आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसालेदार चटकदार! (नाट्यदर्पण)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्मिती-लेखन-दिग्दर्शन-अभिनय या पातळ्यांवर सगळं काही ‘प्रेडिक्टेबल’ असताना काहीतरी अनप्रेडिक्टेबल करून जायचं, यासाठी वेगळीच चमक नि चटक असावी लागते. ‘ढॅण्टॅ ढॅण’मध्ये ही चमक अथपासून इतिपर्यंत जाणवते...

भरत जाधव एन्टरटेन्मेन्टचे ‘ढॅण्टॅ ढॅण’ हे नाटक रंगभूमीवर आले आहे. या नाटकाने धमाल उडवून दिली आहे. कौटुंबिक जिव्हाळ्याच्या नाटकांची चाकोरी सोडून या नाटकाने वेगळाच इतिहास घडविला. आहे. केदार शिंदे आणि विजय केंकरेसह काही मराठी दिग्दर्शक ब्रिटन दौऱ्यावर गेले. तेथे लंडन थिएटरच्या परंपरेचा अभ्यास करताना, केदार शिंदे यांना कल्पना सुचली, त्यातून ‘ढॅण्टॅ ढॅण’ जन्माला आले.

हे नेमके नाटक आहे की एखादा थ्रिलर सिनेमा, असे म्हणण्याचा मोह निर्माण व्हावा, असे हे नाटक. ‘शॅडो प्ले’ म्हणजेच पाश्चात्त्य छायानाट्याच्या पार्श्वभूमीवरील या नाटकाने अनेक धक्कातंत्रांचा वापर केला आहे. लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे यांचे हे नाटक ब्रिटिश नाटकाचा मराठी अवतार, असंच म्हणावं लागेल. नाटकाचा पहिला धक्का सुरू होतो, तो योगासनांचा कानमंत्र देणाऱ्या निवेदक-निवेदिकेच्या रूपाने. ही योगासने म्हणजे खरीखुरी योगासने नव्हेत, तर मोबाइल बंद ठेवा, सायलेन्ट मोडवर ठेवा, टाळ्या वाजवा, असा संदेश देणारा योगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योग महिम्याची आठवण करून देणारी ही योगासने म्हणजे तर प्रेक्षकांना कानपिचक्याच. या कानपिचक्या अथवा कानमंत्रानंतर सुरू होतं, एका नोकरदार मध्यमवर्गीयाचं आत्मकथन.

कन्टेनर चोरीस गेल्याने हा नोकरदार म्हणजे, भरत जाधव हवालदिल होतो. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून उपासमारीची वेळ आलेल्या आपल्या बापाने रेल्वेत असताना रेल्वेचा डबाच्या डबा घरी आणला. आम्ही रेल्वेच्या डब्यातच वाढलो, असे भरत जाधव सांगतो आणि कन्टेनर चोरीचे गूढ वाढते. कन्टेनर चोरीच्या गुन्ह्याखाली पसार झालेला भरत जाधव एका महिलेच्या खुनाखालीही घेरला जातो. एकूणच, हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होतो. मग डिकॉस्टा नावाच्या गोव्यातल्या श्रीमंत माणसापर्यंत भरत जाधव पोहोचतो. एखाद्या हिंदी चित्रपटात अथवा इंग्रजी बाँड चित्रपटात शोभावे, असे नाट्यमय प्रसंग सुरू होतात. डिकॉस्टा भरत जाधवचा खून करतो. पण तो वाचतो, त्याचा शोध शेवटी समुद्रात लागतो. कोळी बांधव त्याचा प्राण वाचवतात. डिकॉस्टावर पिस्तुल रोखतो, तो भरत जाधवचा बॉस. भरत जाधव म्हणतो, ‘अरे! बॉस आले. कन्टेनर डिकॉस्टाने चोरले.’ बॉस सांगतो, ‘कन्टेनर मीच चोरला. नोकरीत राहून माझे हे कारनामे सुरूच असतात...’

‘ढॅण्टॅ ढॅण’ या नाटकात सर्वत्र फिल्मी तंत्राचा वापर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केला आहे. सायक्लोरामाचा वापर, स्पॉट लाईटचा वापर, नेपथ्याचे तंत्र, मूक अभिनय या सर्वांमुळे ‘ढॅण्टॅ ढॅण’ चाकोरीबाहेरचे नाटक ठरते.

या नाटकात केदार शिंदे आणि भरत जाधव यांनी पुरेपूर स्वातंत्र्य घेतले आहे. जणू हे मुक्तनाट्य वाटावे. शाहीर साबळे यांच्या ‘बापाचा बाप’, ‘कशी काय वाट चुकला’, ‘आंधळं दळतंय’ आदी मुक्तनाट्यांनी रंगभूमीवर एक स्वतंत्र परंपरा निर्माण केली. त्याचे स्मरण हे नाटक पाहताना होते. भरत जाधवने या नाटकात इतके स्वातंत्र्य घेतले आहे की, आधीच्या ‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदरपंत’ अशा नाटकांचाही उल्लेख या नाटकात केला गेला आहे. इतकेच काय, ‘गोड गोजिरी लाज लाजिरी’ हे गाणे केदार शिंदे याने माझ्याकडून तब्बल दोन नाटकात गाऊन घेतल्याचा उल्लेख भरत जाधव याने केला आहे. नेपथ्य, प्रकाश, संगीत, अभिनय अशा सर्वच पातळ्यांवर ‘ढॅण्टॅ ढॅण’ उजवे आहे. हा एक मती गंुग करणारा हाय व्होल्टेज ड्रामा आहे.

नाटकातील कलात्मकता, कलाकुसर आणि क्लृप्त्या या तिन्ही गोष्टी भिन्न असतात. धक्का तंत्र आणि समकालीन संदर्भांवरील प्रहसनात्मक भाष्याने नाटक चटपटीत वाटते, पण चटपटीत नाटक कलात्मक असेलच असे नाही. समकालीन संदर्भांनी नाटक मसालेदार वाटते, पण अशी ‘स्पाइसी’ नाटके मूळ कलात्मकतेला फाटा देतात का? केदार-भरत, जरा विचार करा.

prakash.khandge@gmail.com