आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr Sunilkumar Lawate Article About Kalingi Language

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलिंगी लिपी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओडिया भारतीय गणराज्यातील भाषिक संख्येच्या आधारावर दहाव्या क्रमांकाची भाषा. ही भाषा ब्राह्मी लिपीत लिहिली जाते. तिची पूर्व रूपं अशोकाच्या कलिंग येथील शिलालेखांत आढळतात. म्हणून या लिपीस कलिंगी लिपी म्हणूनही ओळखलं जायचं.

ओरिसाची भाषा, ओडिया. कुणी त्याला उडिया, उरियाही म्हणतात. दक्षिण व उत्तरेस जोडणारा प्रांत म्हणून ओरिसा राज्याचं महत्त्व. हे राज्य बिहार, मध्य प्रदेश, आंध्र, पश्चिम बंगालच्या सीमांनी घेरलेलं आहे. नदी नि समुद्राचं वरदान लाभलेलं हे राज्य. महानदी, ब्राह्मणी, वैतरणीसारख्या महानद्यांनी हा प्रदेश समृद्ध झालेला आहे. पण ओरिसा जगभर प्रसिद्ध आहे, तो पुरीच्या जगन्नाथ मंदिरामुळे नि कोणार्कच्या सूर्यमंदिरामुळे! इथल्या जगन्नाथांनी कुणाला नाही आकर्षित केले? विद्यापती, विश्वावसु, नानक, कबीर, तुलसी, मीरा इ. सर्व संत कवींनी इथे पायधूळ झाडल्याच्या आख्यायिका सांगितल्या जातात. त्यामुळे इथल्या भाषा आणि साहित्याची परंपरा मध्य काळापूर्वीपासून असल्याचं स्पष्ट होतं. जैन, बौद्ध, शैव, शाक्त, वैष्णवादि सर्व धर्म नि दर्शनांमध्ये जगन्नाथ आहे. याचं कारण, त्याचं सर्वांना आपल्यात सामावून घेणं! सर्वधर्मीसमानत्व!!

ओडिया भारतीय गणराज्यातील भाषिक संख्येच्या आधारावर दहाव्या क्रमांकाची भाषा. जगात सुमारे चार कोटी ओडिया भाषी आहेत. पैकी ३ कोटी २० लक्ष ओरिसा राज्यात आहेत. शेजारच्या आंध्र, बिहार, पश्चिम बंगालमध्येही ओडिया भाषिकांची (नजरेत भरण्याइतकी संख्या) आहे. या आधुनिक आर्य भाषेस सुमारे हजार वर्षांची परंपरा आहे. उरजंगमध्ये सापडलेला, सन १०५१चा शिलालेख ओडिया भाषेचा सर्वाधिक जुना, प्राचीन पुरावा मानला जातो. बत्री, छत्तीसगढी, लरिया, संबळपुरी, मिदनापुरी अशा अनेक बोलींचं संयुक्त रूप म्हणजे, ओडिया भाषा. ही भाषा ब्राह्मी लिपीत लिहिली जाते. तिची पूर्व रूपं अशोकाच्या कलिंग येथील शिलालेखांत आढळतात. म्हणून या लिपीस कलिंगी लिपी म्हणूनही ओळखलं जायचं. अशोक या भूमीत तलवार घेऊन आला होता. इथं त्यांनी असा काही नरसंहार केला होता, की त्याच्या घोड्याला पाय ठेवायला जागा उरली नव्हती. रक्ताचे पाट वाहिले इथे नि प्रेतांचे खच पडलेही इथेच! याच भूमीत त्याचं हृदय परिवर्तन झालं. तो बौद्ध धर्मी झाला. ‘देवानां प्रिय अशोक’ झाला तो इथेच!

ओडिया भाषेची मूळ रूपं आपणास विविध प्राचीन शिलालेखांप्रमाणेच ओडिया भावगीते, वीरगीते इ.च्या स्वरूपात दिसून येतात. ‘बौद्धगान ओ दोहा’मध्ये असलेली भावगीते अपभ्रंश भाषेत लिहिलेली आहेत. या गीतांत ओरिसामधील डोंगर-दर्‍यांत जीवन कंठणार्‍या शेतकर्‍यांचं जीवन, भावविश्व, आशा-आकांक्षा यांचं वर्णन आहे. तर वीरगीतांत ओरिसातील पूर्वजांचं टोळीजीवन, भटकंती, समुद्र पर्यटन, व्यापार यांचं चित्रण आढळतं. अन्य भारतीय भाषांप्रमाणेच ओडियात ‘रामायण’, ‘महाभारत’ आधारित महाकाव्ये प्राचीन काळी लिहिली गेली. त्यातून संस्कृतचा ओडिया भाषेवरील पूर्व प्रभाव स्पष्ट होतो.

अठराव्या शतकात उपेंद्र भंज, अभिमन्यू सामंतसिंहार, दीनकृष्ण दासरचित काव्ये प्रसिद्ध होती. ‘चौतीसा’, ‘कोईली’, ‘पदी’, ‘बोली’, ‘लीला’ अशा प्रकाराने ही काव्य रचली गेली. एकोणिसाव्या शतकात काव्यवैविध्य राहिलं. पण प्रभाव होता, शृंगार काव्याचा. विसावं शतक प्रबोधन, जागरण, सुधारणांचं ठरलं. असा संक्षिप्त इतिहास घेऊन येणार्‍या ओडिसा साहित्याचा पाया रचण्याचं श्रेय ‘पंचसखा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाच वैष्णव कवींना दिलं जातं. ते म्हणजे बलराम दास, जगन्नाथ दास, अच्युतानंद दास, यशोवंत दास, अनंतदास. यांनी ओडिया भक्तिकाव्य परंपरा समृद्ध केली. ओडिया भाषेचे व्यास म्हणून ओळखल्या जाणार्‍या सरळादास यांनी ‘चंडी पुराण’ रचलं. उपेंद्र भंज यांनी महाकाव्य परंपरा सुरू केली. चैतन्य महाप्रभु व जयदेव यांच्या शृंगारी नि शास्त्रीय काव्याने प्राचीन ओडिया साहित्य आलंकारिक नि कालात्मक झालं. महान कंघ कवी भीमा भोई अंध होते. निरक्षर, निर्धन, आदिवासी असलेला हा कवी प्रतिभासंपन्न होता नि विचार श्रीमंतही! १९व्या शतकाचा उदय इंग्रजांच्या ओरिसा आगमनाने झाला. त्यांच्यामुळे ओडिया भाषेस आधुनिकता लाभली खरी, पण ओडिया नि इंग्रजी समांतर विकसित झाल्या. पण एकीचा प्रभाव, परिणाम दुसरीवर झाला, असं मात्र दिसत नाही.

ओडिया आधुनिक साहित्याचा प्रारंभ १९व्या शतकाच्या उत्तरार्धात झाला. या काळात राधानाथ, मधुसुदन या कवींचं काव्य उदयाला आलं. सन १८७३मध्ये ‘उत्कल दर्पण’ मासिक सुरू झालं. या नियतकालिकाने ओडिया आधुनिक साहित्य विकासास गती दिली, असं मानलं जातं. याशिवाय या काळातले उल्लेखनीय कवी म्हणून फकीर मोहन सेनापतींना ओळखलं जातं. त्यांनी ‘रामायण’, ‘महाभारत’चे ओडियामध्ये अनुवाद केले. ‘पुष्पमाला’, ‘उपहार’ या त्यांच्या काव्यकृतींना मोठा वाचक प्रतिसाद लाभला. या कवीत्रयींची परंपरा पुढे गंगाधर मेहेर, नंदकिशोर बाल यांनी चालविली. स्वातंत्र्योत्तर ओडिया काव्यावर कवींद्र रवींद्रनाथ टागोर, मनोवैज्ञानिक फ्रॉइड, समाजशास्त्री कार्ल मार्क्स, कवी वॉल्ट व्हिटमन यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. डॉ. सच्चिदानंद राउतरायाची ‘कविता-१९६२’, श्री बैकुटनाथ पटनायक लिखित ‘उत्तरायण’, डॉ. सीताकांत महापात्रांची ‘शब‌्द र आकाश’, प्रतिभा सत्पथींची ‘तन्मय धूली’, फणी मोहंती लिखित ‘मृगया’ हे काव्यसंग्रह, काव्यकृती उल्लेखनीय ठरून, त्यांना साहित्य अकादमीचे पुरस्कार लाभले. पुढे सीताकांत महापात्र यांना सन १९९३चा भारतीय ज्ञानपीठाचा पुरस्कार लाभला, तो त्यांच्या काव्यातील ‘अहम’ आणि ‘इदम’च्या तात्त्विक विवेचनामुळे. अलीकडच्या ओडिया काव्यात स्त्रीवादी भाव प्रवासिनी महाकुडसारख्या कवयित्रीच्या काव्यात प्रकर्षाने प्रतिबिंबित होताना दिसतात-

मत कहो मुझे
देवी मत कहो
सालभर में एकाध बार
प्रार्थना से मैं नारी
नारी की गरिमा
मोहक कामना
और आसक्ति की
मोहक छुअन के साथ
जीवित रहीं मैं ऐसी ही
रही विराजमान हमेशा।

स्वातंत्र्योत्तर ओडिया गद्य काव्याप्रमाणेच समृद्ध आहे. कादंबरीच्या प्रांतात गोपीनाथ महांती श्रेष्ठ होत. त्यांच्या ‘माटीमटाल’ कादंबरीस सन १९७३चा ज्ञानपीठ पुरस्कार लाभला, तो या कादंबरीतील उत्कृष्ट ग्रामीण जीवन चित्रणामुळे. कान्हुचरण महांती, नित्यानंद महापात्र, राजकिशोर पटनाइक, श्रीमती कल्पनाकुमारी देवी यांच्या कादंबर्‍या ओडियात प्रसिद्ध मानल्या जातात. कथालेखनात मनोज दास, किशोरी चरण दास, अखिल पटनाइक, नीलमणी महापात्र यांचे नाव आघाडीवर आहे. डॉ. सत्यनारायण राजगुरूची ‘मो जीवन संग्राम’ आणि पथनी पट्टनायकांची ‘जीबनारा छलपथे’ या आत्मकथा ओडियात गाजल्या. मनोरंजन दास हे ओडियाचे प्रसिद्ध नाटककार. ‘अरण्य फसल’ हे त्यांचं गाजलेलं नाटक. ओडियात निबंधलेखनाची मोठी समृद्ध परंपरा आहे. डॉ. हरेकृष्ण मेहताब, गुरूचरण पटनाइक, चित्तरंजन दास, सरतकुमार मोहांती यांचे निबंध वैविध्यपूर्ण आहेत.

विशेष म्हणजे, ‘अभिजात भाषा’ म्हणून मान्यता मिळालेल्या संस्कृत, तेलुगू, तमीळ, कन्नड, मल्याळम भाषांबरोबर गतवर्षी ओडिया पण अभिजात भाषा म्हणून मान्य झाली आहे. या मान्यतेने ती प्राचीन तर ठरलीच, पण तिचे व्यवच्छेदकत्व यामुळे सिद्ध झाले. गोपीनाथ मोहंती आणि डॉ. सच्चिदानंद राउतराय यांच्यानंतर सन २०११ला तिसरे ज्ञानपीठ ओडियाला मिळवून देणार्‍या डॉ. प्रतिभा राय या अलीकडच्या काळातील उल्लेखनीय साहित्यकार होत. ‘मनन्मति’, ‘अदिभूमि’, ‘महामोह’, ‘यज्ञसेनी’, ‘महारानी पुत्र’ या त्यांच्या बहुचर्चित साहित्यरचना आहेत. कादंबरी, कथा, प्रवासवर्णन, निबंध असं विविधांगी लेखन करणार्‍या डॉ. प्रतिभा राय शिक्षक, प्राध्यापिका म्हणून तर प्रसिद्ध आहेतच; परंतु चेकॉव्ह, ओ हेन्रींसारखं प्रभावी कथात्मक लेखन करून ओडिया कथा, कादंबरी परंपरा समृद्ध केली, असं मानलं जातं. त्यांचा ‘उल्लंघन’ हा २१ कथांचा संग्रह ओडिया वाचकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे.

ओडिया भाषा आणि साहित्याच्या आधुनिक युगास शतकाचा काळ लोटला आहे. ब्रिटिशांनी सन १८०३मध्ये ओरिसा काबीज केला. सन १८०७ मध्ये त्यांनी पहिली गोष्ट कोणती केली असेल, तर बायबलच्या नव्या कराराचं ओडियात भाषांतर करून प्रसिद्ध केलं. त्यानंतर सुमारे साठ एक वर्षांनंतर एतद्देशीय मुद्रणालय ओरिसात सुरू झालं आणि ‘उत्कल दीपिका’ पत्रिका प्रकाशित झाली. भाषा आणि साहित्याच्या व्यापक विकासानंतरही आजचं ओडियाचं चित्र म्हणावं तितकं आशादायी नाही. आर्थिक, शैक्षणिक विकासाच्या गतीअभावी अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत आधुनिकतेचे शिवधनुष्य पेलण्यास ओडिया असमर्थच आहे. संगणकाच्या आजच्या युगात ‘विकी’ प्लॅटफॉर्म ओडियाला लाभला तरी तिचे वापरकर्ते अल्प आहेत. भाषांतर क्षेत्रात ओडियाला मोठी मजल मारायची आहे. डोंगराळ निसर्ग, संपर्क साधनांची चणचण नि अडचण, निरंतर नैसर्गिक आपत्ती पाचवीला पुजलेल्या... या सर्वातून ओडियाला विकासाचा मार्ग आक्रमायचा आहे. केवळ अभिजात भाषा जाहीर झाली म्हणून तिची विकास दारे उघडतील नि विकास वारे वाहू लागतील, अशी आशा करणे स्वप्नरंजन ठरेल. त्यासाठी भाषिक अस्मिता व साहित्यिक प्रतिबद्धता या दोन्ही आघाड्यांवर ओडिसाला संघर्ष, प्रयत्न करावे लागतील; तर ती अन्य भारतीय भाषांप्रमाणे प्रगतीपर राहू शकेल. ज्ञानपीठ विजेते ओडिया कवी सीताकांत महापात्र यांनी आपल्या ‘नीरवता और कवि’ या कवितेत हीच भावना व्यक्त केली आहे-

ताकती रहती है
चातक-सी सर्वसहा वसुंधरा
एक शब्द गढ़ा जाएगा
इसके लिए है जरुरी
सौ जन्म और सौ मृत्यु!
आजची ओडिया भाषा नि तिचं साहित्य याच प्रतीक्षेत आकांक्षेच्या आकाशाकडे डोळे लावून त्या कायाकल्पाचे स्वप्न पाहात आहे.

drsklawate@gmail.com