आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुनियादारी...च्या तीस वर्षांत 11 आवृत्त्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुहास शिरवळकर यांची ‘दुनियादारी’ कादंबरी दिलीपराज प्रकाशनातर्फे 1982 मध्ये प्रकाशित झाली. पहिली आवृत्ती दीड वर्षात हातोहात संपली. महाविद्यालयीन वातावरणाची पार्श्वभूमी असलेली ही कादंबरी तेव्हापासून युवावर्गात चर्चेचा विषय बनली. जणू काही आपण या कथानकातील एक आहोत, असं कादंबरी वाचताना प्रत्येकाला वाटायचं. दोन वर्षांनी 1984 मध्ये दुसरी आवृत्ती निघाली, पण ती संपायला तब्बल 10 वर्षे लागली. हा कालखंड उलटताच ‘दुनियादारी’ला लोकप्रियतेची आवर्तने अनुभवायला मिळाली. आता ‘दुनियादारी’ या चित्रपटामुळे ही कादंबरी पुन्हा चर्चेत आली आहे.


चित्रपटामुळे महिन्यात चार-पाच हजार
प्रतींची विक्री शिवाय आगावू नोंदणी :

मागील तीस वर्षांत ‘दुनियादारी’च्या एकूण अकरा आवृत्त्या निघाल्या. अलीकडेच या कांदबरीवर निघालेल्या चित्रपटामुळे गेल्या महिनाभरात चार-पाच हजार प्रती विकल्या गेल्या. नगरसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिनाभरात शंभर प्रती संपल्या. पुस्तक शिल्लक नाही, असं वाचकांना सांगितल्यावर आमची मागणी नोंदवून घ्या, असं वाचक म्हणतात हा अनुभव सुखद असल्याचं नगरच्या ‘उदय एजन्सीज’चे संचालक वाल्मीक कुलकर्णी म्हणाले. महाराष्ट्रात सगळीकडेच हे पुस्तक टॉप टेनमध्ये आहे.


नगरला सु. शिं. च्या महाविद्यालयीन
जीवनाची सुरुवात :

‘दुनियादारी’चे लेखक सुहास शिरवळकर यांचे थोरले भाऊ उत्तम शिरवळकर हे नगरला प्राध्यापक होते. ते शिकवत असलेल्या प्रेमराज सारडा महाविद्यालयातच सुहास शिरवळकरांनी आपल्या कॉलेज जीवनाचा श्रीगणेशा केला, पण नगरला ते फार काळ रमले नाहीत. पुण्यात गेल्यानंतर तिथल्या कॉलेजविश्वात त्यांच्या प्रतिभेला ख-या अर्थाने घुमारे फुटले. पुण्यातील फर्ग्युसन, एसपी ही महाविद्यालये म्हणजे तेव्हाची सांस्कृतिक केंद्रेच होती. ‘एसपीचा कट्टा’ तरुणाईची क्रेझ होती. ‘दुनियादारी’ला या कट्ट्याची पार्श्वभूमी लाभली आहे. चित्रपट आता आला, पण त्याआधी या कादंबरीवर दूरचित्रवाणी मालिका निघाली होती. सतीश राजवाडे यांनी तिचं दिग्दर्शन केलं होतं.


मूळ कादंबरीशी द्रोह करून मालिकेसाठीच्या लेखनात बदलास सु.शिं.चा नकार :
सुरुवातीला या मालिकेच्या लेखनाची जबाबदारी सुहास शिरवळकरांवरच सोपवण्यात आली होती. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली, पण नंतर टीआरपी वाढवण्यासाठी तिच्या कथानकात काही बदल करण्यास शिरवळकरांना सांगण्यात आलं. त्यांनी त्याला नकार दिला. मूळ कादंबरीशी द्रोह मी करणार नाही, असं शिरवळकरांनी स्पष्ट सांगितलं, अशी आठवण त्यांची पत्नी सुगंधा शिरवळकर यांनी सांगितली. पुढे शिरवळकरांनी मालिकेच्या लेखनातून अंग काढून घेतलं. 32 भाग प्रदर्शित झाल्यानंतर ही मालिका बंद पडली. आता चित्रपटातून ‘दुनियादारी’ तरुणाईला भुरळ घालते आहे. या चित्रपटाच्या बाबतीतही काहीसे मालिकेसारखेच घडले. मध्यंतरापर्यंत कादंबरीनुसार चित्रपट चालतो, पण नंतर त्यात बदल करण्यात आले आहेत. मात्र, आता त्याला हरकत घ्यायला शिरवळकर नाहीत. चित्रपटाने गर्दी खेचली, तरी ‘दुनियादारी’ कादंबरी मुळात वाचण्याची मजा काही औरच आहे. पिढ्या बदलल्या, तरी कादंबरीतील ‘कट्टा’ तारुण्य टिकवून आहे...