आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Sunilkumar Lawate Article About Dogari Language

सुईचं क्षेपणास्त्र बनवून लढणारी ‘डोगरी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही भाषेचं वैभव त्या भाषेच्या बोलीवर अवलंबून असतं. ज्या भाषेला बोलीचं वैविध्य लाभतं, ती विषय आणि आशय दोन्ही अंगांनी समृद्ध होत राहते. बोलींची समृद्धी तिच्या लोकसाहित्यावर अवलंबून असते. लोकसाहित्य हे मौखिक, ऐकीव परंपरांवर उभं असतं. त्याला पिढ्यांची परंपरा असते. पण तिचा निर्माता, निर्माती मात्र अनामिक, अनामिका... अज्ञात! अलीकडच्या काळातील ज्या बोलींना भाषेचा दर्जा प्राप्त झाला, अशा बोडो, संथाली, मैथिली, मणिपुरी भाषांपैकी पाच लक्ष लोकांची बोली असलेली डोगरी अशी एकमात्र भारतीय भाषा आहे, जी भाषा होऊनही तिच्यात बोलीत लिहिण्याची परंपरा अखंड राहिली आहे. त्याचं कारण ती पहाडी प्रदेशात उमटत, घुमत राहिली, त्या प्रदेशाला लाभलेल्या निसर्गाचं ते वरदान ठरली आहे. निसर्ग आणि संस्कृतीचं एक अलिखित अद्वैत पूर्वापार चालत आलंय! निसर्ग जितका प्रतिकूल, संपर्क, विकासापासून दूर तितकी संस्कृती, परंपरा, बोली, रीतिरिवाज मजबूत, अटळ, अपरिवर्तनीय... स्थितीशील!
डोगरी अन्य भाषांप्रमाणेच मुळात एक बोली होता.

या बोलीची मुळं दूर अफगाणिस्तानातील कुर्द जमातीपर्यंत पोहोचतात. ही भाषा तशी इंडो-युरोपीय परिवारातली. भारतीय भाषा परिवारापुरतं बोलायचं झालं, तर ती इंडो-आर्यन, उत्तर-पश्चिमेकडची म्हणजे, पाक व्याप्त काश्मीर(आझाद काश्मीर)च्या मीरापूर नि मुझफ्फराबाद आणि भारताच्या जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब प्रांतात बोलली जाणारी भाषा, पाकिस्तानात तिला पहाडी म्हणतात तर भारतात डोगरी. डोगरी भाषी स्वत:ला डोगरा (डोग्रा) म्हणवून घेतात. त्यांचा प्रदेश (डुगर) म्हणून ओळखला जातो. डोगरा लँडचं (बोडो लँड, नागालँड, गुरखालँड) त्यांचं स्वप्न आहेच. डोगरी भाषिकांची संख्या पाच लक्षच्या घरात आहे. ही भाषा देवनागरी, तक्री, पारशी-अरेबिक, गुरुमुखी, शारदा इत्यादी लिप्यांतून लिहिली जात असली तरी, तिचं ध्रुवीकरण आता देवनागरीत होत आहे. प्रशासन, शिक्षण, मुद्रण, माध्यम, सार्वत्रिकतेची गरज त्यामागे आहे.

डोगरी भाषेचं प्राचीन साहित्य लोककथा, लोककाव्य, कोडी, हुमान, वाक्प्रचार, म्हणी, लोकगीतं यांच्या रूपात आजही सुरक्षित आहे. ते मौखिक परंपरेनं तसंच लिखित परंपरेनं विकसित होत राहिलं आहे. ती परंपरा वैयक्तिक, समूहात्मक तशीच संस्थात्मकही आहे. लोककथांचे डोगरीत अनेक प्रवाह आढळतात. मिथकीय, गूढ गुंजनात्मक, साहसी कथा आहेत, तशा बोधकथाही. त्यात हास्य, विनोद आहे आणि व्यंगही. संत आणि भक्तांच्या लोककथाही विपुल. (‘वबौर’, ‘बब्बरूवाह‌्न’ ‘अर्जन’, ‘उलपी’, ‘तोता-मैना’, ‘मिरग ते गिद्द’, ‘आलसी पुत्तर’, ‘कालीवीर’, ‘बावा जित्तो’, ‘माता वैष्णो देवी’ इत्यादी. ‘चक्की’, ‘मख्खी’, ‘न्हेरा' (तारा), अशी रुखवतं (कोडीही), हिरदा(हृदय, दिल), गला, कन्न (कान), दंद (दांत), सिर, अक्ख(डोळे), अंबर(आकाश) अशा शब्दांतून तर ही भाषा पंजाबी, हिंदीचे मिश्रण असल्याचे स्पष्ट होते.

डोगरीत पारंपरिक गाण्यांचं उधाण पाहायला मिळतं. लग्न, बारसं, ओटी भरणं, पाठवणी अशा अनेक गाण्यांच्या परंपरा आहेत. लग्नात स्त्रिया पुरुषांचे वस्त्रहरण करणारी गाणी गातात. त्यात रेवडी उडवणं असतं, तसं मनातील भडास ओकण्याचा पण भाव. विशेष म्हणजे, लग्नात मुख्यमंत्री आले आणि स्त्रियांची गाणी सुरू असतील, तर त्यांचीही सुटका नसते. पुरुष ही गाणी कान लावून ऐकत असतात. दाद देतात. हा प्राचीन ‘फिश पाँड’चा कार्यक्रम म्हणजे, लग्नातील बहार असतो. (मेंदी, रुखवत, शृंगार, शिकायती अशी गाणीपण आहेत. ‘घोडिया’, ‘सोहाग’, ‘सिठनिया’, ‘बोल्लिया’ गाणी ताल, ढोलक, टाळ्या, नाच, फेर इत्यादींनी सादर केली जातात. ती लता मंगेशकर, किरण सिंग, मलिका पुरवराज यांनीही गायली असून त्याच्या अ‍ॅडिओ, व्हिडोओ कॅसेट््स प्रत्येक घरात, कानात (मोबाइल अ‍ॅप्स) गुंजत असतात. युवा वर्ग ती विशेष चवीने ऐकतात, पाहतात.) लोकगीतांना डोगरी चित्रपट, अल्बम, व्हिडिओत विशेष स्थान असून नव्या काळातही लोकगीते आपली अभिरूची, अभिजातपण टिकवून असल्याने नवे, कवी, कवयित्री बोलीतच काव्य लिहिताना दिसतात. उत्सव गीते, प्रेमगीते (विरह), पोवाडे, भजन, आरती, गुजरी, भेटां, बारां, कारकां, सोआडी अशी अनेक प्रकारची लोकगीत परंपरा म्हणजे, डोगरीचं जितजागतं वैभव!

डोगरी लिखित साहित्याची परंपरा इसवी सनाच्या १६व्या शतकापासून सुरू झाली. पण पूर्वार्धात अत्यंत अल्प साहित्य लिहिलं गेलं. ते हिंदी, हिंदुस्तानी (उर्दूप्रचुर हिंदी), पंजाबी, ब्रज अशा भाषा प्रभावांचं लेखन होतं. प्रारंभीची लिखित परंपरा काव्यानं सुरू झाली. मानक चंक (१५६५), गंभीर रास (१६५०) हे कांगडा संस्थानचे राजे रूपचंद आणि नूरपूरच्या जगत सिंहाचे क्रमश: दरबारी कवी होते. त्यानंतर देवी दत्ता (दत्तू) यांनी ही परंपरा विकसित केली. ते १८व्या शतकात जम्मूचे राजे रणजीत देव यांचे दरबारी वा राजकवी होते.

पण ज्याला आधुनिक डोगरी काव्य म्हणून संबोधलं जाईल, अशी कविता मात्र २०व्या शतकाच्या मध्यापासून दिसून येते. समकालीन कवितेचा वा आधुनिक कवितेचा नमुना म्हणून ज्या ‘गुतलूं’ काव्यसंग्रहाकडे पाहिलं जातं, तो १९४०च्या दरम्यानचा. त्याचे कवी होते, दिनुभाई पंत. अवघ्या सात कवितांचा हा संग्रह. त्यात शेतकरी, मजुरांच्या व्यथा, ढोंग, पुढारपण, स्वातंत्र्याची उत्सुकता, दु:खं, व्यंग अशा विषय, शैलीच्या अनेक छटा आहेत. १९४० ते १९६०च्या दरम्यान स्वामी ब्रह्मानंद तीर्थ, ठाकूर रघुनाथ सिंह संन्याल, शंभुनाथ शर्मा आणि रामलाल शर्मा यांच्या काव्याने डोगरी काव्यरसिकांवर आपली मोहिनी टाकली होती. त्यांच्या प्रभावाने नंतर दिनुभाई पंत, रमानाथ शास्त्री, यश शर्मा, वेद पाल दीप, परमानंद अलमस्त, तारा स्माइल पुरींसारखे कवी लिहीत राहिले.

१९५० नंतर तर डोगरीत कवितेचा महापूर आला. अक्षरश: हजारो कवी उदयाला आले. न लिहिणारा आळशी अशी स्थिती. पण त्यातून नाव कमावलं ते मात्र केहरी सिंह मधुकर(१९२९), पद्मा सचदेव(१९४०), चरण सिंग(१९३१-१९६९) यांनी. पहिल्या दोघांना नंतर अनुक्रमे १९७१ व १९७७मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले. या पुरस्कारांची परंपरा नंतरच्या काळात कुन्वर वियोग-‘घर’(१९८०), जितेंद्र उधमपुरी- ‘एक शहर यादें दां’(१९८१), शिव राम ‘दीप’ - ‘गामलेन दे कॅक्टस’(१९८४), रामलाल शर्मा- ‘रत्तु दा चनन’(१९८८), मोहनलाल सपोलिया "सोध समुंदरेन दी’(१९८९), तारा रामयलपुरी- ‘जीवन लहरें’(१९९०), वेरिंदर केसर- ‘निघे रंग’(२००१), चंपा शर्मा- ‘चेतेन दी होल’(२००८), सीताराम सपोलिया- ‘दोहा सतसई’(२०१३) या कवी आणि त्यांच्या वरील काव्यसंग्रहांनी वर्धिष्णू केली.

डोगरी कथेचा प्रारंभ भारतीय स्वातंत्र्याबरोबर मानला जातो. बी. पी. साठे लिखित ‘पैहला फुल्ल’ने डोगरी कथा उदयाला आली. ललिता मेहतांच्या ‘सुई धागा’, नरेंद्र कुंजरियांच्या ‘नीला अंबर, काले बादल’, वेद राही लिखित ‘आले’, मदन मोहन शर्मांच्या ‘दुद्ध लहू ते चैह‌्न’ अशा रचनांतून डोगरी कथेनं आपलं स्थान भारतीय कथा साहित्यात स्थिर केलं. ओम गोस्वामींच्या ‘सुन्ने दी चिरे’(१९८६), दीनबंधू शर्मांच्या ‘मील पत्थर’, कृष्णन शर्मांच्या ‘ढाल दी सुप्पे दा सेक’(२००५) आणि मनोज लिखित ‘पंद्रह कहानियाँ’ला अलीकडचे साहित्य अकादमी पुरस्कार लाभल्याने त्यांच्या कथांचे अनुवाद विविध भारतीय भाषांत होत राहिल्याने डोगरी कथेची ओळख आता भारतात वेगळी अशी राहिली नाही.
निबंध, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्र, आत्मकथा, कोश वाङ‌्मय, भाषांतरे अशा विविध रूपात आजचा डोगरी लेखक लिहितो आहे. (श्रीनिवास विकललिखित ‘फुल्ल बिना दली’ (१९७२), नरसिंह देव जमनालांची ‘सांझी धरती, बखले माहनु’ (१९७८), शिव देवसिंह ‘सुशिल’ लिखित ‘बखरे बखरे सच’ (१९९७) यांसारख्या कादंबर्‍या म्हणजे पहाडी जीवनाचे चलचित्रच होय.) ‘अछूत’ नाटकाने सुरू झालेली डोगरी नाट्यपरंपरा ‘बाबा जित्तो’, ‘टिक्करी’, ‘नमां ग्रां’सारखी नाटके टिकवून आहेत.

‘जनौर’, ‘अयोध्या’, ‘काला सूरज’ प्रायोगिक नाटके म्हणून डोगरीत उल्लेखनीय मानली जातात. शिवाय आकाशवाणी, दूरदर्शन मार्फत ही छोटी-मोठी नाटके, एकांकिका, श्रुतिका यांचे प्रसारण प्रक्षेपण जम्मू, सिमला केंद्रांवरून होत असते.
आजच्या घडीला डोगरीला राजाश्रय प्राप्त झाल्याने ती शिक्षण, प्रशासन, माध्यमाची भाषा म्हणून विकसित होत आहे; पण घराघरातून मात्र शिक्षणाच्या इंग्रजी आग्रहाने तिचे नव्या पिढीशी नाते तुटते आहे. (एकीकडे साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, केंद्रीय भारतीय भाषा संस्थान, म्हैसूर, जम्मू विद्यापीठ, हिमाचल विद्यापीठ, काश्मीर विद्यापीठ यांसारख्या संस्था डोगरी भाषा, साहित्य, संशोधन, अध्ययन, अध्यापन, प्रचार, प्रसार कार्य करत आहेत.) ती भारतीय राज्यांची राजभाषा आणि भारतीय राज्यघटनेच्या ८व्या परिशिष्ठान्वये भारतीय भाषा बनली आहे. राष्ट्रीय भाषांतर अभियानाद्वारे डोगरीत अनेक अनुवाद होत आहेत. सी-डॅक मार्फत अनेक डोगरी अ‍ॅप्स, सॉफ्टवेअर्स विकसित होत आहेत. परंतु डोगरी शिकणारी विद्यार्थी संख्या कमी होणे, हा अन्य भारतीय भाषांप्रमाणे तिच्यापुढेही असणारा अस्तित्व आणि अस्मितेचा प्रश्न होऊन बसला आहे.

अलीकडेच मी डोगरी कवी ज्ञानेश्वर यांची ‘वंश वाचवू पाहणारी चिमणी’ नावाची कविता वाचली. चिमणी विरुद्ध बहिरी ससाण्याच्या जीवघेण्या अस्तित्व रक्षणाची ही कथा. पूर्वी चिमणी गवताच्या काड्यांनी घर बांधायची. तेव्हा ती एकटी असायची, आता ती झुंडीनं राहते. शिवाय काड्यांचं नाही, काट्यांचं घर बनवते. पिलांच्या तोंडात ती बाहेर जाताना सुया टोचून जाते. बहिरी ससाण्यापासून पिलांना वाचता यावं म्हणून. कुणी शिकवलं, त्या छोट्या चिमणीला सुईचं क्षेपणास्त्र बनवायला? काळासारखा दुसरा शिक्षक नाही आणि शिक्षणही!
drsklawate@gmail.com