आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्‍वत:चं बाळ हवचं?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदललेली जीवनशैली, आहारविहाराच्या सवयी, ताणतणाव, लग्न करताना वाढलेले वय अशा एक ना अनेक कारणांनी आजकाल वंध्यत्वाचे प्रमाण वाढलेले आहे. परंतु मूल हवंय का आणि का हवंय, या दोन प्रश्नांची उत्तरे अनेकदा खुद्द त्या जोडप्याकडेच नसतात, असं मांडणारा हा लेख. 


रविवारची सकाळ आणि फोन वाजला. 
पलीकडनं विनंती करण्यात आली. “डॉक्टर, आमच्या डाॅक्टरांनी आजचं इंजेक्शन सकाळीच घ्यायला सांगितलंय. प्लीज तुम्ही येऊ शकाल का?”


फॅमिली फिजिशियन म्हणून तुम्ही काम करत असाल आणि त्यातही डोळे उघडे ठेवून आणि बुद्धी ठिकाणावर ठेवून जर गोष्टी पाहत असाल, तर काही गोष्टी तुम्हाला भयंकर अस्वस्थ करतात. त्यातलीच एक, वंध्यत्वासाठी उपचार घेणाऱ्या आणि अलीकडे जवळपास रोज हार्मोनल इंजेक्शन घ्यायला येणारी जोडपी.


बदललेली जीवनशैली, आहारविहाराच्या सवयी, ताणतणाव, लग्न करताना वाढलेले वय अशा एक ना अनेक कारणांनी आजकाल वंध्यत्वाचे प्रमाण वाढलेले आहे. वंध्यत्व का? कशामुळे? त्याची कारणे आणि उपाय यासाठी हा लेखनप्रपंच मुळीच नाही. वेगळ्याच मुद्द्यांचा विचार आपण समाज घटक म्हणून सर्वांनी करायला हवा असे एकूण भयावह परिस्थिती पाहून वाटते. जी जोडपी IUI (Intra uterine Insemination) , IVF (In Vitro Fertilisation) किंवा ICSI (Intra cytoplasmic sperm injection) अशा किंवा कृत्रिम पध्दतीने गर्भधारणेसाठी प्रयत्न करत आहेत किंवा असे प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नाही, मग त्यानंतर पुढे काय, या प्रश्नावर वैद्यकीय अंगाने नाही पण समाज म्हणून आपल्या धारणांवर विचार व्हावा असे वाटते.


शारीरिक : वंध्यत्वासाठी जेव्हा उपचार चालू असतात, तेव्हा त्या स्त्रीला खूप साऱ्या चाचण्या आणि हार्मोनल इंजेक्शनना सामोरे जावे लागते. तो या उपचारांचा अपरिहार्य भाग आहे. पण या काळात तिला अत्यधिक शारीरिक आणि मानसिक ताणाला सामोरे जावे लागते. उपचार काळात हार्मोनल इंजेक्शनमुळे अनेक शारीरिक बदल होतात, कधी कधी त्याचे परिणाम आयुष्यभर राहू शकतात.


या काळात जोडप्यांचे लैंगिक संबंध जवळजवळ नसल्यातच जमा असतात. त्यामुळे दोघांच्या नात्यावर होणारे परिणाम, त्याचा विचार होतच नाही. असा विचार करणे त्या दोघांनाही आवश्यक वाटत नाही.


मानसिक : या उपचारानंतरही गर्भधारणा होईलच, गर्भधारणा झाली तरी मूल होण्यापर्यंतचे सारे टप्पे सुरळीत पार पडतीलच याबद्दल कोणताही खात्रीशीर अंदाज लावणे थोडे कठीणच असते. जन्म आणि मृत्यू या दोहोंबाबत मानवी मर्यादा असतात.


उपचाराच्या प्रत्येक टप्प्यावर ही जोडपी प्रचंड मानसिक ताणाखाली असतात; पण उपचाराच्या यशासाठी हा ताण कमीत कमी हवा किंवा नकोच, असे असायला हवे. पण खेदाने असे म्हणावेसे वाटते की, स्वतः उपचार घेणारी जोडपी आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर या गोष्टीला महत्त्वच देत नाहीत. प्रयोगशाळेतील गिनिपिगवर चालावे तितक्या यांत्रिक पद्धतीने हा उपचार चालू असतो. (काही डॉक्टर याला अपवाद असतील.) बहुतांश ठिकाणी हीच परिस्थिती आहे.


आर्थिक : या उपचारांसाठी होणारा खर्च हजारांपासून सुरू होऊन काही लाखांच्या घरात जातो. उच्च आर्थिक स्तरावर या गोष्टी शक्य असतील. माझ्याकडे येणारा किंवा आजूबाजूला दिसणारा मध्यमवर्ग आपली जमवलेली सारी पुंजी, वेळप्रसंगी कर्ज काढून हे उपचार करतो. उपचाराला यश आले तर एक समाधान असते, पण हेच उपचार अयशस्वी झाला तर उमेदीची सारी वर्षे आणि आर्थिक पुंजी फक्त या एका गोष्टीवर खर्च करण्याएवढे या उपचारांना महत्त्व द्यावं का, याचा विचार करणे आवश्यक नाही का?


सामाजिक : या एका मुद्द्यावर ग्रंथ लिहिता येऊ शकेल, थोडक्यात लिहायचा प्रयत्न करेन.
खरं तर दोघांना मूल हवं असणं व त्यासाठी प्रयत्न करणं, ही दोन व्यक्तींमधील अत्यंत खाजगी गोष्ट असायला हवी. आपल्या कुटुंब आणि समाज रचनेमुळे या गोष्टीचा विनाकारण इतका गाजावाजा केला जातो की, मूल नसणं त्या दोघांच्या जीवनमरणाचा किंवा कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विषय होतो. त्यातही स्त्रीवर (कोणाच्या शारीरिक दोषामुळे गर्भधारणा होत नाही हा मुद्दाच गौण) सासरच्या कुटुंबाकडून अपेक्षांचे ओझे अती असते (अपवाद कमीच) मग दोघेही वरील मुद्द्यांसोबत स्वतःच्या कुटुंबीयांमुळेच जास्त भरडले जातात. आपल्याला मूल हवं आहे का, हे ठरवण्याचा अधिकार आणि खाजगीपण फक्त आणि फक्त त्या जोडप्याला हवा. इतर कुणाचीच ढवळाढवळ त्यात असण्याचे कारण नाही.


प्रत्येक जोडप्याने लग्न किंवा कोणत्याही पद्धतीने एकत्र राहायचे ठरवल्यावर
आपल्याला मूल हवं आहे का?
हवं असल्यास, नेमकं का हवं आहे?
या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत.


सगळ्यांना हवं असतं किंवा सगळ्यांना मुलं असतात म्हणून आम्हालाही हवं, असला भंपकपणा नको. ती एक आयुष्यभरासाठी आपण स्वतःहून निवडलेली बांधीलकी आहे आणि तिला योग्य न्याय देण्यासाठी अखंड प्रयत्न करणं गरजेचं असतं, याचं भान सतत हवं. ते आम्हाला आहे का?


मूल झाल्यावरही त्याला वाढवण्याविषयी आमच्या दोघांचे स्वतंत्र आणि दोघांचे मिळूनही काही विचार आहेत का? आहेत तर ते नेमके काय आहेत? त्यात जोडपं म्हणून अंशतः तरी मतं जुळतात का? आणि जी मते अगदी टोकाची विरोधी आहेत त्यात जुळवून घेण्याची दोघांची तयारी आहे का?


याविषयी त्या दोन व्यक्तींचे विचार तरी पुरेसे स्पष्ट हवेत. सर्वात महत्त्वाचं, स्वतःचं मूल असणं आणि त्याला वाढविणं ही एक आनंददायी आणि आयुष्याचा खूप मोठा भाग व्यापणारी प्रक्रिया आहे. पण फक्त मूल असणं आणि त्याला वाढवणं हेच संपूर्ण आयुष्य नाही. किंवा आनंदी, सुखी आणि समाधानी असण्याचं एकमेव परिमाण नाही. याचं भानही व्यक्ती आणि समाज म्हणून आपण विकसित करणं आवश्यक आहे.

 

स्वतः रोपटं लावून ते रुजताना, वाढवताना, वाढताना पाहणं आनंददायी असतंच. पण एखाद्या वेळी ते शक्य नसेल तर आपण एखादं तयार रोप आणून त्याची काळजी घेऊन ते वाढवण्याचा विचार करायला हरकत काय आहे? मला दत्तक प्रक्रियेविषयी सुचवायचं आहे. या विषयालाही भरपूर कांगोरे आहेत, त्याविषयी परत कधी तरी.


- डॉ. सोनाली वाळवेकर शेटे, नवी मुंबई

बातम्या आणखी आहेत...