आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतृत्त्वाला कष्‍टाचं कोंदण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या दुष्काळामुळे राज्यभर चर्चेत असणारा जालना जिल्हा. दुष्काळाच्या दाहकतेबरोबर तिथल्या सामान्य शेतक-यांची होणारी ससेहोलपट सर्वांसमोर येत आहे; पण या जिल्ह्यात काही शेतकरी असे आहेत जे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जीवनाची लढाई लढत आहेत. सीता मोहिते अशा ध्येयवेड्या व्यक्तींपैकी एक. गरीब घरातून आलेल्या सीतातार्इंचा विवाह अवघ्या 13व्या वर्षी झाला. सासरसुद्धा अठराविश्वे दारिद्र्यात गुरफटलेले. मोलमजुरी आणि सालदारी करून संसारगाडा चालत होता. काही तरी करून ही परिस्थिती बदलली पाहिजे, असं सीतातार्इंना वाटत होतं. पत्नीची ही हुरहूर पती रामभाऊंंनी ओळखली. पत्नीला तिच्या मनाप्रमाणे काम करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. व्यवसाय करणे आपल्यासारख्या गरिबांचे काम आहे काय, असा प्रश्न उपस्थित करत सासरच्या मंडळींनी विरोध दर्शवला; पण व्यवसाय करण्याच्या इच्छेने पेटून उठलेल्या सीता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. घोडेगाव सोडून त्या सिंधी काळेगावला आल्या. येथे त्यांनी द्राक्षशेतीत भागादारी केली. भाजीपाला विकला. रोपवाटिका चालवली; पण मनासारखे काही होत नव्हते. एकेदिवशी योगायोगाने आवळा कँडीचे पाकीट त्यांच्या हाती आले. त्याची चव त्यांना आवडली. अशा स्वरूपाचे एखादे उत्पादन आपण करू शकतो, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी आवळा कँडी तयार करण्याचा निर्णय घेतला; पण सीताताईंचा पहिला प्रयोग फसला. मात्र, त्यांनी हार मानली नाही. त्यांनी लिंबेगाव येथे जाऊन आवळा कँडी आणि फळ प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेतले.

प्राथमिक भांडवल दोनशे रुपयांचे
व्यवसाय किंवा उद्योगासाठी भांडवलाचा प्रश्न अनेकांसमोर यक्ष म्हणून उभा राहतो; पण सीतातार्इंनी मोजक्या भांडवलावर आपला व्यवसाय सुरू केला. त्यांनी 200 रुपयांचा आवळा खरेदी केला. 2003 मध्ये जालन्यात झालेल्या शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात आवळा कँडी आणि सरबताचा स्टॉल लावला. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. पाच दिवसांत 1200 रुपयांची विक्री झाली. खर्च वजा जाता मोहिते दांपत्याला 1000 रुपयाचा नफा झाला. या नफ्यातून त्यांचा आवळा प्रक्रिया उद्योगाचा प्रवास सुरू झाला.

मार्केटिंगचे अनोखे फंडे
व्यवसायवाढीचे किंवा मार्केटिंगचे कोणतेही पुस्तकी शिक्षण नसणा-या सीतातार्इंनी अनुभवावरून अनेक धडे गिरवले. सीताताई सांगतात, ‘जिथे लोक जमणार असतात त्या ठिकाणी मी माझी उत्पादने घेऊन जाते. कोठेही बाहेर जाताना पर्समध्ये आवळा कँडीची पाकिटं असतात. स्वत:ची उत्पादने विकण्यासाठी मी कोणत्याही प्रकारचा संकोच बाळगत नाही. कारण ते करण्यामागे माझी प्रामाणिक मेहनत असते. बस, रेल्वेच्या प्रवासात मी ही कँडी प्रवाशांना चवीसाठी देते. तुम्हाला विकत हवी असल्यास कँडी उपलब्ध आहे, असेही सांगते. उत्पादनाच्या गुणवत्तेवर मेहनत घेत असल्यामुळे आणि फक्त फायदा मिळवणे हा उद्देश नसल्याने माझी उत्पादने चविष्ट असतात. त्याची चव घेणारी व्यक्ती पुन्हा मागणारच याची मला हमी असते. यामुळे प्रवासातला वेळ सत्कारणी लागतो. उत्पादनाची जाहिरातही होते. लग्न, मुंज, शिबिरं, मेळावे, हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमामध्येही मी हीच पद्धत वापरते.’

नावीन्याचा शोध घ्या
महिलांना उद्योगासाठी प्रेरणा देण्याकरता बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात; पण बचत गट लोणचे, पापड, कुरडया, फराळाचे पदार्थ, पोळी-भाजी केंद्र अशा व्यवसायात अडकून पडले आहेत. सध्या सेवाक्षेत्र वेगाने वाढते आहे. अशा काळात महिलांनीसुद्धा लोकांच्या गरजा लक्षात घेऊन बदल केले पाहिजे. आंधळेपणाने एखाद्या वाटेवर चालणे योग्य नाही. किमान शिक्षण घेतलेल्या महिलांनी तरी त्याच त्या व्यवसायात अडकून राहू नये. महिलांनी नावीन्याचा शोध घ्यावा. महिला कष्ट करायला तयार असतात; पण नवे मार्ग निवडायची धमक त्या दाखवत नाही. त्यांनी नव्या वाटा शोधल्यास यश हमखास मिळते असा सीता यांचा दावा आहे.
उद्योग-व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना चाकोरीबाहेरचा विचार कृतीत उतरवणा-या सीतातार्इंनी पुरस्कारांची पंचाहत्तरी गाठली आहे. स्थानिक पातळीपासून राज्य-राष्ट्रीय पातळीवरच्या संस्था-संघटनांनी त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. स्पष्टवक्त्या स्वभावाच्या सीतातार्इंची राज्यभरात अनेक कॉलेज, संस्था, मेळावे आणि शिबिरांमधून व्याख्यानं आयोजित केली जातात. प्रसिद्धी मिळूनही आपण खूप काही वेगळं केल्याचा त्यांचा अविर्भाव नसतो. उलट आणखी खूप काही मिळवायचं राहिलंय, असंच त्यांना वाटतं. लांबचा टप्पा गाठायचा आहे ही त्यांची भावना आहे. निरक्षर असूनही सीतातार्इंनी चिकाटीच्या बळावर व्यवसाय उभा करण्याचे शिवधनुष्य पेलले आणि स्वत:चे विश्व निर्माण केले.

हात रिकामे असताना कष्ट करण्यावर त्यांचा विश्वास होता. कष्टांवरची तीच श्रद्धा आज ओंजळ भरल्यानंतरही कायम आहे. एकेकाळी ज्या संस्थेत सालदार म्हणून सीताताई काम करायच्या, त्याच संस्थेत त्या सल्लागार समिती सदस्य आहेत, हीच त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची पावती.