आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभी खाली है चौथा खाना !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंचल फुलपाखरी वृत्तीच्या जीवनसाथीबद्दल बोलणारी एक खूप वेगळी कविता आहे. वेगळी म्हणूनच कायम स्मरणात राहणारी. ‘दिल के चार खाने’ अशा शीर्षकाची. उर्दू कवयित्री तरन्नुम रियाझ यांची.
‘जिस में है मेरे लिए चाह, दहाई भर से
वो अलग खाना है
इक में इश्क है उसका
आज दो बरसों से
इन दिनों तीसरे मे है, एक हमसाए की मेहमाँ लडकी
और अभी खाली है चौथा खाना
सारे जज्बों को अदा करता है, इंसाफ के साथ
मेरी चाहत के बिना जी भी नही सकता और
फून माशूका का आ जाए, तो खिल उठता है...
जनमानसात रुजलेली आणि तमाम स्त्रियांनी मनोमन स्वीकारलेली एक गोष्ट म्हणजे, पुरुष हा फारसा एकनिष्ठ नसतोच; किंबहुना, त्याचं असं इतर स्त्रियांबाबत चोखंदळ रसिक असणं, हे पुरुषार्थाचं लक्षण मानलं जातं. आजच्या समानतावादी विचारसरणीला न पटण्यासारखं.
‘बहरला पारिजात दारी; फुले का पडती शेजारी?’
हे जुनं भावगीतदेखील स्वाभाविक सवती मत्सराबद्दल सूचकपणे बोलणारं.
पतीने अचानकपणे दुसर्‍या स्त्रीमध्ये गुंतणं ही गोष्ट पत्नीला भूकंपासारखीच भासत असते. तिचं संसारविश्व उद््ध्वस्त करून जाणारी ही घटना प्रत्येक स्त्री आपआपल्या कुवतीनुसार पेलते. मूकपणे सोसण्याची एक तºहा असते. कोणी एखादी वेगळं होण्याचंच ठरवून टाकते. एखादी संयत बाई वादळाचा जोर संपण्याची वाट पाहत किनार्‍यावर घट्ट पाय रोवून उभी राहते. एखादी पत्नी त्या दुसर्‍या स्त्रीचा दुस्वास करत प्रत्यक्षपणे तिच्याशी भांडतेदेखील. प्रत्यक्षात काय होतं? विधिलिखित जे असतं, तसं घडत जातं. प्रत्येकीचं ललाटीचं लेखन वेगळं अन् म्हणूनच अशा घटनांबाबत एखादं पक्कं गणित मांडताच येत नाही. विषय तर गंभीरच असतो. त्याचं दु:खदेखील ज्या-त्या काळजालाच ठाऊक असतं. पण या उर्दू कवयित्रीने मात्र या विषयाला किती नर्मविनोदी स्वरात मांडलं आहे!

तिच्या विषय निवडीचं अन् काव्यरचनेचं मनोमन कौतुक वाटलं. पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे व्यथित झालेली ‘अर्थ’ चित्रपटातील शबाना आझमी अन् तिचा तो व्याकुळ चेहरा आठवून गेला. जगजितसिंगच्या आवाजातील
‘तुम इतना जो मुस्करा रही हो
क्या गम है जिस को छुपा रही हो’
हे गीतदेखील आठवून गेलं. याच गीतामध्ये एक फार अर्थपूर्ण ओळ आहे.
‘रेखाओं का खेल है मुकद्दर
रेखाओं से मात खा रही हो’
अगदी सत्य असणारी ही ओळ. विधिलिखितापुढे भली भली माणसे पराभूत होतात. आयुष्यात अनेकदा असं दिसतं की, असामान्य ताकदीची असामीदेखील विचित्र ग्रहमानापुढं हतबल होऊन जाते. पुरुषांना मात्र हे दु:ख फार दुर्मीळपणानं अनुभवाला येतं; याचं कारण असं की, स्त्रीच्या अशा वर्तनाला कठोर शिक्षा आहे. संशय घेणे हा तर नवर्‍याचा आदिम हक्कच मानला जातो. काहीच अपराध नसलेल्या सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावणारा राम तर श्रीरामप्रभू आहे. रामायणाची कथा शतकानुशतके ऐकणार्‍या भारतीय मनाला सीतेवर अन्याय झाला आणि तो श्रीरामाने केला, असे वाटतदेखील नाही.
अशा सगळ्या पार्श्वभूमीवर तरन्नुम रियाझ किती सहज म्हणतेय...
‘खाली खाना उसे बैचेन भी करता है’
शिवाय पुढे म्हणते-
‘दिल उसे ऐसा ही कुदरत ने दिया है
और मैं उसकी फसली से बनी हूँ
उसका दुख जानती हूँ
कितना मासूम है, नादान है
पहचानती हूँ’
मूळ स्त्री ही मूळ पुरुषाच्या फासळीपासून बनली आहे, हे मिथक सांगत कवयित्री किती टोकाचा समंजसपणा दाखवतेय. नवर्‍याला पूर्णपणे समजून घेत, लहान मुलाच्या लहरी स्वभावाला समजून घ्यावे तसे नवर्‍याला समजून घेणारी अशी बाई, कवितेत आहे; पण खर्‍या जगात असेल का? भूकंपाचा हादरा बसल्यावर सगळंच उद्ध्वस्त होतं... पण काळ औषध आहेच सगळ्या संकट, दु:खांवर. हळूहळू पुनर्वसन होतंच मनाचंदेखील. या कवितेतील बाईसारखं मनाचं प्रातिभिक सामंजस्य दाखवता येण्यापेक्षाही मनातून असं निर्लेप वागता येईल का बाईला?

कागदावर कविता लिहिणं अन् कागदावर त्या कवितेबाबत लिहिणं तर जमलंय बाईला... खर्‍या जगण्यात जमेल का?

एक पत्नी आणि एक प्रेयसी यांच्याबरोबर प्रेमाचे खेळ खेळत, सहजपणे शेजार घरातील नव्या पाहुणीकडे पाहात नेत्रसुख घेणारा हा माणूस अस्वस्थ आहे. त्याची अस्वस्थता पाहून पत्नी म्हणतेय की, त्याच्या हृदयाच्या चौथ्या कप्प्यात अजून कुणी सुंदरी आली नाहीय, म्हणून तो कधी कधी अस्वस्थ असतो. शिवाय ती असंही नमूद करतेय की, तो सगळ्या भावनांना न्याय देतोय. इतकी पराकोटीची प्रगल्भता अन् त्यातून येणारं सामंजस्य दुर्मिळच असतं. म्हणूनच या कवितेला सलाम!