन प्रश्न आणि सतराशे साठ शंका. शिवाय यात मोठं अर्थकारण, औषधकारण, स्त्रीकारण, पुरुषकारण गुंतलेलं.

एफडीएच्या मान्यतेला जसजसा वेळ लागायला लागला तसतसं वेगवेगळी मंडळी आपापली मत अधिकाधिक चढाओढीनं मांडायला लागली. कंपन्यांच्या आश्रितांनी मान्यता ताबडतोब मिळावी असा सूर लावला तर स्त्रीवादी आघाडीतल्या ‘अवर बॉडीज अवर सेल्व्ज’वाल्यांनी अमान्यता ताबडतोब मिळावी असा! ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर द स्टडी ऑफ विमेन्स सेक्शुअल हेल्थ’नं चार हजारावर सह्यांचं निवेदनच एफडीएला पाठवलं. ताबडतोब मान्यता मिळावी असं यात हिरीरीनं मांडलं होतं. मग सह्यांची प्रतिमोहीम निघाली. पण मान्यता देऊ नये म्हणणाऱ्या ६५२च सह्या मिळाल्या. वाढतं वय, घटता प्रणय, ताणलेले नातेसंबंध, वगैरेमुळे सुस्तावलेली कामेच्छा जर गोळीसरशी जागृत होणार असेल, तर ही तारुण्यगुटी हवीच होती सगळ्यांना. ‘फायदा नाही झाला, तर नाही वापरली गोळी, पण उपलब्ध असायला काय हरकत आहे?’ असा हा विचार.
 
स्त्रीवाद्यांविरुद्ध एका गटाने ‘फिट्टमफाट मोहीम’ राबवली. ‘स्त्रियांसाठी जीवनावश्यक नसेना का, पण ‘काम-जीवनावश्यक’ असलेल्या औषधाला मान्यता देण्यात, जाणूनबुजून दिरंगाई होते आहे! हा मुळी एफडीएच्या लिंगभेदी दृष्टिकोनाचा सणसणीत पुरावाच आहे!’ असा सनसनाटी आरोप केला गेला. ‘मेली पुरुषांसाठी तेवढी हीsss सारी औषधं (त्या वेळी पुरुषांच्या काम विकारांसाठी तब्बल २६ औषधं मान्य होती.) आणि आम्हा बायकांना काहीच नाही? पुरुषी षड््यंत्रच आहे मुळी हे! बायकांची वेळ आली की अस्सेच कच खातात मेले सगळे पुरुष! आत्ताच्या आत्ता मान्यता द्या, द्या, द्या!’ असा एकूण युक्तिवाद होता. पुढे या फिट्टमफाटवाल्यांनी सोळा खासदारही आपल्या बाजूला जुंपले, साठ हजारांवर सह्या गोळा केल्या, आणि प्रचाराची राळ उडवून दिली. एकूणच मान्यता दिली तरी पुरुषी षड््यंत्र आणि न द्यावी तरीही पुरुषी षड््यंत्र असा मामला होता. २०१४च्या ऑक्टोबरमध्ये एफडीएने याप्रकरणी दोन दिवस सुनावणी घेतली. अनेक संस्था, गट, तज्ज्ञ, अधिकारी यांच्यासह काही कामनीरसताग्रस्त अशा पेशंट बायकाही तिथे हजर होत्या. शेवटी १८ विरुद्ध ६ असा निकाल फ्लिबेनसेरीनच्या बाजूनं लागला!
(उत्तरार्ध)
 
shantanusabhyankar@hotmail.com

लेखाचा पूर्वार्ध वाचण्‍यासाठी क्लिक करा खालील लिंकवर...
अग्‍गोबाई! अरेच्‍चा!
बातम्या आणखी आहेत...