आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशिं\'ची झपाटलेली दुनिया!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझे वडील काय करतात? याचं उत्तर मला कधीच द्यावं लागलं नाही. ‘सम्राट सुहास शिरवळकर’मधील सुहास शिरवळकर उर्फ (सुशि) हे सुप्रसिद्ध मराठी लेखक आहेत, हे माहीत नसणारी साहित्यप्रेमी व्यक्ती महाराष्ट्रात नवखी असेल.
बाबा दिसायला एकदम ‘चॉकलेट हिरो’ होते. मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने इतका प्रभावित होतो की, हुबेहूब त्यांची नक्कल करत असे. केसांचा भांग, त्यांच्या लकबी, प्रभावी राहणी, स्वभाव, त्यांची मातृभाषेतील स्वाक्षरी... अशा अनेक गोष्टी मी माझ्या युवा अवस्थेपर्यंत आपोआप आणि काही मुद्दाम अंगीकारल्या होत्या.

बाबांनी मला साहित्य-कलेची गोडी लावली, जुनी गाणी ऐकण्याचा छंद मला त्यांच्यामुळेच लागला. साहित्य-कलेवाचून जीवन किती रुक्ष आणि निरस बनेल, असे आपण म्हणतो. पण ते कळण्यासाठी पंचेंद्रियांवर, मनावर प्रथम संस्कार व्हावे लागतात, त्याचे श्रेय निव्वळ माझ्या वडलांचे आहे. जसा मी वयाने मोठा होत गेलो, तशी बाबांशी माझी दोस्तीच झाली. म्हणजे, तशी त्यांनी ती होऊ दिली. कोणत्याही प्रकारचे दडपण नसलेले, मुक्त वातावरण पहिल्यापासून आमच्या घरी होते. बाबा स्वातंत्र्यप्रिय, विचाराने आधुनिक होते. यामुळे माझे आणि त्यांचे नाते अतिशय घट्ट आणि मित्रत्वाचे बनले. माझे सांस्कृतिक परिप्रेक्ष्य विस्तारले, मला एका वैशिष्ट्यपूर्ण भावविश्वाचे आकलन झाले...

मी जिथे जाईन तिथे माझी ओळख, सुप्रसिद्ध लेखकाचा मुलगा म्हणून आधीच निर्माण झालेली असे. झालेली ओळख स्वीकारून, माझी स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करीत असे. कॉलेजच्या घडत्या वयात माझी वेगळी ओळख निर्माण व्हावी, असे प्रयत्न मी केले. पण ते अर्थातच फोल ठरले... मग ते नवीन मित्र जोडणे असो, नाटक करणे असो...इत्यादी. पुढे माझ्या दृष्टिकोनात बदल होत गेला. वडलांवरून मला ओळखणे, त्यांचाशी माझी तुलना करणे, अपेक्षा करणे, हे अपरिहार्य आहे, हे मला कळून चुकले. उलटपक्षी, लोकांनी माझ्यावर सहज विश्वास ठेवणे, आदराने, प्रेमाने वागणे, संभाव्य लेखक म्हणून अपेक्षा करणे, यामुळे मला जबाबदारीचे वेगळेच भान येत गेले. ते आज मला महत्त्वाचे वाटते.

मला आठवते तेव्हापासून बाबा सतत माणसांच्या गोतावळ्यात असत. त्यांचा स्वभाव दिलखुलास आणि मोकळा होता. त्यांचा वाचकवर्ग प्रचंड होता, आजही आहे. आमच्या घरी रोजच कोणी ना कोणीतरी नवीन व्यक्ती बाबांना भेटण्यासाठी येत असत. गप्पा, चर्चा झडत. त्यात वाचकांपासून प्रकाशन व्यवसाय, नव-लेखक, सिनेसृष्टीतील व्यक्तींपर्यंत कोणीही असे. वाचकांचा पत्रव्यवहार तर एक स्वतंत्र कारभारच होता. त्यांना मिळालेली लोकप्रियता, प्रसिद्धी मी लहानपणापासूनच पाहिली असल्याने, पुढे मला तिचे फारसे अप्रूप राहिले नाही. मी माझ्या ग्रेट बाबांची वाढत जाणारी लोकप्रियता पत्ररूपाने, प्रत्यक्ष, जाहीर कार्यक्रमातून बघतच मोठा झालो. एखाद्या सुपरस्टारभोवती स्वाक्षरीसाठी गराडा पडतो, तसाच एकेकाळी बाबांच्या भोवती पडे. अतिशयोक्ती नाही!

शिरवळकरांनी प्रसिद्धीपोटी, हलकल्लोळ व्हावा म्हणून, पारितोषिकासाठी, ‘साडेतीन टक्क्यांनी’ पाठ थोपटावी म्हणून, कधीही लिखाण केले नाही. उपजीविकेचे साधन हे लेखन असल्यामुळे त्यांनी त्यात सातत्य राखले. पण तरीही विषयवैविध्य ते राखू शकले. 1972ला सुरू केलेले रहस्यकथा लेखन, 1974 पासून पूर्णवेळाचे काम म्हणून त्यांनी स्वीकारले. 1979मध्ये रहस्यकथा लेखन थांबवून त्यांनी सामजिक कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली. 1982मध्ये प्रकाशित झालेल्या ‘दुनियादारी’ने कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख सर्वांनाच मान्य करण्यास भाग पाडले. मात्र ‘दुनियादारी’ ही त्यांची संपूर्ण ओळख ठरू शकत नाही.
खरं तर सुहास शिरवळकरांच्या लेखनाची समीक्षा झालीच नाही. याबाबत वाचकप्रिय साहित्यप्रकाराला सरधोपटपणे सवंगतेचा शिक्का मारण्याविषयी ‘सुशिं’नी नेहमीच प्रश्न उभे केले.

मराठी साहित्य विश्वाची दृष्टी आणि कक्षा आणखी मनमोकळी, सर्वसमावेशक, समृद्ध बनण्यासाठी तिच्या मर्यादांचे उल्लंघन होणे आज गरजेचे आहे, असे मला वाटते. ‘सुशि’ स्वत:च्या लेखनाच्या संदर्भात जाहीर कार्यक्रमांमधून आपली भूमिका स्पष्टपणे मांडायचे. वाचकांव्यतिरिक्त इतर साहित्यविश्वाने या प्रकारच्या लेखनाकडे डोळेझाक न करता आपला दृष्टिकोन बदलावा, असा त्यांचा प्रयत्न होता. आपल्या अढळपदावरून त्यांनी ही मांडणी सातत्याने केली. त्यांच्या मुलाखती, वाचकांशी गप्पा, अशा जाहीर कार्यक्रमांव्यतिरिक्त अगदी नवलेखकांसाठी शिबिरे घेऊनही त्यांनी हा साहित्य प्रकार आणि त्याच्या निर्मितीतले बारकावे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी असे लिखाण करणार्‍यांचा, छापणार्‍यांचा, मानणार्‍यांचा गट मात्र स्थापन केला नाही. कुठल्याही राजकीय प्रवाहाचा ते भाग बनले नाहीत. प्रसिद्धीमाध्यमे ‘मॅनेज’ केली नाहीत. एखाद्या मनस्वी कलाकाराप्रमाणेच ते लिहीत राहिले. रसिक वाचकांनी त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले!

‘‘माझ्या नावामागे सम्राटपद लागावे म्हणून माझ्या मुलाचं नाव मी ‘सम्राट’ ठेवलं’’, असं बाबा गमतीने म्हणत असत. पण वाचकांनी त्यांना खरोखरच हे पद बहाल केलं. इतरांनी ते ‘रेकग्नाईज’ करावं, अशी बाबांची इच्छा नव्हती. कारण इतरांवर ते अवलंबून नव्हते! सुशि हा वाचकप्रियतेचा ‘आयकॉन’ बनला आहे. इतकी प्रसिद्धी, ग्लॅमर आणि वाचकांचे प्रेम लाभलेला मराठी लेखक सुशिंशिवाय आजही माझ्या ऐकिवात नाही.!

समग्र ‘सुशि’
* सुहास शिरवळकर (सुशि) 15 नोव्हेंबर 1948 ते 11 जुलै 2003. पुणे
* सुहास शिरवळकरांनी पहिली नोकरी एम.एस.सी.बी. पुणे येथे एक वर्षासाठी केली, तर दुसरी टिटवाळा येथील शाळेत शिक्षक म्हणून एक वर्षासाठी केली. त्यानंतर निरनिराळ्या शाळांतून ‘लिव्ह-व्हेकन्सी’वर काम केले. 1974पासून मात्र पूर्ण वेळ लेखन हाच व्यवसाय केला.
* शिरवळकर उत्तम गायक व पेटी-तबला वादक होते. काही काळ ऑर्केस्ट्रामध्ये त्यांनी आपली कला आजमावून पाहिली. तसेच व्यावसायिक नाटकांतून अभिनयदेखील केला.
* ‘दुनियादारी’ ही कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली ती त्यांच्या ‘रहस्यकथा लेखक’ या मूळ ओळखीसंदर्भात. अन्यथा आवृत्त्यांच्या भाषेत बोलायचे झाल्यास, दास्तान, बंदिस्त, सॉरी सर, मुक्ती, कोवळीक, वास्तविक ... इत्यादी धरून पंधरा कादंबर्‍यांच्या दुनियादारी इतक्याच म्हणजे दहा आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
* ‘दुनियादारी’ या कॉलेज विश्वाची पार्श्वभूमी लाभलेल्या कादंबरीने लक्ष वेधल्याने ‘तरुणांचे लेखक’ असा समज झाला असला, तरीही सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष वाचकांचा समावेश त्यांच्या फॅन्समध्ये होतो, असे उपलब्ध पत्रे, आजही कुटुंबीयांशी होणारे संपर्क, निघणार्‍या आवृत्त्या आणि सार्वजनिक वाचनालयातील अनुभवातून दिसते.
* शिरवळकरांची ग्रंथसंपदा : मूळ 250 रहस्यकथांचे 66 भागांत संकलन. 72 सामाजिक कादंबर्‍या. 9 कथासंग्रह, 1 किविता संग्रह, वृत्तपत्र सदर-लेखनाचे 4 संग्रह, बालवाङ्मय, एकांकिका, नभोनाट्य.
* प्रसिद्ध चित्रपट : ‘देवकी’ - महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कथा पुरस्कारासह इतर 27 पुरस्कार. ‘दुनियादारी’ सध्या सर्वत्र प्रदर्शित.
* टीव्ही मालिका : कथा, पटकथा, संवाद - कल्पांत, कोवळीक, दुनियादारी.