आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपणच करायचं एकमेकींसाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बावरलेल्या, गोंधळलेल्या चेहऱ्याने समोर बसलेल्या त्या चौघीजणी चाळीस ते सत्तर वयोगटातल्या, एकाच गावच्या, पण नात्याच्या ना गोत्याच्या. औरंगाबादसारख्या शहरात पहिल्यांदाच आलेल्या. इतका मोठा दवाखाना पाहून दडपण आले होते. बहुतेक चौघींचे दुखणे एकच, मायांग बाहेर पडले आहे. थोडाफार तपशिलात फरक. आमची प्रश्नावली सुरू झाली. ‘किती वर्षांपासून हा त्रास आहे?’ एकीला बारा वर्षांपूर्वी शेवटचे बाळंतपण झाले तेव्हापासून. दोघींना आधी थोडा त्रास होता, सहाआठ वर्षांपूर्वी पाळी गेली आणि वाढला. आजीबाईंना तर आठवतच नाही किती वर्षांपासून हा त्रास आहे ते . म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून त्रास आहे पण घरातली, शेतातली कामे सुरूच आहेत. नाहीतर पोट कसे भरणार? कंबर दुखते, चालताना त्रास होतो, जखम झाली की रक्त जाते, एकीला उठताबसता लघवी गळते. नवरा बायकोचे नाते तर संपुष्टातच आलेय. पण अंगावर दुखणे काढणे चालू आहे. आर्थिक कारण तर आहेच, पण मुळात ‘धकतंय तोवर धकू द्या, जीव काय जात न्हायी या आजारानं,’ ही वृत्ती. घरी सगळे आहेत. मालक, लेक, सून, पण... जीवनाच्या गुणवत्तेचा (quality of Life) विचार त्यांच्या आसपासही फिरकला नव्हता.

एका व्यक्ती दवाखान्यात म्हटलं की त्याची मजुरी तर बुडलीच, पण घरातल्या अजून दोघातिघांचीपण. दवाखाना, औषधे हा खर्च वेगळा. त्यात गरज बाईची असेल तर मग विचारायलाच नको. त्यात पुन्हा ऑपरेशनची भीती. अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून त्या इथे येऊन पोचल्या, घरचं कोणी बरोबर नाही, हे एक आश्चर्यच होतं.
‘इथपर्यंत कशा पोचलात?’ ‘तुमच्या दवाखान्यात मोफत उपचारांचे शिबीर असते, गावातला एकजण यायचा होता. त्याची बायको म्हणाली, ‘चला आमच्याबरोबर.‘ म्हणून आलो. नाहीतर इतक्या दूर कशा येणार? आता समदं तुमच्या हातात बघा. आम्हाला या त्रासातून मोकळं करा, लयी उपकार होतील.’

‘मावशी उपकाराची भाषा कशाला? अहो आमचं कर्तव्यच आहे ते. पण तुम्हा चौघींनाही ऑपरेशन लागणार आहे, त्याची सही कोण देणार? आणि जरा चारआठ दिवस जवळही थांबावे लागते पेशंटच्या, त्याचे काय? तुमच्या बरोबर तर कोणीच नाही!’
‘नाही कसं? आम्ही आहेत की एकमेकींना, फॉर्मवर सही पण देऊ आणि काळजीपण घेऊ, फक्त पाळीपाळीने ऑपरेशन करा म्हणजे झालं.’ त्यांचे उत्तर तयार होते.

‘अहो, अशाने महिनाभर राहावे लागेल.’ ‘मग राहू की, म्हणूनच घरच्या कोणाला आणलं नाही, उगीच डबल नुकसान! समद्या नीट झाल्या की संगच जाऊ परत.’ त्यांचा व्यवहारीपणा जाणवत होता. कदाचित अपरिहार्यतेतून आलेला. अनंत अडचणीमधून मार्ग काढण्याचं त्यांचं कसब खरंच वाखाणण्यासारखं होतं. पुन्हा इतकी वर्षं त्रास, उपेक्षा सहन करूनही चेहऱ्यावर वैताग नाही, एका कुटुंबातल्या नसूनही समदुःखी असल्याने एकमेकींचं दुःख जाणून होत्या, ते दूर करण्यासाठी एकमेकींना मदतीची तयारी. आजीतर त्या तिघींचीही ‘माय’ होत्या. त्यांच्या या धैर्याला सलाम करावा की, घरातली मिळवती असूनही उपचारातला विलंब बघून दुःख करावे हे समजत नव्हते. त्या चौघी मात्र खूष होत्या. खरेतर सगळी बाळंतपणं घरी झालेली, कधी दवाखानाच पाहिला नाही, ऑपरेशनचा अनुभव तर दूरच. त्यात घरातले कुणीच बरोबर नाही. पण इतक्या वर्षांचा त्रास दूर करण्याची संधी मिळाली यातच समाधान होते. अखेर एकानंतर एक सर्वांची शस्त्रकर्मे पार पडली. आजींचा नंबर सगळ्यात शेवटी लागला कारण त्यांची जखमच बरी होत नव्हती.

जवळजवळ महिना होत आला होता. त्रासातून मुक्त झाल्याचा आनंद होता पण आता घराचे वेध लागले होते. एक दिवस आजींनी जवळ बोलावले, त्यांची ‘चिमणे’ ही हाक ऐकून बरोबर असलेल्या सहकाऱ्यांना हसू आले. मला मात्र ती आईची हाक वाटली. आजींनी प्रेमाने आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरून आपला खडबडीत हात फिरवला. ‘तुम्हीच आमच्या आयाबहिणी, सगळ्या मिळून च्या प्या,’ असे म्हणून कंबरेला खोचलेली वीसची नोट माझ्या हातात ठेवली. ‘आम्ही गरीब, अजून काय देणार? पण गावाकडे आलात तर जेवू घालीन,’ आजी हृदयातले बोलत होत्या. बाकी तिघीही सहमत होऊन माना डोलावत होत्या. खरंतर आम्ही निमित्तमात्र होतो. त्या चौघींची जिद्द, सकारात्मकता आणि सहसंवेदना यांमुळेच त्यांना उशिरा का होईना त्रासातून मुक्ती मिळाली. या सर्वांवर कळस झाला जेव्हा त्या म्हणाल्या, ‘आता अजून कोणाला काही त्रास असला तर अशाच चारपाचजणी मिळून धाडून देऊ. तुम्ही आहातच इथे. आपणच करायचं एकमेकींसाठी.’ त्यांचे हे उद्गार मला आयुष्याची दिशा देऊन गेले.
आपणच करायचं एकमेकींसाठी.

डॉ. स्वाती शिरडकर, औरंगाबाद
(लेखिका स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभाग प्रमुख आहेत.)
swati.shiradkar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...