आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Vinaya Bhagwat Article About Women In Their 50s

आता कुठे रंग भरतोय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेमेचि येतो मग हा महिला दिवस! या दिवसानिमित्ताने दर वर्षी सगळ्या व्यासपीठांवर आढावा, चर्चा, आणि नव्या योजना सुरू होतात. विविध प्रसिद्धीमाध्यमांमधून आणि स्थानिक कार्यक्रमातून त्या निमित्ताने होणा-या समाजदर्शनातून थोडे आत्मपरीक्षणही आपोआप होत असावे; पण या वर्षी मात्र हे सारे ठसठशीतपणे पांढ-यावर काळे करून शब्दांकित करण्याची संधी/योग आला आहे.
आता पन्नाशी उलटूनही 2 वर्षे झाली म्हणजे पन्नाशीला स्थिरावले आहे आणि साठी अजून खूप लांब आहे असं वाटतंय. (पण ती लवकरच येणारेय, जशी विशी, तिशी, चाळिशी पण आली होती हेही खरंच.)
तर आजवर काय ठरवलं ते सगळं जमलं का?
खरं सांगायचं तर ठरवलं असं काहीच नव्हतं. दररोज छान वाटायला हवं हे मात्र आत कुठे तरी नक्कीच जाणवत असतं. घराबाहेर नोकरी करून घरातही लक्ष द्यायचं म्हणजे काय असतं हे लग्नापूर्वी माहीत नसतं हेच बरं असतं, नाही तर अवसानच गळून गेलं असतं. या गोष्टी त्यात पडल्यावरच उमगतात, पूर्वी नाही हे एका परीने ठीकच असतं असं वाटून जातं.
सुशिक्षित आईवडील आणि सासूसासरे असल्याने शिक्षणाचं महत्त्व दोन्ही घरात होतं. त्यांचा चांगला आधार मिळाल्याने लग्नानंतर शिक्षण तर चालू राहिलंच, पण पहिलं अपत्य झाल्यावरही 3 वर्षं शिकण्यात गेली. या काळात आपलं मूल लहान आणि व्यावसायिक शिक्षण प्रक्रियेत आपण अजून लहान, त्यामुळे इकडेतिकडे लक्ष द्यायला काही म्हणता काहीही वाव नव्हता.
तब्येतीच्या तक्रारी या आनुवंशिकता आणि जीवनशैली यांमुळे आजकालच्या प्रथेप्रमाणे तिशीतच सुरू झाल्या. त्यामुळे स्वत:चे आरोग्य सांभाळताना त्याचा एक चांगला साइड इफेक्ट म्हणून घरातही काही प्रयोग झाले. मुलंही त्यातून काही शिकली असतील, अशी आशा आहे. मुलांना आपण वाढवतो, पण शेवटी त्यांना जसे वाढायचे तशीच ती वाढतात. आपण काही एका मर्यादेपर्यंतच त्यांच्या घडण्यात बरावाईट सहभाग घेऊ शकतो. स्वत:वर काम करत राहिलं तर मात्र त्याचा फायदा आपल्याला तर होतोच, पण परिसरावरसुद्धा होतो, असं मी अनुभवांती मानायला शिकले आहे. त्यानुसार रोजच नियमाने डोळसपणे या गोष्टीवर लक्ष दिले जाते. तसाच विचार करणारे मित्रमैत्रिणी, सहकारी आजूबाजूला मिळाल्याने हे काम जास्त आनंददायी पद्धतीने होते. आपल्याला झेपतात तेवढीच कामे करणे कबूल करायचे. जे शक्य नसेल ते चांगल्या रीतीने समोरच्याला सांगायचे, हा नियम पाळल्याने आपला वेळ आपल्या इच्छेप्रमाणे हव्या त्या उद्योगात घालवू शकले. आमच्या घरात सणवार व्रतवैकल्ये इ. नाहीच, ज्याला जे करावे वाटते ते त्याने करावे हे स्वातंत्र्य माहेरी होते आणि सासरीही मिळाले. त्यामुळेही याही गोष्टींचे बंधन पडले नाही. त्यामुळे फक्त आवडीच्या आणि आवश्यक गोष्टी करून बघायला वेळ मिळाला. माझी सासर व माहेर ही दोन्ही कुटुंबे मध्यमवर्गीय होती, खाऊन पिऊन आणि लिहून वाचून (या शब्दप्रयोगाकरिता मंगला गोडबोलेंचे आभार) सुखी होती. कुठलीही गोष्ट करताना पैशाला किती महत्त्व द्यायचे आणि किती द्यायचे नाही याचे चांगले संस्कार आणि शिकवण घरातूनच मिळाली त्या मुळे बरेच काम सोपे झाले. रोजचा दिवस नवा, आणि रोज झोपताना नातेसंबंधांचे सर्व अकाउंट्स सेटल करून रिटायर व्हायचे, असा जास्तीत जास्त प्रयत्न केल्याने उद्या काय नवीन या उत्सुकतेने झोप येते, यातच सर्व आले.
अजून मुलांची शिक्षणं पार पडतायत, पुढल्या शिक्षणासाठी मुलं आता लवकरच घराबाहेर पडतील, मग कसं वाटतं हे अजून अनुभवायचंय! हा एक मोठाच टप्पा असणार यात काही वाद नाही. मग इतर काही आवडीच्या गोष्टी शोधता येतील. माझ्या ब-याच मैत्रिणींना जावई/सुना आल्या, काही आजीही झाल्याहेत. त्यांच्याकडून माझ्या या अजून न आलेल्या टप्प्याबद्दल नेहमीच गप्पा होतात आणि अनौपचारिक पद्धतीने मानसिक तयारी होत राहते. कुटुंब, मित्रमंडळींच्या सहवासात पन्नाशी पारही झाली, अर्ध्याहून अधिक खेळ खेळून संपलाय; पण आताच कुठे रंग भरतोय असं का बरं वाटतंय?
vinaya_ajit@yahoo.com