आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंकेची पाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक होती छाया, एक तालुक्याच्या गावी राहणारी तिला दोन मुले. धाकटा मुलगा आठवीत शिकतोय, मुलगी दहावीत. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया होऊनही आठ वर्षे लोटली. मागच्या महिन्यात जरासा श्वेतपदराचा त्रास जाणवू लागला. एका स्त्रीरोगतज्ज्ञास दाखवून आली. डॉक्टरांनी सांगितले - ‘‘गर्भपिशवी नासली आहे. काढून टाकायला हवी, ताबडतोब’’ छाया घाबरून गेली. शहरात एका डॉक्टरांकडे गेली. डॉक्टर मॅडमने सांगितले, गर्भपिशवी काढून टाकलीच पाहिजे, पण आज मी तुमच्या गर्भाशयमुखाला शॉट देते. ‘शॉट’चा उपचार घेऊन छाया घरी आली. गावातल्या बायका जमल्या. गप्पा सुरू झाल्या. पांढरा पदर जाणे म्हणजे कॅन्सरच असणार आणि छायाला नक्कीच कॅन्सर झाला आहे, अशा तºहेची चर्चा करून छायाच्या मनातली भीती अधिकच वाढवून आणि मन:शांती पूर्णपणे संपवून सगळ्या बायका आपापल्या घरी गेल्या...

दुसर्‍या दिवशी छायाची आई व मावशी आल्या. त्यांनी तिला झाडपाल्याच्या औषधाचा कसा उपयोग होते, पांढरा पदर जाणे कसे थांबते, हे सांगितले. घाबरलेली छाया, ते औषध खाण्यासाठी तयार झाली. कण्हेरीच्या फुलांचा व पानांचा कुटून केलेला चोथा तिला दिला गेला. तिला मळमळू लागले. उलटी झाली. पोटात आग होऊ लागली. पुन्हा डॉक्टरकडे जावे लागले. सलाइन-ग्लुकोजच्या बाटल्या लावण्यासाठी तीन दिवस ती दवाखान्याची वारी करीत राहिली. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘झाडपाल्याच्या औषधाचे विष तुमच्या पोटात पसरले आहे. ते जिरून जाईपर्यंत त्रास होणारच. रोज दवाखान्यात या व सलाइनच्या चारदोन बाटल्या लावून घ्या. हळूहळू नीट होऊन जाल.’’ आज या गोष्टीला महिना होऊन गेला आहे. छाया शरीराने पूर्ण बरी झालीय, पण मनाने पूर्णपणे अस्थिर झाली आहे. तिला भास होतात. तिला वेडीवाकडी स्वप्नं पडतात. शांत झोप लागत नाही. भूक लागत नाही. पांढरा पदर थोडा जरी गेला तरी ती प्रचंड अस्वस्थ होते. कुठल्या डॉक्टरकडे जावे कळत नाही. ऑपरेशनची भीती वाटते. पोटात अजूनही विष असेल का, हा प्रश्न मधून मधून तिला त्रास देत राहतो.
तिच्या एका नातेवाईक बाईने मला सांगितलेली ही छायाची कहाणी.

ग्रामीण भागात राहणार्‍या कुणाचीही कहाणी असू शकते. काय करायला हवे छायाचे? छायाला गरज आहे, एका स्त्रीरोगतज्ज्ञाची. अन् पॅपस्मिअर नावाच्या एका छोट्या नि कमी खर्चाच्या तपासणीची. ही पॅपस्मिअर तपासणी अतिशय सोपी असते. रिपोर्टदेखील एका दिवसात पेशंटच्या हातात पडू शकतो. कुठले इंजेक्शन नाही किंवा दवाखान्यात मुक्कामदेखील करावा लागत नाही. हा रिपोर्ट काय सांगतो? तर गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची काही पूर्व लक्षणे आहेत का किंवा येणार्‍या काही वर्षांत कर्करोग होण्याची शक्यता आहे का, हे सांगतो. हा रिपोर्ट नॉर्मल आला तर केवळ औषधोपचाराने पांढरा पदराचा त्रास कमी करता येतो व ऑपरेशनची गरज उरत नाही. पॅपस्मिअर टेस्टला कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट म्हणतात. छायासारखाचा त्रास असणार्‍या प्रत्येक बाईने या कहाणीवरून एक महत्त्वाचा बोध घ्यायला हवा. पांढरा पदर जाणार्‍या प्रत्येक बाईला कॅन्सर होत नसतो. प्रत्येकीला गर्भपिशवी काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेची गरज नसते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मन:शांती ढळावी इतकी तर ही गोष्ट भयंकर नसते. पॅपस्मिअर तपासणीनंतरदेखील गर्भाशयमुखाची बायोप्सी करणे, हीदेखील एक कमी खर्चाची अन् सोपी तपासणी असते. या दोन्ही तपासण्यांचे रिपोटर््स जर सांगत असतील की, कॅन्सरची सुरुवात आहे, तरच गर्भाशय काढून टाकायला हवे असते. अन्यथा, प्रत्येक श्वेतपदराची तक्रार असणार्‍या स्त्रीचे, गर्भाशय काढून टाकणे म्हणजे बंदूक घेऊन नाकतोडा मारण्यासारखा प्रकार आहे.

साधारणत: दहाएक वर्षांपूर्वी, मतिमंद मुलींना सांभाळणार्‍या काही संस्थांनी या मुलींना मासिक पाळीत स्वच्छतेची काळजी घेता येत नाही आणि या मुली वयात आल्यानंतर, त्यांच्यावर लैगिंक अत्याचार होऊन या मुली गर्भार होऊ शकतात, म्हणून गर्भाशयं काढून टाकायला हवीत, असा मुद्दा जनमानसापुढे ठेवला होता. यावर बराच ऊहापोह झाला होता तरीही अशा मुलींचे गर्भाशय काढून टाकावे, असा कायदा कुठेच अस्तित्वात आला नाही. स्त्रियांना गर्भाशयमुखाचा व गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचे अन् आज प्रत्येक शहरात गर्भाशय काढून टाकण्याच्या होणार्‍या शस्त्रक्रियांचे प्रमाण तपासले, तर ते अजिबात संयुक्तिक वाटत नाही.

वास्तविक स्त्रियांना होणार्‍या कॅन्सरपैकी स्तनांचा कर्करोगदेखील आघाडीवर आहे. मग काय स्तनांच्या बारीक सारीक तक्रारीसाठी स्तनांवर शस्त्रक्रिया करणे संयुक्तिक होईल काय? स्त्रियांच्या मनातील शंका-कुशंका दूर करण्यासाठी स्त्रियांचे प्रबोधन करण्यासाठी डॉक्टरांजवळ वेळ अपुरा असतो. डॉक्टर - रुग्ण परस्पर संवाद अन् त्या नात्यामधील दिवसेंदिवस कमी होत जाणारा विश्वास या खूपच गंभीर गोष्टी आहेत. संपूर्ण समाज स्वस्थ राहण्यासाठी डॉक्टर - रुग्ण संवाद फारच अगत्याचा असतो.

प्रत्येक महिला, या छायासारखी संभ्रमित अवस्थेत जायला नको, असेल तर रुग्णांनीदेखील डॉक्टरांशी सविस्तर चर्चेचा आग्रह धरायला हवा आहे. आजदेखील छाया, रात्री-बेरात्री हाच विचार करीत असते, की माझ्या पोटात ते विष आता कुठपर्यंत पोहोचले असेल? माझी गर्भाशयाची पिशवी नासली आहे का? मला कॅन्सर झाला आहे का? ‘उद्या’ होणार्‍या कॅन्सरच्या केवळ शंकेमुळे, तिचा ‘आज’ पूर्णपणे बिघडून गेलेला आहे.
कवी म.भा. चव्हाण - त्यांच्या ‘धर्मशाळा’ काव्यसंग्रहातील एका कवितेतून म्हणतात.
‘‘शंका मनात राहते
आणि मनाला डसते
घरमालकाचे घर
शंका अशी वापरते.’’
संपूर्ण मानसिक स्वास्थ्य बिघडलेली ही शंकाग्रस्त, भीतीग्रस्त अशा एका छायाची कहाणी !
समस्त महिलांनी, पुरुषांनी बोध घ्यावा अशीच.
सविस्तर चर्चा करून, तिला तपासून, तिला स्वस्थ करण्याची संधी मला मिळावी म्हणून मीच छायाची वाट पाहतेय. ही छाया माझ्याकडे कधी येईल?