निसर्गोपचारात तज्ज्ञांनी अनेक प्रयोग करून मातीमधील पुढील औषधी गुणधर्म शोधून काढले आहेत. जवळजवळ सर्व प्रकारच्या व्याधी-विकारांवर माती उपचार लाभदायक होतात. सर्व रसायनांचे मिश्रण मातीत आहे. म्हणून अनेक औषधांचा उपयोग करून जो फायदा होत नाही, तो फायदा एका माती उपचाराने होतो.
विषशोषक गुण : विंचू, मधमाशी, साप, कुत्रा चावला असल्यास शरीरात विषाचा प्रवेश होतो. त्या ठिकाणी मातीलेप लावल्यास विष बाहेर खेचण्यास मदत होते.
वेदनाशामक गुण : कानदुखी, दातदुखी, संधिवातातील वेदना, मणक्याचे विकार, सायटिका विकार यातील वेदना मातीपट्टी किंवा मातीलेप केल्यास कमी होतात.
रोगनाशक गुण : मातीत असलेल्या विद्युतशक्तीमुळे शरीरात कुठेही होणारा बिघाड माती उपचारांनी बरा होतो. आयुर्वेदाच्या ग्रंथात मातीच्या या गुणाचे वर्णन आहे.
रासायनिक गुण : सर्व रसायनांचे मिश्रण मातीत आहे. म्हणून अनेक औषधांचा उपयोग करून जो फायदा होत नाही, तो फायदा एका माती उपचाराने होतो.
समतोल गुण : मातीमध्ये थंडी व उष्णता यांना रोखून ठेवण्याचा गुण आहे. त्यामुळे कोणत्याही ऋतूत मातीचे उपचार करता येतात. या गुणामुळेच साधू किंवा तपस्वी अंगाला माती लावून थंडी व उन्हापासून स्वत:चे संरक्षण करतात.
चुंबकीय गुण : मातीचे उपचार शरीरावर केल्यास मातीतील या गुणामुळे शरीरातील दोष गतिमान होऊन बाहेर पडतात. तसेच मातीतील चुंबकीय गुणामुळे शक्ती, स्फूर्ती व आरोग्य मिळते.
सात्मीकरण गुण : मातीपासून सर्व चेतन व अचेतन पदार्थांची निर्मिती होते व शेवटी सर्व मातीमध्ये मिसळते. तसेच मातीचा रचनात्मक गुण आहे. त्यामुळे फाटलेली, कापलेली त्वचा भरून येण्यास मदत होते.
रक्ताभिसरण संतुलन गुण : पोटावर मातीपट्टी ठेवल्याने पोट मऊ राहते. जमिनीवर पायी अनवाणी चालल्याने तळपायांचे रक्ताभिसरण वाढून ते नरम, मऊ व लालसर होतात.
बांधक व धारण गुण : माती द्रव्य कोणत्याही द्रव पदार्थाचे जास्तीत जास्त शोषण करते. म्हणून जुलाब होत असताना पोटावर मातीपट्टी ठेवल्यास ते कमी होतात. माती लावून स्नान केल्याने त्वचा विकार व अस्थिविकार दूर होतात.
उष्णताशामक गुण : माती ही थंड असल्याने उष्णतेच्या सर्व विकारावर चांगला उपयोग होतो. विशेषत: भाजल्यामुळे होणार्या जखमा, आग कमी होते. तसेच भाजल्याचे डाग नष्ट होतात. चेहर्यावरील उष्णतेमुळे येणारी मुरमे माती लेपाने नष्ट होतात.
निर्मलक गुण : संशोधनावरून असे सिद्ध झाले आहे की मातीमध्ये निर्माण होणार्या खाद्यपदार्थात व शरीरात एकाच प्रकारची तत्त्वे असतात. म्हणून नैसर्गिक आहार सुरू केल्यावर सर्व विकार मुळापासून नष्ट होऊ लागतात. त्याचप्रमाणे माती उपचारांनीही हीच क्रिया होते.
- माती लेपामुळे त्वचारंध्रे खुली होतात. रक्ताभिसरण या क्रियेला गती येऊन त्यातील विजायतीय पदार्थ बाहेर पडतात. संधिवात विकारातील सूज, वेदना, ठणक व विजायतीय पदार्थ दूर करण्यासाठी माती लेपाइतका प्रभावी उपचार दुसरा कोणताच नाही.
डॉ. शशिकांत गोरवाडकर, कन्नड, जि. औरंगाबाद