आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड महत्‍त्‍वाची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


किशोरवयीन मुलामुलींच्या भविष्याची दिशा निश्चित होते ती त्यांची वर्तमानातली जीवनशैली कशी आहे यावरून. कुटुंब, नातेसंबंध, मित्रमैत्रिणी आणि शिस्तबद्ध दिनचर्येचा निरोगी जीवनशैलीत खूप महत्त्वाचा आणि मोठा वाटा आहे, हे आजच्या किशोरांनी वेळीच ओळखायला हवं, आणि आपण मोठ्यांनी ते लक्षात आणून द्यायला हवं.


हृतिक मागच्या वर्षीच कॉलेजच्या शिक्षणासाठी पुण्यात आला होता. इंदूरहून पुण्यात आल्यावर तो तीन मित्रांबरोबर एका फ्लॅटमध्ये राहत होता. दर महिन्याला पप्पांनी पाठवलेल्या पैशातून तो फ्लॅटचं भाडं द्यायचा आणि मेसचं बिलसुद्धा. पण मागच्या वर्षी सुरळीत सुरू असलेली त्याची गाडी या वर्षी मात्र रुळावरून पूर्ण घसरली. किती प्रयत्न केला तरी ना पैशाचा ताळमेळ बसायचा ना अभ्यासाचा. गेल्या आठवड्यात तर त्याचं पोट इतकं बिघडलं की, सलाइन लावण्याची वेळ आली. त्याच्या आई-वडलांना संस्कृतीने फोन करून कळवलं कारण तिला या वर्गमित्राची अवस्था बघवेना. आईवडलांना अचानक पुण्यात पाहून तो घाबरला. तब्येत तर बरी नव्हतीच पण पैसेही संपलेले. शेवटी त्यानं, जास्त पैसे लागतात इतक्या पैशात भागत नाही अशी तक्रारही केली. हृतिकचे मित्र, त्याची जीवनशैली, त्यांचे खर्च याबद्दल संस्कृतीने जेव्हा त्याच्या आईवडलांना सांगितलं, तेव्हा त्यांना कळलं हृतिकला पैसे का पुरत नाहीत. हृतिक उच्च मध्यमवर्गीय घरातला मोठा मुलगा. स्वभावाने उदार आणि स्वच्छ मनाचा. मित्रांबरोबर राहताना त्या सगळ्यांना तो आपली दुचाकी वापरायला द्यायचा. मोबाइल देणं, पेट्रोल भरणं, किराणा आणणं, पैसे उसने देणं याबरोबरच खाण्यापिण्यावरही बराच खर्च तो करायचा. दुसऱ्या शहरात आपण शिकण्यासाठी आलोय, पैसा आणि मौजमजेत वेळ घालवण्यासाठी नाही. आपल्याला आयुष्यात काय करायचंय, त्यासाठी कोणतं शिक्षण घेणं आवश्यक आहे, आपलं ध्येय काय आहे, याचा त्याला विसर पडला होता. जीवनातील एव्हरेस्ट गाठण्यासाठी निरोगी जीवनशैली आवश्यक आहे हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या १७ वर्षांनंतरच्या किंवा अगदी १३-१४ वर्षांच्या मुलांनी आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्य व आरोग्याबाबत जागरुक राहणे आवश्यक आहे. हे एक अत्यंत महत्त्वाचं जीवनकौशल्य आहे. कारण अशा जीवनशैलीमुळे मुलांचे केवळ शारीरिक आरोग्यच नीट राहतं, असं नाही तर त्यामुळे मन, वृत्ती, मन:स्थितीही बदलते. आपले विचार, त्यामुळे घेतले जाणारे निर्णय आणि केल्या जाणाऱ्या कृतीही सुधारतात. विद्यार्थिदशेत लागलेल्या चांगल्या सवयी मुलांना सकारात्मक विचार करायला शिकवतात. महाविद्यालय, मित्र, प्रकल्प, अभ्यास यामुळे त्यांना व्यवस्थित झोप नसते. सकाळी लवकर उठून व्यायाम करणं घडत नाही. खरं तर या वयात केलेला व्यायाम मन आणि मनगट अशा दोन्हींना पोषक ठरतो. घरचं पौष्टिक जेवण शरीराबरोबरच मनाचंही पोषण उत्तम पद्धतीने करतं. मात्र सध्या असं दिसून येतं की, चहा, कॉफी, यांच्याबरोबरच तळलेले पदार्थ, चरबी वाढवणाऱ्या पदार्थांच्या दुकानांत विद्यार्थ्यांची खूप गर्दी असते. चटपटीत खाणं, आइस्क्रीम, इतर विदेशी पदार्थांचं वेड खूप वाढतं आहे. यातूनच मग शारीरिक आरोग्याला ग्रहण लागतं. मित्रांच्या गटामधे इतर मित्रमैत्रिणींचे कपडे, दागिने, पिशव्या, पादत्राणं, वगैरे पाहून त्याच्यावरचा खर्च वाढायला लागतो. अनुकरण आणि तुलनेतून आपल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च करतोय, वरच्या भपक्याला भुलतोय याकडे दुर्लक्ष होतं. निरोगी जीवनशैलीपेक्षा चंगळवादी जीवनशैलीकडे मुलं ओढली जातात. पौष्टिक खाणं, भरपूर काम करणं, मनाने कणखर राहणं, ताण कमी ठेवणं, स्वत:वर खूप प्रेम करणं या बाबी निरोगी जीवन जगू इच्छिणाऱ्यांसाठी फार महत्त्वाच्या असतात.


मुलांमध्ये कधी व्यायामाचा पूर्ण अभाव असतो तर कधी अतिरेक, जो अशा जीवनशैलीला घातक असतो. त्यात पुन्हा मुलींमध्ये बारीक होण्याचं निर्माण झालेलं वेड आणखीनच धोकादायक आहे. ज्या वयात त्यांच्या शरीराला पोषण देणारं अन्न मिळण्याची गरज असते त्याच वयात मन आणि पोट मारून त्या जगतात. परिणामी हिमोग्लोबिन, ताकद कमी पडून वारंवार आजारी पडतात. ‘हेल्थ इज नॉट अबाउट द वेट यू लूज, बट अबाउट द लाइफ यू गेन,’ हे निरोगी जीवनशैलीचे खरे सूत्र आहे, हे मुलींना सांगायला हवे. हे खाऊ नये, ते खाऊ नये, अशी खाण्याची ओढाताण करण्यापेक्षा निरोगी सवयी जगण्याला मदत करतात. कारण बाहेरून आरोग्यपूर्ण राहण्याची सुरुवात आतून होत असते, याची माहितीही त्यांना द्यायला हवी.


निरोगी जीवनशैलीच्या सवयी म्हणजे केवळ आहार, कपडे, व्यायामच नाही तर जेवणाच्या वेळा सांभाळणेही असते. जे अन्नपदार्थ खाल्ले जातात त्याप्रमाणे रजतम गुणांचा प्रवेश वर्तनात दिसतो. अतिगोड, तेलकट, रसायनयुक्त, खूप प्रक्रिया केलेलं आणि तयार वा जंक फूडच्या आहाराने येणारी स्थूलता, आळस, बेढबपणा, हे एक हळू चढणारं विष आहे. मित्रांबरोबर राहताना हे सतत टाळणं शक्य होत नाही हे खरंय, पण अशा प्रकारच्या खाण्याचा तोल नक्कीच सांभाळायला हवा. याचं ज्ञान त्यांना मोठ्यांनी द्यायला हवंय. आणखी एक आहारामुळे मुलांचं जीवन ताणयुक्त होतं, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर. फेसबुक, व्हॉट्सअॅप पाहणं म्हणजे लहान मुलाने आपला लंगोट तर ओला केला नाही नं, म्हणून मोठ्यांनी वारंवार तो तपासून पाहण्यासारखं व्यसन झालंय. अस्वस्थ झाल्यासारखी ही मुलं आपला किती वेळ यामध्ये जातोय हे समजू शकत नाहीत. त्यांना दिवसभरातला किती काळ आपण यासाठी देतोय हे चक्क घड्याळानुसार पाहायला सांगितलेत तर त्यांनाही आश्चर्य वाटेल. म्हणनूच अभ्यास करताना, महाविद्यालयात, घरी किंवा शिकवणी वर्गात फोन बघायचा नाही. रात्री झोपताना तर तो बंदच करून ठेवायची पद्धत ही निरोगी जीवनशैली आहे. समाजमाध्यमांच्या अतिवापरामुळे मन:स्वास्थ्य बिघडतं. बैचेनी, अस्वस्थता, चिंता, आक्रमकपणा नकळतपणे वाढत जातात. आभासी जगात किती रमायचं, त्याला आपल्या आयुष्यात किती वेळ आणि स्थान द्यायचं हे मुलांना ठरवायला सांगण्यासाठी आणि तसंच वागण्यासाठी आपल्यालाच मदत करायची आहे. शरीर आणि मनाचं आरोग्य परस्परात गुंफलेलं असतं आणि त्याच्या घडण्याबिघडण्यावर आपल्या जीवनशैलीचं यश ठरत असते.


निरोगी जीवनशैलीची निवड आपल्या भविष्याची वाटचाल ठरवत असते. या सवयीतील निवडीत कुटुंबातील सदस्यांशी आपले संबंध विश्वासाचे, सौहार्दाचे असण्याने भरच पडते. पण आणखी एक गौष्ट या जीवनशैलीला समृद्ध बनवते ती म्हणजे मैत्री किंवा मित्रांची संगत. मित्रमैत्रिणी अशा असाव्यात की, ज्या जिवाला जीव देतील. चुकलं तर परखडपणे टोकतील. चांगले मित्र ही आपली संपत्ती असतील. त्यांच्या असण्याने आपली जीवनशैली आरोग्यपूर्ण राहील. इलनेसपेक्षा वेलनेसकडे नेणारी जीवनशैली तरुण पिढीला पोषक ठरते. आपण कोणत्या प्रकारची जीवनशैली अंगीकारायची हे त्याची निवड करून ठरवायचे असते. जमेल तसे जगू म्हणून सोडून द्यायचे नसते. डोळस मैत्री, उत्तम आहारविहार, व्यायाम, नातेसंबंध, ध्येयाचा अढळ ध्रुवतारा डोळ्यांसमोर दिसत राहिला तर मुलांची जीवनशैली निरोगी राहील आणि भविष्य उज्ज्वल.


- डॉ. स्वाती गानू, पुणे
ganooswati@gmail.com

बातम्या आणखी आहेत...