आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्‍वप्रिष्‍ठा महत्‍त्‍वाचीच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रंग, रूप, पैसाअडका, सोशल स्टेटस यापेक्षाही महत्त्वाची आहे ती स्वप्रतिष्ठा. कारण यातल्या किती तरी गोष्टी नसल्या तरी माणसाचं कुठंच काहीही अडत नाही. मात्र, स्वप्रतिष्ठेच्या जाणिवेचा अभाव असेल तर जगणं नकोसं होऊन जातं.


ऑफिसच्या फंक्शनमध्ये स्मिता आणि प्रदीप दोन्ही मुलांना घेऊन गेले तेव्हा फार खुश होते. पण जेव्हा घरी आले तेव्हा अवंतीचा चेहरा पाहून सगळ्यांचाच मूड ऑफ झाला. स्मिता गोरीपान, प्रदीप काळसर रंगाचा. तसाच फरक अवंती आणि आरूषमध्ये होता. लहानपणापासूनच तिथे जायचा तिथे हाच प्रश्न विचारला जायचा. कधी स्पष्टपणे तोंडावर, कधी चेष्टेत, कधी केवळ डोळ्यांनी, तर कधी पाठीमागे कुजबूज व्हायची. ही दोघं जुळी भावंडं वाटतच नाही. मुलगी इतकी काळी, स्थूल आणि मुलगा गोरापान, देखणा. असे टोमणे ऐकून अवंती दरक्षणाला कोमेजत होती. आपण अगदी कुरूप, टाकाऊ, वाईट आहोत. आपल्याला काहीही येत नाही, या विचाराने तिला पूर्ण घेरले होते. सुदैवानं स्मिता व प्रदीपच्या मनात असा भेदभाव नव्हता. आरुषसाठीही अवंती त्याची दीदी होती. अवंतीसाठी एका महत्त्वाच्या जीवनकौशल्याची गरज होती आणि ती म्हणजे स्व-प्रतिष्ठा. किंवा सेल्फ एस्टीम.


लहान मुले, तरुण वयातील मुले, सर्वांनाच स्वप्रतिष्ठा आवश्यक असते. स्वप्रतिष्ठेत सर्वप्रथम आपण जसे आहोत तसं स्वीकारणं आवश्यक असतं. स्वत:बद्दल विश्वास वाटायला हवा की, हो, मी हे करू शकतो. मी माझ्यावर प्रेम करतो/ते. सकारात्मक दृष्टिकोन मनात ठेवून विचार करायला हवा असतो. स्वप्रतिष्ठा म्हणजे स्वत:विषयी प्रतिष्ठा वाटायला हवी. कारण याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होत असतो. एकदा मानसिक आरोग्य ढासळले की, त्याचा परिणाम व्यक्तीच्या वागण्यावर होतो, त्या व्यक्तीच्या वागण्यात दिसून येतो. स्वत:ला कमी लेखणारी मुले मग निर्णयही त्याच पद्धतीने घेतात. त्यांच्या मित्रमंडळींच्या निवडीत, मैत्रीत, नात्यात हे दिसून येतं. ते अडचणींना तोंड देऊ शकत नाहीत.


अशा मुलांच्या मनाला या विचारांनी अक्षरश: झपाटलेले असते. ‘कमीपणाची भावना’ त्यांना भुतासारखी छळत असते. मी चांगली आहे का? लोकांना मी आवडते का? सगळे लोक माझ्यावर हसत तर नसतील ना? टीक तर करत नसतील ना? मी सुंदर नाही का?असे प्रश्न त्यांच्याभोवती फेर धरत असतात. जेव्हा मुलांची स्वप्रतिष्ठा खाली जायला लागते तेव्हा त्यांच्या जगण्याचाच प्रश्न निर्माण होतो. तेव्हा मुलांना अशा मनस्थितीतून बाहेर काढून त्यांची स्वप्रतिष्ठा उंचावण्यासाठी काही गोष्टी त्यांना जाणीवपूर्वक माहीत करून द्याव्या लागतात. प्रथम म्हणजे स्वत:वर प्रेम करा. चुका होतात म्हणून स्वत:ला माफ करा. कारण स्वत:ला स्वीकारलं, प्रेम केलं, चुका मान्य करून स्वत:ला माफ केलं तरच पुढचा प्रयत्न करता येतो. आणि दुसऱ्यालाही स्वीकारता येतं. माफ करता येतं. हे समजावून सांगावं लागतं. स्वत:च्या मनाशी, विचारांशी, प्रामाणिक राहायचं असतं कारण आपण आपल्याला कसं पाहतो हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. या बाबी मुलांच्या, तरुणांच्या स्वप्रतिमेला बळ देतात. त्यांची स्वप्रतिष्ठा वाढवतात. तुम्ही स्वत:ला कमी लेखाल, वाईट वागवाल, सतत नावे ठेवत राहाल, दोष काढत राहाल, आणि तुम्ही स्वत:शी वागण्याची जी पातळी ठरवाल, इतर लोकही तुम्हाला तसेच वागवतील, याची जाणिव परिपक्व आणि प्रगल्भ अशा मोठ्यांनी मुलांना द्यावी.


अनेक तरुण स्वप्रतिष्ठा गमावून बसतात. याची सुरुवात कधी कुटुंबात, कधी शाळेत, तर कधी सामाजिक ठिकाणीही होत असते. या मुलांची सेल्फ एस्टीम उंचावण्यासाठी मुलांना काही विशिष्ट पद्धतीनं पुढे न्यायला हवं. आपल्याला कुणी चांगलं म्हणलं, कौतुक केलं तर ते स्वीकारायला लाजू नये. आपल्या दिसणं, वक्तृत्व, नेतृत्व, नियोजन, कला, खेळ, मदत करण्याचा स्वभाव, दयाळूपणा, यासारख्या गुणवैशिष्ट्यांमुळे लोक तुमची प्रशंसा करतात, ती स्वीकारा आणि दुसऱ्याचेही मनापासून कौतुक करा, हा विचार मुलांना देणं गरजेचं आहे.


स्वप्रतिष्ठा जीवन कौशल्याच्या विकसनाचा दुसरा टप्पा आहे. तो म्हणजे स्वत:ला सुंदर मानण्याचा. तुम्हीसुद्धा इतरांप्रमाणेच सुंदर आहात. साइज झीरो म्हणजेच सौंदर्य नसतं. तुमचं स्थूल असणं, सावळा रंग असणं, यापेक्षा लोक तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून मानतात. नुसत्या सुंदर दिसण्यानं तुमचं आयुष्यातलं मोल वाढत नसतं. तुमच्या हृदयात अनेक सुंदर गोष्टी असतात, त्या शोधायच्या असतात. लोक तुमच्या रूपावर नाही तर तुमच्या कनवाळू, उदार मनावरही प्रेम करत असतात. तुम्ही चांगले आहात असं जेव्हा मित्र, घरातले, बाहेरचे लोक म्हणतात किंवा लाघवी व्यक्तिमत्त्वाचे आहात, तुमच्या सहवासात प्रसन्न, शांत, सुरक्षित वाटतं ते असतं सौंदर्य. याची उदाहरणं मुलांना माहीत करून द्यायला पाहिजेत. कारण इतर लोक आपल्याकडे ज्या नजरेने पाहतात त्या दृष्टीने आपण स्वत:कडे कधीच पाहात नसतो. संकटांनी हताश होऊन तेव्हा तुमचं मन रडत असतं तेव्हा तुमचा खंबीर चेहरा पाहून लोक तुम्ही हिमतीनं जगण्याचा आदर्श आहात, असं मनाशी ठरवत असतात. मग तुमची स्वप्रतिष्ठा कमी कशी काय असू शकते? या प्रश्नाचं उत्तर मुलांना विचारायला शिकवायला हवं. इतर आपल्यावर विश्वास दाखवत असतात तर आपण स्वत:वरचा विश्वास गमावणं हे सयुक्तिक कसं काय असू शकतं? तुम्ही एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी धडपडताय आणि यशस्वी होण्यापेक्षा प्रयत्न करण्याचं समाधान मोठं असतं, हे त्यांना पटवणं आवश्यक असतं.


या वयातल्या मुलांना आईवडील, शिक्षक, घरातल्या मोठ्या माणसांकडून प्रोत्साहन, शाबासकी, कौतुक हवं असतं. म्हणूनच त्यांनी मिळवलेल्या यशामागे त्यांनी मनाचा केलेला निश्चय आणि कठोर मेहनतच आहे, असं म्हणावं. हे सारं आपोआपच घडत नसतं. जशा चुका मान्य केल्यास तसं यशही स्वीकार, हे त्यांच्यावर बिंबवावं. नुसती श्रीमंती, सौंदर्य यामुळे मित्रात, घरात, शाळेत किंवा लोकांमध्ये आपलं कौतुक होत नसतं. तुम्ही तुमची विद्यार्थी म्हणून अभ्यासाची, मित्र म्हणून मदत करण्याची, नाती सांभाळण्याची, मुलगा-मुलगी म्हणून कुटुंबात जबाबदारीने वागण्याची भूमिका करताना तुमच्यामधील क्षमता तुमच्या कामात प्रतिबिंबित होत असतात. तुमचं पॅशन हे पैशापेक्षा उजळ आहे, हेही जरूर सांगावं.


हे सांगतानाच मोठ्यांनी लहानांना आपल्या वागण्यातून हे दिसू दिलं की, जर आपण सतत दुसऱ्याच्या म्हणण्याचा, सौंदर्याचा, पैशाचा, बोलण्याचाच विचार करत बसलो तर त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या भावनांमध्येच स्वत:ला अडकवून, गुंतवून बसलो तर स्वत:ची प्रतिष्ठा गमावून बसू. तुमच्या सोबतीनं मुलांना जीवन जगण्याचा खरा मार्ग दिसेल. त्यांना वाटेल की, मी खरंच किती छान आहे. सगळ्या अडचणींना ओलांडत मी यशाचा किनारा गाठला. आपण स्वत:ला आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी ठेवून आपली स्वप्रतिष्ठा जपायला हवी हा विश्वास त्यांना मिळेल.


- डॉ. स्वाती गानू,  पुणे
ganooswati@gmail.com

बातम्या आणखी आहेत...