आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Shilpa Bendale Article About Work family Balance

मृद्गंध काल-आज उद्याचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबकेगौरी नारायणि नमोऽस्तुते॥
या श्लोकानुसार स्त्रीत्वाचा अंश आपल्याला लाभला हे महाभाग्य आपले. याविषयीचा पट उलगडताना मनस्वी आनंद होत आहे.
नवे युग नव्या संधीचे. या संधीचा फायदा करून घ्यायचा आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची संधी असल्याने नैसर्गिक न्याय तत्त्वाने स्त्री पुढे जात राहील. अशा वेळी जागतिक महिला दिनी गरज आहे ती आपण स्वत:ला ओळखण्याची. जग तिच्याविषयी, तिच्या क्षमतेविषयी, कर्तबगारीविषयी काय म्हणते यापेक्षा आपला स्वत:वर किती विश्वास आहे हे अधिक महत्त्वाचे. मी सक्षम आहे, सबल आहे याची जाणीव तिला व्हायला हवी. नवे युग वेगवान आहे. रडूबाईंना ते उगाच सांभाळत नाही तर प्रवाहाबाहेर फेकून देते.
तर महिला सशक्तीकरणाच्या उद्देशाने साज-या होणा-या या आंतरराष्‍ट्रीय महिलादिनाची, एका विशेष दिवसाची गरज आहे का? किंवा महिला जन्मापासूनच सशक्त व मजबूत नसते का? ती सशकक्त तर आधीपासूनच आहे, मजबूतही आहे. गरज आहे ती परिवर्तनाची, तिला समजून घेण्याची व संधी देण्याची. अशीच संधी मलाही मिळत गेली आणि सुनंदा चौधरीची प्रा. शिल्पा बेंडाळे झाली.
भूतकाळात शिरले आणि खरोखर जाणीव झाली, एक स्त्री दुस-या स्त्रीला कर्तृत्व, मातृत्व, नेतृत्व या सगळ्या बाबींची जाणीव करून देत असते. माझेही असेच. आई वत्सलाकडून कर्तृत्वाचा वारसा घेतला आणि तो जोपासत सासरी पर्दापण झाले. संमिश्र भावनांनी आपण प्रवेश करतो, परंतु आले तर जाणवले इथेही माझ्या सासूबाई अन्नपूर्णा यांच्याकडूनही आपणास ब-याच गोष्टी शिकण्यासारख्या, घेण्यासारख्या आहेत. वेळेचे व्यवस्थापन आणि कामातील चोखपणा हे त्यांचे गुण अगदी वाखाणण्यासारखे. गृहिणी असल्या तरी संपूर्ण संसाराची जबाबदारी त्यांचीच आणि त्यांच्या या कुशल नेतृत्वामुळेच तर घरात प्रथितयश 4 डॉक्टर आणि 1 उद्योजक होऊ शकलेत. माझी आई व सासू यांच्याकडून कर्तृत्व आणि नेतृत्वाचा आदर्श घेऊन मातृत्वात आले आणि मातृत्व जोपासत असताना कर्तृत्व आणि नेतृत्वाला झळाळी देण्यासाठी उच्च शिक्षण घेतले. ते घेताना तारेवरची कसरत. परंतु एक स्त्रीच दुस-या स्त्रीला समजून घेत असते तेव्हा घरातून स्त्रीचाच फार मोठा पाठिंबा व सहयोग मिळत गेला. या सहकार्यामुळेच एका नामांकित शैक्षणिक संस्थेत व्यवस्थापनशास्त्र विभागात जबाबदारी साभाळण्याची संधी मिळाली. करिअरचा माझा ग्राफ उंचावत असतानाच माझा रोल बदलला आणि मी आता सासूबाईच्या भूमिकेमध्ये शिरले.
खरोखरच जबाबदारीची जाणीव जास्तच झाली आणि मी एक स्त्री म्हणून दुस-या मुलीला किती व कशी प्रोत्साहित करू शकेन, हे मोठे आव्हानच ठाकले. सूनेतून सासूमध्ये होणारे परिवर्तन आणि सासूचा वारसा चालवणा-या सुना काजल आणि सोनल, दोघी भारतात उच्चविद्याविभूषित, परंतु अमेरिकेत राहून सांसारिक जबाबदारी सांभाळत पुढे शिकत आहेत. अंतर फार असल्याने दररोजची आमची मदत शक्य होत नाही, परंतु आठवडाअखेर दिलखुलास गप्पा, विचारांची देवाणघेवाण, अडचणींवर मात करण्याचे मार्ग यावर सखोल चर्चा होते आणि कदाचित यातूनच त्यांना पुढील आठवडा सुखकर होण्याचा मार्ग मिळत असतो. अर्थात मुलांचाही शंभर टक्के पाठिंबा आहेच.
आता चौथी पिढी म्हणजे नात केया. तिची आठवण झाली की, शोभा भागवतांच्या ती माझी मुलगीच्या सुरात सूर मिसळून गुणगुणावसे वाटते
ती माझी नात, तिची चित्रं
तिची मांजरी, तिची खेळणी
सर्व तिच्या छोट्या छोट्या कर्तृवाच्या खुणा...
थकूनभागून आलेली तिची आई काजल आपला सर्व थकवा विसरते व पुन्हा उत्साहाने व जोमाने कामास लागते. मला स्काइपवरून वर्णन करून सांगते किंवा दाखविते तेव्हा ऊर अभिमानाने भरून येतो.
ही मुलगी, ही माझी नात
ही माझे प्रतिबिंब
ही माझ्या कर्तृत्वाचा वारसा नक्की चालवेल.
अशा प्रकारे कुटुंबात स्त्रियांनी येणा-या पिढीला सक्षमता, स्वावलंबन व आत्मविश्वासाचा आदर्श दिला आणि ते जोपासण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला.
skbendale@yahoo.com