आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपुलाचि संवादु आपल्‍याशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांगले मार्क आणि त्याच्या आधारावर चार-पाच आकडी पगाराची नोकरी म्हणजेच यशस्वी होणं नाही. अभ्यासकौशल्याबरोबच योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता, परिस्थितीशी समायोजन यांसारखी जीवनकौशल्यंही आवश्यक आहेत. 
 
क्लिनिकमध्ये समुपदेशनासाठी आलेला सुश्रुत एका उच्चशिक्षित मध्यवर्गीय कुटुंबातील मुलगा. आठवीत शिकणारा सुश्रुत हुशार आहे पण अभ्यास करत नाही, अशी पालकांची तक्रार होती. पहिल्याच सेशनमध्ये तो म्हणाला, मी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ अभ्यास करू शकत नाही. त्याच्या समुपदेशनात मला त्याला हे पटवून द्यावे लागले किंबहुना त्याला त्याबाबत जागरूक केले की, हे कुणी ठरवले तर तुझ्या मनातील विचारांनी. म्हणजे तुझ्या मनातील विचारांनीच तू अभ्यास करण्याचा वेळ वाढवू शकशील. अखेर मुलांच्या मनातील विचारच त्यांना अभ्यास करण्यास, खेळण्यास, किंवा इतर छंद जोपासण्यास प्रवृत्त करतात. आपण मुलांना त्यांचे आवडते विषय कोणते, हे विचारले तर ते ज्या विषयांची नावे सांगतात ते विषय शिकवणारे शिक्षकही त्यांचे आवडते असतात. यातही विचारांचेच प्राबल्य  असते. 
 
कोणताही प्रश्न आपल्यासमोर उभा राहिला की, तो सोडवण्यासाठी जी कृती करायची असते त्याबद्दल आपण आधी विचार करतो आणि नंतर त्यानुसार काम करतो. एखाद्या विषयात मार्क कमी मिळाले की तो विषय, त्याचा अभ्यासच नकोसा वाटतो. तो विषय प्रॉब्लेम होऊन बसतो. मग मी या विषयात नापास होईल, टक्के कमी मिळतील, वर्गात आणि घरी इमेज डाउन होईल असे नकारात्मक विचार येतात. त्यामुळे अस्वस्थता, बेचैनी आणि मग त्या अभ्यासातून सुटी घेतली की, बरे वाटते. या विचारांना घाबरलो की, आपण काही तरी कृती करतो जेणेकरून अस्वस्थता दूर होईल. पण हे विचार मूळ उद्दिष्टापासून मुलांना दूर करत असतात. विचारांना वळण लावणं, योग्य दिशा देणं हे मुलांना स्वत:लाच करायचं असतं. कारण त्यांनी, आपण या चक्रात अडकायचं नाही असं ठरवायचं असतं. त्यांना स्वत:लाच हे करायचे असते. मनाची ताकद वाढवायची असते.
 
हे सांगणे सोपे आहे पण प्रत्यक्षात विचारांना आपल्या नियंत्रणात आणायचे कसे? मुलांचे वर्तन म्हणजे शरीर आणि मन यांचे काँबिनेशन. मुलांचे विचार सकारात्मक आणि क्रियाशील राहावे यासाठी तुम्ही पालक, शिक्षक यांनी मुलांना हा प्रश्न विचारावा की, तुमचा एक मित्र आहे ज्याच्याशी तुमची गेल्या तीन वर्षांपासून मैत्री आहे. आणि एक मित्र आहे ज्याच्याशी पाच महिन्यांपासून मैत्री आहे. तर मग या दोघांपैकी तुम्ही कोणावर विश्वास ठेवाल? उत्तर येते की, तीन वर्षांपासून मैत्री असलेल्या मित्रावर. मग मुलांना हा विचार द्यायचा की, चोवीस तास तुमच्याबरोबर कोण असतं? तेव्हा मुले म्हणतात की मीच माझ्याबरोबर चोवीस तास असतो. मुलांना हे सांगता येईल की, ज्या अर्थी तुम्हीच तुमच्याबरोबर चोवीस तास असता तर तुमचा विश्वास सर्वात जास्त तुमच्यावरच असतो. मग हा विचार तुम्हाला विश्वास देईल की तुम्ही अभ्यास करू शकता. छंदाच प्राविण्य मिळवू शकता. खेळात नावलौकिक मिळवू शकता. म्हणून मुलांना विचार करायला शिकवणे हे महत्त्वाचे. अभ्यासकौशल्य शिकण्याच्या प्रक्रियेसाठी हे आवश्यक आहे.
 
विचार म्हणजे आपलाच आपल्याशी चाललेला संवाद असतो. हा विचार निरर्थक न होता अर्थपूर्ण झाला तर तो प्रेरणादायक ठरतो. अभ्यासकौशल्यातील शेवटचे पण अत्यंत महत्त्वपूर्ण कौशल्य म्हणजे रेखाटन. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या गणित, विज्ञान, भूगोल, या विषयाकरता हे सर्वात जास्त उपयोगाचे ठरते. रेखाटन करण्याचे कौशल्य विकसित करताना विद्यार्थी वापरत असलेली पेन्सिल, तिचे टोक, पेन्सिलची शेड, रेषांचा गडद फिकट वापर, रेषांचे सरळ-तिरके, वर्तुळाकार प्रकार, आकृत्यांचे प्रमाण, चौकटीतील प्रमाणबद्धता, याबद्दल विद्यार्थ्यांना पद्धतशीर प्रशिक्षण द्यावे लागते. हे शिक्षण अगदी प्राथमिक टप्प्यांपासून देता येते. प्राथमिक शाळेत कदाचित या गोष्टींची समज येणार नाही, पण माहिती तर नक्कीच होऊ शकते. 
 
माध्यमिक शाळेत या रेखाटन कौशल्याचा खरा विकास होऊ शकतो. रेखाटनाकरता उत्तम निरीक्षणाचा पाया आवश्यक असतो. आकृतीचे रेखाटन करण्यासाठी मूळ आकृतीचे काळजीपूर्वक नि लक्षपूर्वक निरीक्षण करणे, त्याचे अर्थासहित आकलन, स्मरणशक्तीत त्याची साठवण अशी प्रक्रिया घडत असते. आकृती काढल्यानंतर तिचे शीर्षक, तिला दिलेली नावे यांचीही पद्धत असते. तसेच भौमितिक आकृत्या काढण्याचे तंत्र, भूगोलाच्या नकाशामधील स्थाने, सूचीभरण या सर्वांसाठी रेखाटनाची प्रॅक्टिस करायची असते. शाळेत आल्यानंतर, विद्यार्थ्यांची अभ्यासाची इच्छा, आवड, कौशल्ये, तंत्रे विकसित करणे हे जितके महत्त्वाचे असते तितकेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला सर्वांगीण परिपक्वता येण्यासाठी जीवनकौशल्येदेखील आवश्यक असतात. कारण पूर्वी गुरुकुल पद्धतीनं विद्यार्थी शिक्षण घेत असतं. उपनयन म्हणजे मुंज झाल्यानंतर मुलगा शिक्षणासाठी गुरुगृही जात असे. त्याला आईवडिलांना सोडून आश्रमात राहावे लागत असे. गुरुमातेला मदत तसेच आश्रमासाठी आवश्यक असणारी सर्व कामे करावी लागत असे. त्यामुळे स्वओळख, स्वप्रतिमा, स्वप्रतिष्ठा, संवादकौशल्य, स्वत:चे मत मांडणे, वेळेचे- ताणतणावाचे नियोजन, निर्णयक्षमता, यांसारख्या जीवनकौशल्यात आणि विविध प्रकारच्या विद्या, कला यामध्ये पारंगत होऊन जेव्हा विद्यार्थी जगाच्या बाजारात येत असत तेव्हा म्हणतात, की त्यांच्या पदस्पर्शाने, सामर्थ्याने धरणी कंप पावत असे. आणि आज विद्यार्थी चांगल्या शाळा, कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडतात तेव्हा त्यांचेच पाय थरथर कापत असतात. दुर्दैवानं शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण प्रक्रियेत मुले फक्त माहितीवरच अवलंबून असतात. जीवनातील संघर्षाला तोंड देण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक जीवनकौशल्यांचा अभाव असतो. त्यामुळे हे विद्यार्थी आयुष्यात बऱ्याचदा मागे पडताना दिसतात. 
 
म्हणूनच विद्यार्थीदशेत पदवी मिळवण्यासाठी जशी अभ्यासकौशल्ये आवश्यक आहेत तशीच प्रगल्भ आणि शहाणपण आलेली व्यक्ती साकार होण्यासाठी जीवनकौशल्ये शिकवणे हेही अभिप्रेत आहे. कारण ही जीवनकौशल्ये अंगी बाणवल्याने विद्यार्थ्यांमध्ये योग्य दृष्टिकोन, सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर काम करण्यास लागणारी सामाजिक क्षमता प्राप्त होत असते. जीवनकौशल्यांचा विस्तार खूप मोठा आहे. ज्यातील मनोसामाजिक आणि आंतरवैयक्तिक कौशल्यामुळे विद्यार्थी परिणामकारक संभाषण करू शकतात. परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात. भावी आयुष्याचे नियोजन करू शकतात. यातून काय होते, तर मुले मनाने आणि शरीराने निरोगी राहतात. समतोल विचार करायला लागतात. त्यामुळे अर्थातच शांततापूर्ण, निरोगी आणि संवेदनशील वातावरण तयार व्हावे, यासाठी त्यांच्याकडून योगदान दिले जाते.
 
अभ्यासकौशल्यांनंतर शाळेबरोबरच घर, समाज मुलांना किती काही देऊ शकतो हा विचार करायचा आहे. जीवनकौशल्यांच्या माध्यमातून समाज एकविसाव्या शतकातील भारताचे स्वप्न तर पूर्ण करू शकतो. आणि त्याबरोबरचा शिक्षण म्हणजे केवळ साक्षरतेची पातळी वाढवणेच नाही, तर निसर्गातील स्पंदने रुजवणे हा विचार मुलांच्या मनात पक्का करू शकतो.
 
- डॉ. स्वाती गानू,  पुणे,
ganooswati@gmail.com
बातम्या आणखी आहेत...