आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायकी कामं म्हणजे काय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहाचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. हे कुमारच बोलला? ज्या कुमारला लग्नाआधी तिच्या हुशारीचे, कामाचे कौतुक होते, जो कुमार तिला प्रत्येक गोष्टीत मदत करायला तत्पर असायचा, तिच्या भावनांची कदर करायचा तो इतका बदलला? खरे तर घरी येणार त्याच्या आत्याचे कुटुंब. तिन्ही दिवस सुटी घेणे जमणार नाही म्हणून म्हटले, एक दिवस तू घे, तर इतके बिथरायला काय झाले? चक्क म्हणाला, ‘अशी बायकी कामे मला जमणार नाहीत. तुझे तू सांभाळ. माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस. आईने नाही का घरचे सर्व सांभाळून नोकरी केली. बाबांना घरचे काही बघावे लागायचे नाही.’

असे अनेक कुमार आपल्याला आजूबाजूला दिसतात. काही अपवाद वगळता सर्वसामान्यपणे असेच गृहीत धरले जाते की, स्त्रियांनी नोकरी, व्यवसाय करायचा ते घरचे सर्व सांभाळून. आम्ही तशी ‘परवानगी’ देतो अशी शेखी मिरवणारेही आढळतात. कारण आपल्या डोक्यात लिंगभावाची जडणघडण तशी झालेली असते.

मुळात लिंगभाव म्हणजे काय? स्त्री आणि पुरुष यांची जीवशास्त्रीय रचना पुनरुत्पादन संस्थेपुरतीच वेगळी असते. त्याला आपण ‘लिंगभेद’ म्हणतो. शरीरातील बाकी संस्थांची रचना स्त्री-पुरुषांत सारखीच असते. त्या सारखीच कामे करू शकतात. पण समाजात काही स्वभाववैशिष्ट्ये, काही कामे यांना स्त्रीप्रधान किंवा पुरुषप्रधान असा शिक्का बसलेला असतो. प्रत्येक स्त्री किंवा पुरुषाने त्या अनुसार वागावे, अशी अपेक्षा असते. याला म्हणायचे ‘लिंगभाव.’ समजा आपण एक वर्षाच्या बाळासाठी भेटवस्तू घ्यायला दुकानात गेलो, तर दुकानदार पटकन विचारतो, मुलाला द्यायची की मुलीला? मुलगा म्हटले तर गाडी, चेंडू, बंदूक आणि मुलगी म्हटले तर बाहुली, भातुकली वगैरे दाखवतो. खरे तर एक वर्षाच्या बाळाची ही आवड तयारही झालेली नसते. आपणच तशी तयार व्हायला मदत करतो. हा ‘लिंगभाव’ आपल्या दैनंदिन व्यवहारात सतत डोकावताना दिसतो.

स्त्री आणि पुरुष हा लिंगभेद जगाच्या पाठीवर, कुठेही कोणत्याही काळी सारखाच असतो. पण लिंगभाव मात्र देश, काळ, परिस्थितीप्रमाणे बदलतो, त्यामुळे सापेक्ष असतो. आपल्याकडे एखाद्या मैदानी खेळ खेळणार्‍या व त्यायोग्य पोशाख करणार्‍या मुलीवर ‘पुरुषी’ असा शिक्का बसतो. आठवते का ‘कुछ कुछ होता है’मधली मध्यंतरापूर्वीची काजोल? एकट्यादुकट्या मुलीने देश-विदेशात पर्यटनाला जाणे आपल्याकडे फारसे दिसत नाही. पण पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये वेगळे चित्र दिसते. एखाद्या पुरुषाचा स्वयंपाकघरातला वावर ‘बायकी’ ठरवला जातो. बायकांनाच नवर्‍यांनी लुडबुड केलेली आवडत नाही. पण एखाद्याने ‘शेफ’ म्हणून व्यवसाय केला, त्याला प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळाली की आपण त्याला ‘बायकी’ म्हणत नाही. म्हणजेच लिंगभाव सापेक्ष असतो.

पूर्वी मुलींना वाढवतानाच त्यांच्या मनावर बिंबवले जाई की बाई गं, मोठे झाल्यावर संसार, स्वयंपाक, मुले सांभाळणे हे व्यवस्थित यायला पाहिजे. त्यातून वेळ राहिला तर नोकरी, छंद. संसार म्हटला की, कामाची विभागणी आली. पण त्यातून आर्थिक परावलंबन आले आणि स्त्रीचे शोषण सुरू झाले. अनेक समाजधुरीणांनी ही परिस्थिती सुधारण्यासाठी स्त्रियांचे शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचे मानले. त्यामुळे आजकाल बहुतेक घरांमध्ये मुलींना मुलांच्या बरोबरीने शिक्षण दिले जाते. नोकरी व्यवसायाच्या संधी समान असतात. पण दुर्दैवाने दोघांनाही घरातील जबाबदार्‍या, नातेसंबंध सांभाळणे, यात सहभागी करून घेतले जात नाही. त्यात मुलींसाठी परिस्थिती सुधारली तरी मुलग्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे लग्न झाले की, लगेच तिने पारंपरिक गृहिणीची भूमिका करावी अशी अपेक्षा असते. नवर्‍याला वाटते, माझ्या आईसारखे बायकोनेही घर सांभाळावे, कारण हे ‘बायकांचेच’ काम आहे. हा दूषित लिंगभाव मग खटके उडायला, अशांततेला कारणीभूत होतो. त्यात पुन्हा अशा कामांना कनिष्ठ मानण्याची वृत्ती.

आता कुमारचेच बघा. त्याची आई माध्यमिक शाळेत संगीताची अर्धवेळ शिक्षिका. घरात सासूबाईंची मदत. दिवसभर नोकरी हाताशी. नेहा कंपनीत मॅनेजर, घरात मदतीला कोणी नाही आणि अनियमित वेळांमुळे नोकरांची मदत मर्यादित. तिला कसे जमणार कुमारच्या मदतीशिवाय घर सांभाळणे? कुमारने लिंगभाव बदलायला हवा. त्याचबरोबर हे पण भान हवे की, स्त्री-पुरुष एका पातळीवर नक्कीच असावेत पण त्यांच्यातील लिंगभेद राहणारच. अन्यथा आपण दुसरे टोक गाठायला लागलो आहोत की, नोकरीत व्यत्यय नको म्हणून स्त्रीने बीजांडे गोठवून ठेवणे आणि आपल्या सवडीनुसार वाढत्या वयात गर्भधारणा करून घेणे. शोषण आणि अवास्तव समानता यातला समतोल साधणे ही खरी लिंगभाव साक्षरता.

डाॅ. स्वाती शिरडकर, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...