आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
विद्यार्थ्यांनी लिहिलेले साहित्य फुलण्यासाठी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सात वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाने ‘गुलमोहोर’ विशेषांकाच्या माध्यमातून साहित्याचा जागर घातला आहे. आजवर मराठीसह हिंदी, इंग्रजीतील साहित्याला संस्थेच्या ‘विवेकानंद’ अंकाच्या माध्यमातूनही प्रसिद्धी मिळाली आहे. वाङ्मय मंडळ विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरले आहे.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या उस्मानाबादमधील रामकृष्ण महाविद्यालयात 2005 मध्ये वाङ्मय मंडळाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीपासूनच मंडळाने थोर साहित्यिकांच्या हस्ते वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्याची परंपरा जपली आहे. त्यामुळे राज्यातील नामवंत साहित्यिकांचे विचार ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे. तिन्ही भाषांवर काम करणारे मंडळ गुलमोहोर भित्तिपत्रक प्रसिद्ध करीत आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या साहित्याला वाव देण्याचा प्रयत्न असतो. पहिल्या वर्षी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन संत नामदेव अध्यासनाचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, प्राचार्य डॉ. रमेश दापके उपस्थित होते. साहित्य हे समाजनिर्मितीचे माध्यम असून विद्यार्थिदशेतच मुलांमध्ये साहित्य निर्मितीची ओढ निर्माण व्हावी, यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचे तत्कालीन प्राचार्य डॉ.रमेश दापके यांनी या वेळी सांगितले. ही संकल्पना कायम ठेवत विद्यार्थ्यांसाठी साहित्यासोबत चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा, साहित्यिकांच्या मुलाखती, काव्यसंमेलन आदी उपक्रम मंडळाने सुरू ठेवले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची संधी मिळत आहे.
सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये संतसाहित्याचे अभ्यासक आणि सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.यु.म.पठाण यांना निमंत्रित करण्यात आले. त्यांच्या हस्ते मंडळाचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना साहित्याविषयी संबोधित करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश हंबिरे, साहित्यिक भारत सासणे, ललित लेखक श्रीनिवास कुलकर्णी, डॉ. किशोर काळे, भास्कर चंदनशिव, माजी प्राचार्य वेदकुमार वेदालंकार, प्रा.डॉ.राजू कदम, साहित्यिक प्रा.ललिता गादगे (अहमदपूर),उत्तम लोकरे, श.मा.पाटील, राजेंद्र अत्रे, तृप्ती अंधारे, प्रसिद्ध कवी मनोज बोरगावकर, जयराम खेडकर, संजीवनी तडेगावकर आदी साहित्यिकांच्या उपस्थितीत वाङ्मय मंडळाचे कार्यक्रम पार पडले.
दरवर्षी विवेकानंद जयंती, सावित्रीबाई फुले जयंती, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाला ‘गुलमोहोर’ भित्तिपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येते. पुस्तक परीक्षण, चर्चासत्रे, काव्यसंमेलनात विद्यार्थी हिरिरीने सहभाग घेतात. विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव मंडळामार्फत सहलीचे आयोजन करण्यात येऊ लागले आहे. वाङ्मय मंडळाचे विभागप्रमुख प्रा. ए. बी. इंदलकर, प्रा. आर. एस. देशमुख, प्रा. डॉ. एस. एम.देशमुख, प्रा. के. एम. क्षीरसागर, प्रा. सविता पाटील, डॉ. डी. वाय. इंगळे, प्रा.एफ. ए. सिद्दिकी यांच्या पुढाकारातून ‘गुलमोहोर’ बहरला आहे.
साहित्य संमेलन, स्पर्धा घेण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेल्या वाङ्मय मंडळाने एक दिवसापुरते नैमित्तिक कार्यक्रम घेण्यापेक्षा निमंत्रित साहित्यिकांच्या उपस्थितीत दोन-तीन दिवसांचे भव्य साहित्य संमेलन घ्यावे. वादविवाद स्पर्धा बंद झाल्या आहेत. या स्पर्धा पुन्हा सुरू कराव्यात.साहित्य कळण्यासाठी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचा वेळ अपुरा पडतो. मंडळामार्फत ‘गुलमोहोर’ भित्तिपत्रक प्रसिद्ध केले जाते. मात्र गुलमोहोर विशेषांकाच्या माध्यमातून प्रकाशित व्हावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांसह विविध स्तरातून व्यक्त होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.