आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Vaidya Shilpa Article About Ayurveda In Amrathi

शरीरस्वास्थ्यासाठी वर्तनही सत्त्वशील हवे.....तरच आयुर्वेदिक रसायनांचे फायदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जराण्याधिनाशकम् औषधम् रसायनम्
स्वस्थर्स्थोर्जस्करं यतु तद्वृष्यं तद्रसायनम्
चरक चिकित्सा- 1-5
रसायनतंत्रम् नाम वय: स्थापन मायुर्मेधा
बलकरं रोगहरणं समर्थच -- चरकसूत्र 1
स्वस्थ माणसाचे बल अथवा ऊर्जा वाढविणार्‍या द्रव्यास रसायन असे म्हणतात. रस, वीर्य, विपाक, प्रभाव इत्यादीमुळे रसायनद्रव्य आणि औषधी आयुष्यबल वाढविण्याचे काम करते. याशिवाय रसायनांमुळे दीर्घायुष्य प्राप्ती, स्मरणशक्ती वाढ, बुद्धी, आरोग्य, तारुण्य, तेजस्विता, वर्णस्वर वृद्धी, देह आणि इंद्रियबल वृद्धी, कांतिमान त्वचा, वाक्सिद्धी इत्यादी गोष्टींची प्राप्ती होते. रसायन सेवनाने हे फायदे होतात. असे आयुर्वेद ग्रंथात नमूद केलेले आहे. धातू जर बलवान असतील तर शरीरास दीर्घायू प्राप्त होईल आणि हे धातूबल प्राप्त होण्यासाठी रसायने महत्त्वाची आहेत.

धातू जर बलवान असतील तर शरीरास दीर्घायू प्राप्त होईल : व्यवहारात सामान्यपणे रसायन म्हणजे च्यवनप्राश घेणे असा मर्यादित अर्थ घेतला जातो. पण रसायन हे विविध प्रकारांनी तयार केले जाते. रसायनसिद्धीसाठी धातू, दोष, स्रोत, अग्नी चांगला असणे महत्त्वाचे आहे. दोषधातू जर प्राकृत कार्य करणारे असतील तर शरीरक्रियेचा व्यापारही तसाच राहतो. पचन व्यवस्थित होण्यासाठी अग्नी चांगला असणे महत्त्वाचे आहे. तरच औषधांचे कार्य शरीरात दिसून येईल.

रसायनाच्या उपयोगाने मनुष्य भरपूर धष्टपुष्ट व्हायला पाहिजे तरच रसायनाचे कार्य झाले असे वरवर पाहता वाटते. पण रसायनांचे मुख्य फल म्हणजे उत्तम आरोग्य संपन्नता आणि दीर्घायुष्य. रसायनाचे सर्वच गुण आचार रसायनाने मिळतात अशा व्याख्येत त्याची प्रशंसा करण्यात आलेली आहे. शुद्ध आचाराने मन आणि शरीराची निर्दोषता साधली जाते. यातूनच मनोबल, धैर्य, उत्साह वाढतो आणि शरीरबलाची प्राप्ती होते. प्राचीन काळात अशा पद्धतीचे आचरण करणार्‍या ऋषीमुनींंची संख्या भरपूर होती. म्हणून आचाररसायन हा सामान्य रसायनांपेक्षा दुर्लक्षित असा भाग असला तरी आजच्या काळात त्याची जास्त आवश्यकता आहे. कलियुगात राजस, तामस वृत्तीचा वाढता प्रभाव, स्पर्धा, ईर्षा, क्रोध, भ्रष्टाचार, महागाई या घटकांमुळे मनोविकार, हत्या, विभक्त कुटुंबे, दिशाहीन युवापिढी, पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण या सर्वांची वाढ झाली आहे.

मानसिक आरोग्य हे कोठेही विकत मिळत नाही
आपण फक्त आहार आणि शरीरशुद्धीकडे जास्त लक्ष देतो. पण मनाची शुद्धता वाढविण्यासाठी काहीच करत नाही.मानसिक आरोग्य हे कोठेही विकत मिळत नाही. चरकाचार्यांनी आचार रसायन म्हणजे काय,याची काही उदाहरणे दिलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे—1-सत्यवचन, 2-क्रोध न करणे, 3- मद्यपान न करणे, 4-अहिंसा, 5-शक्तीपेक्षा आधिक श्रम न करणे, 6- प्रिय भाषण करणे, 7-मंत्रजपन, 8- धैर्य बाळगणे, 9- आपल्या आर्थिक स्थितीनुसार दान करावे, 10- तपस्या, 11- देवता, गाय, ब्राह्मण, वृद्ध, गुरू, आचार्य यांची सेवा करणे, 12- क्रूर कर्म न करणे, 13- सर्वाविषयी दया आणि करुणा, 14- रात्रीची योग्य निद्रा, 15- दूध, घृत, सात्त्विक आहार सेवन करावा, 16- निरंहंकार वृत्ती, 17- स्थिर आचार विचार, 18- ईश्वर निष्ठा, 19- आत्मसंयम, 20- वृद्धसेवा, 21- अध्यात्म शास्त्राचे चिंतन, 22- कुल, धन, बल, यौवन यांचा अहंकार धरू नये.

हे आचरण कायम ठेवल्यास औषधी रसायन न सेवन करताही रसायनाचे फायदे मिळतील. केवळ रसायने घेऊन वरील आचार रसायनांचे पालन न केल्यास त्याला रसायनफलापासून वंचित राहावे लागते, इतके माणसाच्या सात्त्विक आचरणाचे महत्त्व मोठे आहे.

वैद्य शिल्पा प्र. येरमे, सोलापूर