आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Sunilkumar Lawate Article About Tamil Language

तामीळचे आदानप्रदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडच्या काही दिवसांत भाषा आणि साहित्याच्या प्रांतात तामीळ भाषा सर्वतोमुखी झाली आहे. त्याचं कारणही समकालीन असं आहे. या भाषेतील वर्तमान लेखक पेरूमल मुरूगन यांनी सन २०१२मध्ये ‘मधोरुबागन’ (अर्धनारीश्वर) नावाची कादंबरी लिहिली होती. ‘पेंग्विन’ या जगप्रसिद्ध प्रकाशनाने ‘वन पार्ट वुमन’ नावाने तिचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध केला आणि ती जगभर चर्चेचा विषय होऊन राहिली. या कादंबरीत पेरूमल मुरूगन यांनी आपल्या गावी असलेल्या अर्धनारीश्वर मंदिरात प्रचलित असलेल्या प्रथेवर प्रकाश टाकला आहे. त्या परिसरात ज्या स्त्रीस अपत्य होत नाही, ती या मंदिरात येते. आपल्या पसंतीच्या पुरुषाला वरते. त्याच्यापासून झालेलं अपत्य ते दांपत्य आपलंसं करतं, अशी परंपरा होती. या उल्लेखामुळे आपली, आपल्या गोंडूर समाजाची बदनामी झाली, असा आक्षेप घेत काही सनातनी विचाराच्या लोकांनी या कादंबरीवर बंदी घालण्याची मागणी केली. आपल्याअभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार्‍या या मागणीने विकल होत पेरूमल मुरूगन यांनी आपल्यातील ‘लेखकाच्या मृत्यूची’ घोषणा करत लेखन न करण्याचा निर्णय जाहीर केल्यानं तामीळ भाषा जगभर चर्चेत आली आहे.

तामीळ द्राविडी किंवा दक्षिणी भाषांतील प्राचीन भाषा आहे. इसवी सन पूर्व ६००च्या आधीपासून या भाषेत साहित्य निर्मिती होते आहे. भारतीय भाषांचे आकर्षण असलेल्या आचार्य विनोबा भावे आणि साने गुरुजींना या भाषेने कोणे एकेकाळी भुरळ घातली होती. साने गुरुजींनी स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात असताना ‘तिरुक्कुरळ’चे मराठी भाषांतर केले असून त्याचा फार मोठा वाचकवर्ग मराठीत आहे. तेलुगू, कन्नड, मल्याळम या द्राविडी भाषांपेक्षा तामीळ भाषा अधिक समृद्ध मानली जाते. एम. श्रीनिवास अय्यंगार या भाषा वैज्ञानिकांच्या मतानुसार तर आर्य भाषा परिवारात जे स्थान संस्कृत भाषेचे आहे, तेच द्राविडी भाषा परिवारात तामीळचे. पाश्चात्त्य भाषाशास्त्री सर डेविड‌्सनी तर लिहून ठेवलं आहे की, या भाषेचे शब्द संस्कृत, हिब्रू, ग्रीक सारख्या श्रेष्ठ जागतिक भाषांत आढळतात. अगस्ती ऋषींनी तामीळ भाषेत आयुर्वेद, शिल्पकला, खगोलशास्त्रावर, शिवाय ज्योतिषावर लिहिण्याचं सांगितलं जातं. तामीळ भाषेची स्वत:ची अशी स्वतंत्र लिपी आहे. बारा व अठरा व्यंजने इतक्या तोकड्या अक्षरांवर उभी ही भाषा; पण तिची परंपरा मात्र तीन हजार वर्षांची आहे. हिंदी, मराठी भाषांचा इतिहास अवघ्या हजार एक वर्षांचा. त्यावरूनही या भाषेचं प्राचीनत्व लक्षात येतं.

तामीळ वाङ‌्मयाची तीन अंगं मानली जातात - इयल (साहित्य), इशै (संगीत) आणि नाटकम् (नाट्य). तामीळ भाषेत संत तिरुवळ्ळूवरचे महत्त्व असाधारण असे आहे. या भाषा व साहित्याचा पाया त्यानं रचला, असं सांगितलं जातं. ‘तिरुक्कुरळ’ हे काव्य त्याचंच. ‘शिलप्पधिकारम‌्’ हे तामीळचं श्रेष्ठ महाकाव्य मानलं जातं. याशिवाय तामीळची ‘मणिमेखलै’, ‘जिवक-चिंतामणा’, ‘वळयापति’ इत्यादी काव्य प्रसिद्ध आहेत. शैव आणि वैष्णव संप्रदायाच्या अनेक संतांनी जे विपुल भक्ती-साहित्य रचलं ते तामीळ भाषेतच. वात्सल्यरसप्रधान भारतीय काव्य परंपरेत आळवार कवीत पॅरियाळवार कवी श्रेष्ठ मानला जातो, तो तामीळ भाषिकच. रामायणाची विविध भारतीय भाषांत रूपांतरं आढळतात. त्यात तामीळ कवी कंबनचं ‘कंब रामायण’ जगप्रसिद्ध आहे. ते किती, याचं माझंच उदाहरण सांगतो. मी १९९०मध्ये काही काळ युरोपच्या विविध देशांच्या दौर्‍यावर होतो. भारत-फ्रान्स मैत्रीमार्फत सांस्कृतिक आदान-प्रदानाचा तो कार्यक्रम होता. फ्रान्सचं एक छोटसं गाव आहे - मेझ (Metz). त्या छोट्या गावात (खेड्यात) एक भाषा विद्यापीठ होतं. तिथं एक प्राध्यापक भेटले.
ते फ्रेंच गृहस्थ. पण शिकत होते चक्क जर्मन आणि संस्कृत. मी भारतातून आलोय म्हटल्यावर त्यांनी मला विचारलं, की तुम्ही किती रामायणं वाचलीत. हा प्रश्नच मुळी मला बुचकळ्यात टाकणारा होता. मला एकच रामायण तोपर्यंत माहीत होतं, ‘वाल्मिकी रामायण’. त्यानंतर फार तर गदिमांचं ‘गीत रामायण’. त्यांनी इंग्रजीत कंबन तामीळ कवीचं ‘कंब रामायण’ वाल्मिकी रामायणापेक्षा कसं वेगळं आहे, ते चक्क तीन तासांच्या दीर्घ डिनर कोर्समध्ये सुनावलं होतं. त्या दिवशी प्रथम मला कळलं, की तामीळ भाषेचं साहित्य किती ‘ग्रेट’ आहे.

परवाच आपले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय संदेशात गुरुदेव रवींद्रनाथांइतकंच महत्त्व कवी सुब्रह्मण्यम भारती यांचं असल्याचं अधोरेखित केलं होतं. अरुमुग नावलर, नागनाथ, पंडितर, दामोदर पिळै, डॉ. स्वामीनाथ अय्यर, वेदनायकम पिळ्ळै, चक्रवर्ती राजगोपालाचारी, पुदुमैपित्तन, कु. प. राज गोपालन, आर. कृष्णमूर्ती, रंगनाथ, वे सुब्रह्मण्य अय्यर, रा. रांघवैयंगार सोमसुंदर, डॉ. राधाकृष्णन या तामीळ साहित्यकार, विद्वत‌्जनांचे विचार, साहित्यकृतींचे भारतीय भाषांतील अनुवाद प्रसिद्ध आहेत.

सन १९७५मध्ये तामीळ भाषेस पहिलं ज्ञानपीठ मिळवून देणारे अखिलन ‘चित्तिस्पावै’ कादंबरीमुळे भारतीय लेखक बनले. ही कादंबरी हिंदीसह अनेक भाषांत उपलब्ध आहे. त्यांची ‘बसेरा’ कहानी हिंदीत मी वाचल्याचं आठवतं. ‘सारिका’ या हिंदी पाक्षिकानं ज्ञानपीठ विशेषांक सन १९८५च्या प्रारंभी प्रकाशित केले होते. त्यात या कथेस आवर्जून स्थान दिलं गेलं होतं. तामीळ कथाकार शिवशंकरी यांच्या ‘गिद्ध’ कथेचा सरस्वती रामनाथ यांनी केलेला अनुवाद माझ्या वाचनात आहे. तामीळ कविता ‘तार-तार जिंदगी’ कल्याणजी यांनी लिहिली असून डॉ. सुमति अय्यर यांनी ती हिंदीत भाषांतरित केली आहे. ‘वह नन्ही चिड़िया’ पण के. आनंद यांची त्यांनीच अनुवादली असल्याचं आठवतं. अखिलनांची आणखी एक कथा ‘पैसा और प्यार’ हिंदीत आहे. डॉ. के. ए. जमुनांनी तिचं हिंदी भाषांतर केलं आहे. महाराष्ट्रातील हरिकथा तामीळनाडूमध्ये हिंदी कवी कबीर, मीरा, तुलसी यांची पदं नेऊन पोहोचली होती, असे उल्लेख तामीळ भाषा इतिहासात आढळतात. अठराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मानल्या केलेल्या शरमोजी यांनी तंजावरमध्ये राज्य स्थापलं. त्या काळातही तामीळ भाषा व साहित्य विकासास मोठा हातभार लागला होता. म्हणून तामीळ भाषिक महाराष्ट्राचे ऋण मान्य करतात.

इसवी सनाच्या तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीच्या सेनेने मलिक खुसरोच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूवर आक्रमण केलं. त्या काळात मदुराई परिसरात इस्लामचा मोठा प्रसार झाला. अनेक पठाण तामिळनाडूमध्ये स्थायिक झाले. परिणामी आज पश्तो भाषेत अनेक तामीळ शब्दांचा सुळसुळाट दिसतो. उलटपक्षी तामीळ समजला जाणारा ‘दोशै’ (दोसा) (जो भारतातल्या सगळ्या उपहारगृहात अधिराज्य गाजवतो) तो शब्द पश्तो भाषेच्या ‘दोदाई’चं अपभ्रंश रूप होय. रोटी आणि दोदाई हे भाकरीचे पर्याय असलेले शब्द भारताला मिळाले ते पठाणांमुळे; पण तामीळ भाषेच्या माध्यमातून अकबराच्या काळात जमिनीचं मोजमाप करणारे व अन्य मापन संज्ञा - एकर, शेर, तोळा, मण, गज सर्व तामीळमध्ये आहेत; पण ते मराठी शासकांमुळे तामीळमध्ये गेले असल्याची नोंद तामीळ इतिहासात आढळते.

भारतीयार या तामीळ भाषांतरकाराने रवींद्रनाथ आणि टॉलस्टाय यांच्या काही साहित्याचे तामीळमध्ये भाषांतर केल्याचे दिसते. हे भारतीयार म्हणजे राष्ट्रकवी सुब्रह्मण्य भारती. एकोणचाळीस वर्षांचं अल्पायुष्य भारतींना मिळालं, पण त्यांनी अल्पकाळात तामीळ भाषा जगभर पोहोचवली व साहित्य अकादमीच्या माध्यमातून विपुल तामीळ साहित्य भारतीय भाषांत अनुवादित झालं आहे. रा. पी. सेतुपिल्ले यांचा निबंधसंग्रह ‘तामीळ इन्बम’ अनेक भाषांत आला आहे. कल्कि यांची कादंबरी ‘अलै-ओशै’ स्वातंत्र्यपूर्व काळाचं दक्षिणेचं राजनैतिक चित्रण सजीव करते. ‘अलै-ओशै’चा अर्थ आहे - गाज. लाटांचा आवाज. काळाच्या चित्रणास समुद्र लाटांशी जोडत रचलेली ही प्रतीकात्मक कादंबरी, सामान्य वाचकाचाही ठाव घेते.

‘चक्करवर्तितिरुमगन’ ही राजाजी लिखित रामायण कथा अनेक भारतीय भाषांत गेली आहे. डॉ. मु. वरदराजन यांची कादंबरी ‘अगल विळक्कु’ गुणविहीन बुद्धिमानापेक्षा गुणवान अल्पशिक्षित श्रेष्ठ कसा, हे समजावते. मी. प. सोमसुंदरम् यांचं ‘अक्करै शिमैयिल’ हे प्रवासवर्णन युरोपच्या सोळा देशांचं जिवंत वर्णन. ते प्रवासवर्णनात श्रेष्ठ मानलं गेलंय. अखिलन यांची कादंबरी ‘वेंकयिन मैन्दन’ साहित्य अकादमी पुरस्कारामुळे भारतीय वाचकांत एकेकाळी मोठी चर्चित कृती होऊन राहिली होती. रामानुजाचार्य यांच्या जीवनावर आधारित पी. श्री. आचार्य लिखित ‘श्री रामानुजर’ ही साहित्यकृती सर्व वैष्णव संप्रदायी वाचकांच्या गळ्यातली ताईत बनून गेली. २९ अध्यायातली ही रचना विशिष्टाद्वैत तत्त्वज्ञानाचा भारतभर प्रचारक बनून केली. असंच चरित्र प्रकाशनाचं आंतरभारती कार्य म. पो. शिवज्ञानम यांच्या ‘वळ्ळलाराकण्ड ओरूमैप्पाटु’ या कृतीने केले. वळ्ळलार हे तामीळनाडूचे मोठे समाजसुधारक व विचारक. चिनी आक्रमणानंतर लिहिलेली ‘वीरर उलगम’ ही साठोत्तरी कालखंडात विशेष वाचली गेलेली साहित्यकृती. तामीळ काव्यात वीरकाव्याचा मोठा प्रवाह आहे. त्यात वीरश्रीची विविध रूपं प्रतिबिंबित आहेत. त्या आधारे वर्तमानात वीरकाव्याचं पुनरुज्जीवन करणारी साहित्यकृती म्हणून ‘वीरर उलगम’ वाचलं गेलं.

आधुनिक कवी ए. श्रीनिवास राघवन यांचा काव्यसंग्रह ‘वेळळैप्परवै’. यात त्यांच्या १०१ कविता आहेत. श्रीनिवास ‘नाणल’ टोपण नावाने कविता लिहीत आले आहेत. त्यांच्या कवितांची भाषांतरेही अनेक भारतीय भाषांत आहेत. राघवन तामीळ भाषी समीक्षक, वक्ते व कवी म्हणून प्रसिद्ध असले तरी भाषांतरकार म्हणूनही त्यांचा गौरव सर्वत्र होताना दिसतो. साम्यवादी विचारक तामीळभाषी रघुनाथन हे रशियन भाषेचे चांगले जाणकार. त्यांनी रशियन काव्य तामीळमध्ये आणून ती समृद्ध करण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्यच म्हणावा लागेल.
drsklawate@gmail.com