आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकेचा अन्याय्य भडीमार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'प्राध्यापक लिमिटेड’ या जयदेव डोळे लिखित पुस्तकाचे परीक्षण ६ जुलैच्या ‘रसिक’मध्ये वाचले. परीक्षण वाचून मन क्षुब्ध झाले. पुस्तक वाचण्याची उत्सुकताही वाढली. एवढ्या सगळ्या भावना का उत्पन्न झाल्या? कदाचित मी प्राध्यापकी पेशामध्ये असल्यामुळे असेल कदाचित, पण त्याला सात्त्विक संतापाचीही झालर होती.

कुठून सुरुवात करावी, कळत नाही. एरवी, पुस्तक वाचून झाल्यानंतर छान आहे, बरे आहे, अनाकलनीय आहे इत्यादी प्रतिक्रिया येतात; पण ‘प्राध्यापक लिमिटेड’ पुस्तकाच्या समाप्तीनंतर मनात विचार आले, अरेरे! काय हे? किती टीका! पुस्तकात काय आहे, तर केवळ टीका, टीका आणि टीका! कुणावर? तर अर्थातच प्राध्यापकांवर! लेखकाने म्हटल्याप्रमाणे सोडून दिलेल्या व्यवसायावर भलेबुरे कुणीही लिहितो, पण स्वतःच्या व्यवसायावर सेवेत असताना नेम धरून त्याचा वेध घेणारे फारच थोडे! लेखक जयदेव डोळे त्या साहसवीरांपैकीच एक!

प्राध्यापकांवरील या टीकामय पुस्तकातल्या प्रस्तावनेमधील काही वाक्यांनी सुरुवात करूया. लेखक लिहितात, “...पोथ्यापुराणे आणि वेदप्रामाण्य याप्रमाणे प्राध्यापकांची विद्वत्ता पाठ्यपुस्तकांपलीकडे जात नाही. प्रस्थापित समाजव्यवस्थेचे आणि राजकारणाचे ते कडवे पाठीराखे असतात, म्हणून महाराष्ट्राचे उच्च शैक्षणिक वातावरण गोठलेले, कदमताल करणारे व निर्जीव झाले आहे. ग्रामीण भागात तर भयंकर बीभत्स गारठा झोंबत असतो. हा गारठा निघून जावा, वैचारिक मंथनातून उष्णता यावी आणि महाराष्ट्र खरा पुरोगामी व्हावा, हीच सदिच्छा व सद्हेतू या लिखाणाला आहे. त्याने कुणी चिडले, संतापले, खंतावले तर ते हवेच आहे.’

माझ्या मते, पुस्तक वाचनानंतर लेखकाचा हेतू खरे तर साध्य तर होतच नाही, शिवाय हेतूंबद्दल शंका मात्र निर्माण होते. या पुस्तकाची प्रसिद्धी ही एक क्लृप्ती वाटते. कारण वाचनाअंती, तसेच पुस्तक प्रकाशन ते आजवर ना उष्णता निर्माण झाली, ना मंथन निर्मिती झाली; झाला तो फक्त खेद व चीड! लेखकाच्या लेखनहेतूला धरून या पुस्तकात काही नाहीच मुळी. किंबहुना, प्राध्यापकांवरील पराकोटीचा राग व दुःस्वास बघून मन विषण्ण होते, लेखकास खरा प्राध्यापक न कळल्याचे दु:ख होते.

पुस्तकात एकंदर २५ लेख आहेत. जवळजवळ सर्वच लेखांत प्राध्यापकांवर टीकेच्या तोफा डागलेल्या आहेत. पहिल्या लेखात प्राध्यापकांच्या पुस्तके लिहिणे व प्रकाशनासंदर्भातील ईप्सित व इंगित याविषयी अतिशय रंजकपणे मांडले आहे. यात प्राध्यापकांवर दोहोबाजूंनी प्रहार केलेले आहेत. प्राध्यापकांच्या पुस्तके लििहण्यावर व न लिहिण्यावरही, तसेच प्राध्यापकांचा नगण्य स्वरूपातील प्रकाशन व्यवसायात सहभाग असण्यावरही!

प्राध्यापकांच्या मुलाखती, नियुक्त्या, बढत्या, पदभार, पुरस्कार, अनुदान अगदी साहजिक आहे. परंतु यात शासनधोरणांचा काही दोष आहे का, याचा विचार व्हावा. इतर सर्व क्षेत्रांत अनुभव वाढला असता बढती व पगारवाढ होते.
प्राध्यापकांसाठीच स्वतंत्र व जाचक नियमावली का, असा स्वाभाविक प्रश्न लेखकास का पडू नये? लेखक असे म्हणतात की, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, राष्ट्र व राष्ट्रवाद’ इत्यादींवर लिखाण करणारे या विषयांतील प्राध्यापक का नाहीत? दत्ता देसाई, अभिजित घोरपडे, संतोष शिंत्रे, प्रकाश बाळ, आनंद तेलतुंबडे, इत्यादी हे प्राध्यापक नाहीत. लेखक असेही म्हणतात की, ‘प्राध्यापकांनी मोठमोठी बौद्धिक झेप न घेण्याचे कारण काय? ते अत्यंत मर्यादित वर्तुळात अडकून का पडतात?’ मला लेखकाचे हे मत पूर्णतः अमान्य आहे. लेखन ही एक कला असून सर्वच क्षेत्रांत या कलेचे जोपासक व उपासक त्यांच्या क्षमतेनुसार लिखाण करीत असतात. त्यात वेगवेगळ्या प्रकारचा दर्जा बघण्यास जरूर मिळतो. तसेच व्यक्तिपरत्वे, आवडीनुरूप, क्षमतेनुरूप, त्यात वैविध्य बघावयास मिळते. आपण परिमाण कुठले वापरतो, त्यावरही त्याचा दर्जा ठरतोच की!

पुस्तकातील एका लेखाचे शीर्षक “डॉक्टरलेली विद्वत्ता’ असे आहे. सदर लेखात पीएच. डी. व इतर संबंधित बाबींवर खूपच परखड लिखाण आहे. प्राध्यापकांना पीएच. डी. करणे हा स्वेच्छेचा भाग असतोच असे नाही. पीएच. डी. करणे म्हणजे संशोधन करणे. फक्त प्राध्यापकांनीच नाही तर सर्व पीएच. डी. करणार्‍यांनी संशोधन करणे अपेक्षित आहे. संशोधन असे अट्टहासाने केल्यास होत नाही. नाहीतर सर्वच पीएच. डी. धारक काही अभ्यासाअंती संशोधन करून, शोध लावून शास्त्रज्ञ झाले असते, न्यूटन व आइन्स्टाइनप्रमाणे! मुळात पीएच. डी. करणे म्हणजे ज्ञान वृद्धिंगत करणे. विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणे, हा खरा हेतू आहे. तुम्ही काय संशोधन करता, कुठले तंत्र वापरता, माहितीचे संकलन, त्याचा अभ्यास तर्क, निष्कर्ष व त्यातून ज्ञानाची खोली वाढवणे हे महत्त्वाचे आहे.

प्राध्यापकांच्या पीएच. डी. प्रबंधाच्या पुस्तकस्वरूपाच्या प्रकाशनावरदेखील लेखकाचा आक्षेप आहे. खरे पाहता पीएच. डी. प्रबंध हा तर्कशुद्ध, अभ्यासपूर्ण व बौद्धिक परिपाक असतो. त्यात संशोधन, अभ्यास, संदर्भ माहितीचे संकलन, विवेचन केलेले असते. हा प्रबंध कुठल्या तरी कपाटात खितपत पडण्याऐवजी जर पुस्तक स्वरूपात ज्ञानार्जनासाठी उपलब्ध करून दिला तर ते उत्तमच आहे. लेखकानेदेखील त्यांच्या पूर्वी प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह म्हणूनच हे पुस्तक प्रकाशित केलेले आहेच ना!
सर्वात महत्त्वाचे हे आहे की, प्राध्यापकांवर इतके नकारात्मक वाचल्याने वाचक जो विद्यार्थी आहे, त्याच्या मनावर काय परिणाम होईल, याचा विचार व्हावा.

(लेखिका या मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागप्रमुख व उपप्राचार्य असून २३ वर्षांपासून शिक्षणक्षेत्रात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.)
varsha.patil@gmail.com