आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍वओळख आणि स्‍वजाणिवेचा संगम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवनाला हवा तो आवडता आकार देण्यासाठी, त्याची वाट तयार करण्यासाठी स्वओळख आणि स्वजाणीव फार महत्त्वाची असते. कारण त्यामुळे आपलाच आपल्याशी संवाद घडून येतो. यातून आत्मविश्वास आणि चांगले गुण यांची सुरेख सांगड घातली जाते. स्वत:कडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. कितीही अडचणी, संकटे आली तरी स्वत:वरचा विश्वास डळमळीत होत नाही.
 
अन्वयला कॉलेजमध्ये गेल्यापासून आपण कन्फ्युज्ड आहोत असं सारखं वाटायचं. करिअरची प्रत्येक स्ट्रीम त्याला योग्यच वाटायची. त्यांची निवड करतानाही तो गोंधळेलाच होता. रोज कोणते कपडे घालावे, मित्रांशी कोणत्या गोष्टी शेअर कराव्यात, ते त्याला कळायचं नाही. निर्णय घेताना त्याचं मन कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला हेलकावे खायचं. कसं करावं, काय करावं हे त्याला कळायचं नाही. हा प्रश्न असू शकतो, हे कुणाला कसं पटवायचं? मैथिली त्याची नवी मैत्रीण. तिने जेव्हा त्याला म्हणलं तसं तो म्हणाला की, तुला कसं कळलं मला किती त्रास होतोय? घरी कुणाला काही कळत नाही मी किती स्ट्रेसमधून जातोय. अगं, मला कुठला निर्णयच घेता येत नाही. अन्वयप्रमाणे अनेक मुले गोंधळलेली असतात. याला कारण जीवनकौशल्याचा अभाव.
 
मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, जीवन सकारात्मक आणि यशस्वीपणे जगण्यासाठी विद्यार्थ्यांनी जीवनकौशल्ये आत्मसात करणं आवश्यक आहे. जीवनकौशल्यात प्रामुख्याने पुढील कौशल्यांचा अतंर्भाव होतो. १. शिकणे, २. स्वओळख आणि स्वजाणीव, ३. आरोग्य, ४. भावनिक विकास, ५. समस्या सोडवणे, ६. दयाळू वृत्ती, ७. जवळीक, ८. समतोल जीवन, ९. चुकीच्या गोष्टींना सोडून देणे आणि योग्य बाबींना धरून राहणे, आणि १०. सामाजिक कौशल्ये. अर्थात ही यादी बरीच मोठी असू शकते. अन्वयच्या बाबतीत निर्णयक्षमतेचा अभाव हे जीवन कौशल्याचा विकास न झाल्याचे उदाहरण आहे.

मुलांनी शिक्षण घेताना अभ्यास आणि जीवनकौशल्यांचा मेळ घालावा हीच समाजाची अपेक्षा असते. जीवन व्यवस्थित जगता यावं यासाठी हार्ट, हँड्स, हेल्थ, हेड, अर्थात हृदय, हात, आरोग्य, डोके या चार बाबींशी ही कौशल्ये जोडलेली आहेत. अन्वयप्रमाणेच टीनएजर विद्यार्थ्यांच्या बाबतीत वैचारिक गोंधळही आढळून येतो. आणि या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी प्रथम स्वओळख आणि स्वजाणीव याबद्दल माहिती करून घ्यायला हवी. अगदी लहान मूल असलं तरी जर मोठी माणसे त्याचे कौतुक करत असतील तर ते त्याला कळतं आणि ते खुश होतं. त्याचप्रमाणे प्रत्येक मुलाला या गोष्टीची थोडीफार जाणीव असते. फक्त आपल्यातील चांगल्या गोष्टी आणि दोष यांचा शांतपणे त्याने विचार केलेला असतो.

मानसशास्त्रानुसार, वयाच्या बाराव्या वर्षी मुलांचे ध्येय निश्चित व्हावे. गोल सेटिंगसाठी विद्यार्थ्यांना आपल्यातील चांगले गुण शोधायला, त्यावर विचार करायला प्रवृत्त करावे. यालाच स्वत:मध्ये डोकावून पाहणं म्हणता येईल.
प्रत्येक मूल निराळं असतं. कोणाचं हस्ताक्षर छान, सुवाच्य असतं, कुणाचा आवाज गोड असतो. कोणी आकर्षक नृत्य करू शकतं. कुणी उत्तम चित्र काढू शकतं तर कुणाचं वक्तृत्व मनाला मोहवणारं असतं. कुणी सुरेख रांगोळी काढतं तर कुणाची बुद्धी संशोधनात चालते. पालक आणि शिक्षकांनी मुलांना स्वत:मधले कलागुण शोधण्यासाठी प्रवृत्त करावं. एकदा एका शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षकांनी एक खेळ घेतला. खेळ खेळण्यापूर्वी त्यांनी मुलांना सांगितलं की, वर्गातल्या कुठल्याही पाच विद्यार्थ्यांमधला कुठलाही तुम्हाला आवडलेला प्रत्येकी एक गुण चिठ्ठीत लिहायचा. ती चिठ्ठी टेबलवर आणून ठेवायची. जेव्हा या चिठ्ठ्या वाचायला सुरुवात केली तेव्हा एकेका विद्यार्थ्यामधील चांगले गुण वर्गाला कळायला लागले. आणि स्वत: त्या विद्यार्थ्यालाही. आपल्यातले चांगले गुण ऐकून सर्व विद्यार्थी खुश झाला.
 
शिक्षकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या खेळाचा हेतू विशद केला. त्या म्हणाल्या, मला माझ्या वर्गातल्या मुलांचा त्यांचा स्वत:शी परिचय करून द्यायचा होता. आणि एवढंच नव्हे तर मला माझ्या वर्गातलं वातावरणही आनंदी करायचं होतं. मुलांमधली आपापसातली मैत्रीही घट्ट करायची होती. असा विचार करणारा शिक्षक खरोखरच कौतुकास्पद . अगदी सहज आणि नकळत त्यांनी मुलांना स्वत:शी मैत्री करायला शिकवलं. प्रत्येक मुलाला जन्मत:च काहीतरी बक्षीस मिळालेलं असतं. आणि हे गिफ्ट ज्याचं त्यानं शोधून काढायचं असतं. हे सहजपणे सापडत नाही. कधीकधी आपल्यात असा एखादा चांगला गुण आहे याचा आपल्यालाच पत्ता नसतो. मुलांना होणारी स्वओळख पुढे जीवनकौशल्य विकसित होण्यासाठी खूप उपयोगी ठरते.

 
आपल्या गुणांना वाव देणारी संधी शोधणं, संधी घेणं आणि तो गुण अधिकाधिक वाढवणं ही दृष्टी मुलांना देता येते. तसंच दुसऱ्या बाजूला आपल्यामधले दोष काढून ते कमी करण्यासाठी काय करता येईल आणि ते दोष वाढले तर पुढे काय धोके निर्माण होतील याचीही जाणीव करून द्यायला हवी, म्हणजे बरेचसे प्रश्न निर्माण होण्याआधीच संपतील. आणि वेळ आलीच तर ते सोडवण्याची गरज का आहे, याबद्दल मुलं स्वत:च विचार करतील. स्वत:ची ओळख मुलांना होणं जसं आवश्यक आहे तसंच स्वजाणीवही फार उपयोगी असते. बऱ्याचदा मी कोण आहे? माझं अस्तित्व काय आहे? माझं शरीर आहे आणि त्यावर माझा अधिकार आहे? माझ्या आयुष्यात मला काय करायचे आहे, याबाबत माझंही मत महत्त्वाचं आहे. माझ्याशी कुणी चुकीचं वागत असेल, माझा कुणी गैरफायदा घेत असेल, कुणी दुरुपयोग करत असेल तर मी त्याला विरोध करायला हवा ही जाणीव मुलांना त्यांच्या स्वत:जवळ नेऊन पोहोचवते.
 
याबरोबरच आपल्यामधले चांगले गुण सर्वांसमोर आणण्याकरिता ज्या वेळेस खास प्रसंग येतात तेव्हा न घाबरता आपण त्याला भिडले पाहिजे, हे मुलांच्या मनावर बिंबवावे लागते. आपल्याजवळ असलेल्या गुणांबाबत असं म्हणून त्यांचा अपमान करू नये की, मी एवढंच करू शकतो, माझ्याच्याने इतकंच होईल. स्वत:मधील शंभर टक्के क्षमता आपल्याला वापरता येते, असा आत्मविश्वास निर्माण करता येईल आणि हा विश्वास आपण त्यांच्यात आणू शकतो. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातलं एव्हरेस्ट त्यांना खुणावत असतं. हे एव्हरेस्ट सर कसं करायचं याची पहिली पायरी असते मुलांना स्वत:मधील गुणदोषांची यादी त्यांना स्वत:ला करायला लावणं. एकदा हे त्यांना कळलं की, त्या करिअरसाठी लागणारं झपाटलेपण त्यासोबतच येत असतं. आपली भूमिका एवढीच असते की, झपाटलेपण आणि बेजबाबदारपणा यातलं अंतर त्यांना दाखवणं. जीवनाला हवा तो आवडता आकार देण्यासाठी, त्याची वाट तयार करण्यासाठी स्वओळख आणि स्वजाणीव फार महत्त्वाची असते. कारण त्यामुळे आपलाच आपल्याशी संवाद घडून येतो. यातून आत्मविश्वास आणि सदगुण यांची सुरेख सांगड घातली जाते. स्वत:कडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. कितीही अडचणी, संकटे आली तरी स्वत:वरचा विश्वास डळमळीत होत नाही. उलट मी कोण आहे, काय करू शकतो हा विचार अडचणींना भेदून पुढे जाण्याची प्रेरणा देत राहतो. म्हणूनच जीवनकौशल्यांमध्ये सेल्फ इमेज आणि सेल्फ अवेअरनेस पहिल्या क्रमांकावर आहेत.
 
ganooswati@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...