आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषिक संशोधनाची उदासीनता दूर व्हावी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

42 बोलीभाषांची समृद्ध मराठी, 21 व्या शतकात
बोलीभाषा लुप्त होण्याची भीती :

मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. मात्र, ती दोन हजार वर्षांपूर्वीची असल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. म्हणूनच तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकत नसल्याचा मुद्दा सध्या पुढे आला आहे. वास्तविक पाहता अध्यात्म अन् संत वाङ्मयाने मराठी ही अभिजात असल्याचं कधीच सिद्ध केलं आहे. भाषेबाबत चिकित्सक, संशोधक नजरेने विचार केला तर जुने मानदंड लावणेच अयोग्य आहे. त्याला कारण म्हणजे भाषा ही नेहमी प्रवाही असते.


वाचनसंस्कृतीला बळ मिळावे :
मराठी लोकभाषा असून ती जनमानसाच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणारी आहे. आठव्या शतकात मराठी ही लोकव्यवहाराची भाषा होती. महानुभाव, वारकरी पंथाची भाषा मराठी आहे. दोन्ही पंथांच्या संस्थापकांनी त्या काळापासूनच मराठी भाषेचे जतन करण्यासाठी कृतिशील प्रयत्न केले आहेत. तुकोबांची अभंगगाथा, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू, गाथा सप्तर्षी, रुक्मिणी स्वयंवर हे ग्रंथ मराठीतील अभिजात ग्रंथ आहेत. शासनाने ‘गाव तिथे वाचनालय’ संकल्पना रुजवली आहे, परंतु मनोरंजन वाहिन्यांच्या मायाजालात अडकलेल्या नव्या पिढीला चिंतन, मनन करण्यासाठी वाचन नितांत गरजेचे आहे, याचे भान अजिबात राहिलेले नाही. वाचनसंस्कृतीचा -हास हाच मायमराठीच्या अभिरुचीच्या घसरणीचा पाया असल्याचं जड अंत:करणाने व खेदाने म्हणावे लागते. अभिरुचीसंपन्न वर्ग निर्माण होण्यासाठी पालकांनी आता पाल्यांना बालपणापासूनच वाचनालयापर्यंत पोहोचवले पाहिजे.


बोलीभाषांमुळे मराठी समृद्ध,
अस्सल बोलीभाषेतील कोसला :

अमाप प्रसिद्धी मिळालेले ‘हिंदू’ कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे यांनी सन 1963 मध्ये अस्सल बोली भाषेत ‘कोसला’ ही कादंबरी लिहिली होती. तेव्हा भाषेचा अहंकार असलेल्या काही प्रवृत्तींनी त्यांच्या या लेखनाकडे उपहासात्मक दृष्टीने पाहिले होते. त्यानंतर अनेक प्रकारच्या बोलीभाषांमध्ये साहित्य लेखन झाले. एवढेच नव्हे तर ते तेवढ्याच ताकदीने वाचले गेले. मराठी ही प्रमाण भाषा असली तरी 42 बोलीभाषा या तिच्या रक्तवाहिन्या आहेत. या निकोप रक्तवाहिन्यांनी मराठी समृद्ध केली आहे. म्हणूनच प्रमाणभाषेचं जेवढं आपण कौतुक करतो तेवढंच बोलीभाषेचंही केलं पाहिजे. बोलीभाषांमध्ये परिसासमान शब्दभांडार आहे. मात्र, दुर्दैवाने त्याचे संशोधन पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने 21 व्या शतकात या बोलीभाषा लुप्त होतील की काय? अशी भीती वाटते. बोलीभाषेबद्दलचा अभिमान उराशी बाळगून तिच्या पुनरुत्थानासाठी कृतिशील प्रयत्न झाले पाहिजे.


विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची, सर्वच विद्यापीठांनी
एकत्र येऊन कार्य-संशोधन करून दबावगट निर्माण करावा :

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी शासनाचे सध्या सुरू असलेले प्रयत्न दखलपात्र आहेत. महाराष्‍ट्र शासनाच्या अखत्यारीतील सर्वच विद्यापीठांनी मराठीच्या अभिजाततेसाठी एकत्र येऊन दबावतंत्राचा वापर करण्याचं एक धाडसी पाऊल उचलण्याचा विचार केला पाहिजे. हे करत असताना मात्र, विद्यापीठांनी आपल्याच दिव्याखाली अंधार तर नाही ना? याची पडताळणी आवर्जुन करावी. अगदीचं स्पष्ट सांगायचं झालं तर संस्कारकेंद्र अशी ओळख असलेल्या आपल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश अर्जही इंग्रजीत असतात. खरोखरच जर मराठीचे संवर्धन करायचे असेल तर हे प्रवेश अर्ज मराठीत असले पाहिजेत. त्यानंतर दुय्यमस्थान इंग्रजीला द्यावे. रेल्वेचे आरक्षणाचे अर्ज हे इंग्रजी व हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये असतात. मग विद्यापीठामधील प्रवेश अर्ज हे मराठी व इंग्रजी अशा स्वरूपात देण्याचा विचार का होत नाही? हा एक संशोधनाचा विषय आहे.


मराठी वैभवाचा वारसा सशक्त
अभिजाततेचे महत्त्व लक्षात यावे :

मराठी भाषेची अभिरुची टिकवून ती वाढवण्यासाठी संस्कारप्रदान कार्यक्रमांवर भर दिला पाहिजे. लोककला, लोकसाहित्याचा आदर करून भाषा समृद्ध करणा-या लोककलावंतांची उपेक्षा थांबवण्यासाठी शासनाने ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. मराठी वैभवाचा समृद्ध, सशक्त वारसा आपल्याकडे असताना आपण मृगजळाच्या पाठीशी धावतोय. इंग्रची भाषेचा सर्वत्र उदोउदो सुरू असताना मराठी अभिजाततेचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी मराठी माध्यमांच्या शाळांना प्राधान्य देण्याचा विचार व्हावा. अन्यथा, ‘डोक्यात सोनेरी मुकुट व अंगात फाटके कपडे घालून मराठी भाषा मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे.’ हे वि. वा. शिरवाडकरांचे विधान वर्षानुवर्षे आठवल्याशिवाय राहणार नाही.
० मुलाखत : आनंदा पाटील, भुसावळ