आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दुनियादारी\'ची बीजे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘दुनियादारी’ सुहास शिरवळकरांनी 1980मध्ये लिहायला घेतली, त्यामागे ‘चला, आता कॉलेज- विश्वावर एक कादंबरी लिहून टाकू!’ इतकी उथळ प्रेरणा निश्चितच नव्हती... ‘दुनियादारी’साठी त्यांनी खास असा काही अभ्यास केलाच नाही का? तर केला, नक्कीच केला... ‘दुनियादारी’ लिहिण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा महाविद्यालयीन घटनांच्या विश्वात त्या वयाचं होऊन वावरण्याची संधी घ्यावी लागली... पुण्यातील ‘एस. पी. कॉलेज’ आणि त्या समोरील ‘उदय विहार’ या हॉटेलात काही निमित्ताने त्यांचे जाणे झाले आणि तिथे त्यांना एक एक पात्र भेटत गेली. इतकी, की ‘सुशि’ त्या ग्रुपचे एक सदस्यच बनले. स्वत:च्या कॉलेज जीवनातील अनुभव आणि या ‘कट्टा गँग’च्या रूपाने नव्याने झालेल्या भेटी यातूनच पुढे ‘दुनियादारी’ साकारली.
कादंबरीतील श्रेयस, डी. एस. पी., अशक्या, एम. के. इत्यादी पात्रे खरी असली तरीही ती सर्व एकाच ठिकाणी भेटली असे नाही किंवा त्या पात्रांचे हे ‘चरित्र’ नाही. ही शिरवळकरांच्या भाषेत ‘काल्पनिक सत्यकथा’ आहे. ती प्रातिनिधिक आहे, परंतु त्याच वेळी सार्वत्रिक आहे. यासाठी ‘कट्टा गँग’च्या सदस्यांच्या वारंवार गाठीभेटी झाल्या; कधी ग्रुपने तर कधी ‘पर्सनल’. या पात्रांतील एम. के. आणि दिग्या आज नाहीत. साईनाथ, अशक्या ही पात्रे अस्तित्वात आहेत. श्रेयस हे लेखकाचे स्वनिर्मित पात्र आहे. ‘दुनियादारी’चे सिंहावलोकन करताना करताना सुशि ‘फलश्रुती’मध्ये लिहितात, ‘‘दुनियादारी’त तारुण्याची मूलतत्त्वंच पकडली गेली आहेत. म्हणूनच 1980च्या आधीच्या पिढ्यांपासून आजच्या विद्यार्थी पिढीपर्यंत सर्वांना ती आपली ‘कथा’ वाटते. कुठे ना कुठे त्यात आपला चेहरा पाहायला मिळतो. बदलते रीतीरिवाज अन् बदलत्या फॅशन्स ‘दुनियादारी’ आउटडेटेड ठरवत नाहीत! मला तर वाटायला लागलंय - ‘दुनियादारी’ ही एकच कादंबरी मी लिहिली नसती, तर माझ्या अनेक कादंबर्‍या तिच्या यशाने झाकोळल्या नसत्या! आणि हेही तितकच खरं, की मी फक्त एक ‘दुनियादारी’च लिहून पूर्ण थांबलो असतो, तरीही आजही ‘वाचकप्रिय’च राहिलो असतो.’

किस्से, प्रसंग.
1. माझ्या नकळत्या वयात आमच्या जुन्या वाड्यातील चौथ्या मजल्याच्या खोलीपुढे (जी एकच आणि एकाकी होती आणि बाबा लिखाणासाठी वापरायचे) एक लांबलचक पत्र्याचे छप्पर होते. खेळताखेळता मी आणि माझ्यापेक्षा मोठी असलेली वाड्यातील मैत्रीण त्या पत्र्याच्या टोकाशी जाऊन बसलो होतो म्हणे, पाय खाली सोडून आरामात गप्पा मारत. हे बाबांनी बघितलं आणी मोठ्या शिताफीनं पत्र्याची कमीतकमी कुरकुर होईल असे चालत येऊन पहिले आम्हा दोघांना मागून हाताची मिठी घालून उचललं. हा प्रसंग मला स्मरत नाही, एवढा मी लहान होतो. पण तो आई-बाबांकडून मी अनेकदा ऐकला आहे. तो सांगताना बाबांनी प्रसंगावधान राखलं यापेक्षा ते तसं करू शकले नसते तर... यावर त्यांचा भर जास्त असे.
2. शाळा सुटल्यावर मी घरी न येता फुलपाखरं पकडण्यासाठी मित्राबरोबर नदीकाठी फिरत बसलो. वेळ कसा गेला समजलं नाही. तेव्हा भर तापात बाबांनी मला शोधलेलं आणि त्यांचा चेहरा मला स्पष्ट आठवतो.
3. माझ्या कॉलेज जीवनात मी ज्या एकांकिका स्पर्धा केल्या, त्याच्या तालमींना उपस्थित राहून वेळोवेळी मार्गदर्शन करताना तरीही सीमारेषा ओळखून कलाकारांच्या आड न येणारे बाबा मला आठवतात.
4. शिक्षण का घ्यायचं? असा ‘साक्षात्कार’ अचानक झाल्याने परीक्षा न देता मी घरी बसलो. तेव्हा माझी आणि त्यांची ‘पार्टी’ झाल्याचे मला स्मरते. तो कठीण काळ पार करून जेव्हा मी एम. ए. प्रथम वर्गात उत्तीर्ण झालो, तेव्हा सर्वप्रथम मी घरी फोन केला. तो बाबांनीच उचलला. तेव्हा त्यांचा आनंद आणि दाटून आलेला स्वर मी कसा विसरेन! त्या काळात त्यांनी मला कसे ‘सांभाळले’!
5. माझ्या मित्रांसमवेत एक मैफल रंगली होती, ज्यात गाण्या-बजावण्याचा कार्यक्रम रात्रभर घरी चालू होता. त्यात बाबा स्वर आणि तालाची साथ करत होते आणि त्यांनी तलत, मुकेश, रफीची गाणी ‘लाजवाब’ सादर करून सगळ्यांनाच चाट पाडलं होतं.
6. महाराष्ट्रभर आपल्या आवडत्या ‘बॉबी राजदूत’वरून, वाचक-गप्पा कार्यक्रमांसाठी भटकंती करणे, लोकांना भेटणे, खवय्येगिरी करणे हा त्यांचा आवडता छंद होता. मात्र घरी पोहोचताच पत्नीच्या हातचं वरण-भाताचं जेवण जेवल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे.
7. पुण्यातील ‘साहित्य संमेलनात’ सुशि जेव्हा थाटात स्टॉलवरून फिरत होते, तेव्हा त्यांच्या जोडीला त्यांचे एक स्रेही, ज्येष्ठ संपादक, लेखकदेखील होते. सुशिंभोवती वाचकांचा गराडा पडलेला पाहून त्यांनी, ‘परत कधीही तुझ्याबरोबर एका ठिकाणी एकत्र यायचं नाही, असं ठरवून टाकलं आहे.’ असे सांगितले. कारण विचारताच ते तातडीने म्हणाले, ‘अरे माझ्याकडे कोणी बघायलाच तयार नाही.’ मात्र हे प्रेमापोटी होते. स्पर्धा म्हणून नाही.
8. असंख्य वाचक आजही मुंबईत ‘अमर मंझिल’ आणि बॅ. अमर विश्वासचा शोध घेतात. ‘जाई’ कादंबरी वाचून भावूक झालेल्या एका स्त्री वाचकानं सुशिंना पत्र पाठवून कळवलं होतं की, जाई या पात्राची जी गत त्यांनी केली आहे त्यामुळे देव त्यांना कधीही क्षमा करणार नाही. ‘दास्तान’चा शेवट वाचकांना इतका लागला की, वाचकांची झोप उडवून, मुख्य पात्राचे पुढे काय झाले हे न सांगता अन्याय केल्याची अनेक पत्र आली. प्रत्येक कादंबरीत, पात्र रूपात ‘सुशि’ कोण, प्रसंग सर्व खरे आहेत का वगैरे विचारणा तर नेहमीच होते. ‘दुनियादारी’ वाचल्यानंतर सुन्न होऊन परगावहून चार चाकीने एस. पी.च्या कट्ट्याला रातोरात भेट देऊन, तिथे बसून गेलेली मंडळीदेखील आहेत. ‘थोडक्यात असं’, ‘कळप’ सारख्या कादंबर्‍यांमध्ये प्रकाशन व्यवसायाचे संदर्भ असल्याने, साहित्य विश्वाचे कान टवकारले गेले. ‘हृदयस्पर्श’, ‘मधुचंद्र’, ‘क्षणक्षण आयुष्य’, ‘निदान’, ‘तुकडा तुकडा चंद्र’, ‘जाता-येता’... असे कादंबर्‍यांना जोडलेल्या किश्श्यांचे एक स्वतंत्र पुस्तक बनू शकेल!
9. सुशिंच्या प्रत्येक कादंबरीच्या आवृत्तीचा संग्रह करणारा आणि संदर्भ कोश असलेला वाचक अजिंक्य विश्वास पुण्यात आहे. सुशिंच्या पत्रांचे वर्षभर बसून वर्गीकरण करणारे राजेंद्र पटवर्धन आहेत; तर अमित मेढेकर, कुलस्य जोशी, सचिन, मनोज जोशी, मिलिंद औटी... इत्यादी मंडळी सोशल नेटवर्कवर सक्रिय आहेत.
10. ‘दुनियादारी’सह इतर कादंबर्‍यांची पारायणं करणारी मंडळी आहेत. ‘दुनियादारी’ एकदा- दोनदा नाही पाच- पन्नास वेळा वाचलेली मंडळीही आहेत. एकच प्रत हातात लागली म्हणून ग्रुपने कादंबरीची पाने सुट्टी करून एक एक पान क्रमाने फिरवत ‘दुनियादारी’ वाचल्याचीही उदाहरणे आहेत.
11. सुशिंच्या कादंबर्‍या वाचून आदर्श वकील, इन्स्पेक्टर, डॉक्टर बनल्याची उदाहरणे आहेत. ‘सुशि’ या कॉमन प्रेमावर ग्रुप जमले, लग्न ठरली, आयुष्य बदलली आहेत. नवीन लेखक निर्माण झाले आहेत. सर्वात मुख्य म्हणजे, वाचन संस्कृती टिकून ठेवायला सुशिंच्या साहित्याची परिणामकारी मदत झाली आहे.
12. आज मराठी माणूस जगभर कामधंद्यानिमित पोहोचला आहे. तेथेही वर्षभराचा खाऊ (पुस्तके) दर भेटीत विकत घेऊन जाणारे सुशि फॅन आहेत. जागतिकीकरणाआधी जेरुसलेममधून भस्तेकर बेंजामिन नावाचे एक मराठी ज्यू (आमच्यासाठी भास्कर काका) पत्रव्यवहार करत किंवा पुण्यात येऊन भेट देऊन जात.
13. आपल्या मित्राच्या छातीत दुखतेय हे कळल्यावर त्याला ताबडतोब उपचारासाठी घेऊन जाणारे बाबा... त्यांच्या स्वत:च्या बाबतीत मात्र सर्वांनाच चकवून गेले. 11 जुलै 2003 : मी नेहमीप्रमाणे ‘अर्थशास्त्राचा’ वर्ग घेऊन घरी पोहोचलो. बाबा मुंबईत होते. आई आणि मी नित्याच्या टीव्ही मालिका सुरू करून जेवायला बसलो. तेवढ्यात फोन खणाणला. आमच्याकडे फोन येणं ही काही विशेष बाब नव्हती, बाबांकडे तेव्हां मोबाइल नसल्याने सर्व घरच्या फोनवरच चाले. मी फोन उचलताच, मुंबईतील नातेवाइकाचा आवाज कानी पडला, ‘‘सम्राट नीट ऐक, बाबांना सकाळी कसंतरीच होत होतं म्हणून मी त्यांना घेऊन जवळच्या इस्पितळात गेलो. डॉक्टर पोहोचायच्या आतच बाबा कोसळले आणि परत उठलेच नाहीत...’’. फोन संपला आणि मी मागे वळून आईला ते कसं सांगितलं, मुंबईत संध्याकाळी उशिरापर्यंत काय घडलं, पोस्टमार्टम केलेली बॉडी (?) कशी आणली आणि काय काय... त्यानंतरचं आयुष्य... मी नाही शेअर करत हे डिटेल्स. सॉरी!
samrat.shirvalkar@gmail.com