आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तव्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आज दिवस फारच वाईट. दिनकर जोशींच्या घरातून भेसूर रडण्याचे आवाज येत होते. बाहेर त्यांच्या मुलाच्या अंत्यविधीची तयारी चालू होती. गुरुजींचे मंत्रपठण, न्हाव्याचे मुंडन करण्याचं कामही सुरू होतं. सगळीकडे दु:खाचं वातावरण. प्रत्येक जण सुन्न नजरेनं भकास चेह-यानं एकमेकांकडे पाहत होता. आज गल्लीत एकाकडेही चूल पेटली नव्हती.

रेवती तर शुद्धीतच नव्हती. तिचा जन्माचा साथीदार असा एकाएकी अर्ध्यावर डाव सोडून जाईल असं तिला वाटलं नव्हतं. आणि तसं घडूनही मन मानायला तयार नव्हतं. तिच्या दोन बछड्या, जाई आणि जुई, भेदरलेल्या नजरेनं सारं पाहत होत्या. बाबांना असं बांधून का ठेवलंय, हे सर्व काय चाललंय, असे प्रश्न त्या विचारत तेव्हा सर्वांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत. रेवतीचं हंबरडा फोडून रडणं, आकाश फाटेल की काय असं वाटे; पण नियतीपुढे कुणाचं चालत नाही हेच खरं. आता सर्व तयारी होत आली. शेवटच्या दर्शनासाठी घरातील स्त्रियांना बोलावण्यात आलं. रेवतीला धरूनच बाहेर आणलं. बांगड्या, मंगळसूत्र कुणी काढून मंगेशजवळ ठेवायला सांगत होतं. सारी प्रतिष्ठित मंडळी जमली होती. हे सर्व सुरू असताना दूर कोप-या त उभी राहिलेली स्त्री एकदम घोळक्यात शिरली आणि भरल्या आवाजाने म्हणाली, ‘मुझे उन्हे आखरी बार देखना है. एक नजर उन्हे देख लंू. अच्छे से रुक्सत करालू. क्या मुझे इजाजत है?’ कुणाला काही समजलं नाही. एक तर तिला कुणी ओळखत नव्हतं. रेवतीनं तिला पाहिलं. पांढराशुभ्र सलवार कमीज, डोकं झाकलेली पांढरीच ओढणी, गोरीपान, धारदार नाक, छोटी हनुवटी, भुंडे हात. दु:ख आणि अश्रूंनी डबडबलेले तिचे डोळे एवढं तिनं पाहिलं. सर्वांनी दिनकर जोश्यांकडे प्रश्नार्थक नजरेन पाहिलं. त्यांनाही समजेना काय करावं. तेवढ्यात शेजारचे अप्पा गरजले, ‘अरे, बाजूला व्हा. घेऊ देत त्या बार्इंना अंत्यदर्शन.’ तिनं कृतार्थ नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं. ती मंगेशजवळ आली. क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि दूर झाली.

आता वातावरण बदललं. प्रत्येक जण तिच्याकडे कुतूहलानं पाहू लागला. कुजबूज सुरू झाली, तर्कवितर्क, अनेक प्रश्नचिन्हं. कोण ही? पण ती वेळ बोलण्यास योग्य नव्हती. रेवतीच्या सासूबाई सुधाकाकू सावध झाल्या. मुलगा जाण्याचं दु:ख अनावर होतं. समोर दोन नाती आणि तरुण सुनेचं दु:ख डोळ्यापुढे होतं. त्यांनी स्वत:ला सावरलं. प्रत्येक जण विचारात ग्रासलं होतं. कारण मंगेश अतिशय सभ्य, मनमिळाऊ, कर्तबगार, सुखी संसारी जीव. आज्ञाधारक मुलगा, प्रेमळ पती आणि पिता, एका मोठ्या नामांकित कंपनीत मोठ्या पगारावर मार्केटिंग ऑ फिसर होता. आईवडिलांचा एकुलता एक, सुसंस्कारित मुलगा, मग ही बाई कोण? तिचा आणि मंगेशचा... असे नाना प्रश्न. रेवतीही अचंबित झाली; पण तिला काही सुचत नव्हतं. मंगेश आता नाही, हे सत्य कसं पचवायचं? इतकी वर्षं घरातच उत्तम गृहिणीपद सांभाळलं.

सासू-सास-यांची सेवा, त्यांची पूजा, सोवळं-ओवळं, देवधर्म, येणार-जाणार, सणवार, मुलींची देखभाल, अभ्यास आणि तिचं सर्वस्व मंगेश यात दहा वर्षं कशी गेली हे कळलंच नाही. तिला कशाचीही कमी नव्हती. आणि अशातच हे आक्रित झालं. मंगेशला नेण्यात आलं. मागे स्त्रियाच उरल्या. सुधाकाकूंनी त्या मुस्लिम स्त्रीला डोळ्यांनीच घरात बोलवलं. तिला पाणी दिलं, तोवर ती शांत झाल्यासारखी वाटली. तिला सुधाकाकूंनी विचारलं, ‘कोण आहेस तू? आणि माझ्या मंगेशला कशी ओळखतेस?’ आता ती म्हणाली, ‘माँजी, मेरा नाम रझिया है. मुझे मालूम है आप के दिल में हजारो सवाल है. लेकिन इतनाही बताती हूँ, आप का लडका बहोत अच्छा इन्सान था. उन्हों ने मुझे बडी मुसिबत से बचाया था. मुझे नया जीवन दिया. जीने का हौसला दिया. लेकिन अच्छे लोगों को ही खुदा अपने पास बुलाता है. मैं तो अकेली थी और रहूँगी. बस आखरी तमन्ना थी उन्हे देखने की. मेरा काम हुआ. मुझे और कुछ नहीं चाहिए.’ तेवढ्यात सुधाकाकूंना कुणाची तरी चाहूल लागली. त्यांनी रझियाला जाण्याचा इशारा केला आणि ती निघूनही गेली.

यथावकाश मंगेशचे अंत्यविधी पार पडले. पाहुणेमंडळी गेली. घर रिकामं झालं. रेवती सावरली. तिच्या दोन चिमण्या, अण्णा आणि आर्इंसाठी. तिच्यावर त्यांची जबाबदारी होती. हळूहळू घर सावरत होतं. मंगशच्या कंपनीकडून फंडाची रक्कम, विम्याचे पैसे मिळाले.

तशी आर्थिक विवंचना फार नव्हती. राहतं घर, अण्णांची पेन्शनही होतीच आणि गरज पडली तर रेवतीनं नोकरी केली तर चालणार होतं; पण ते तिच्यावर अवलंबून होतं. आता सव्वा महिना पूर्ण झाला होता. रेवतीही माहेरी जाऊन आली. आज रेवतीनं घर आवरायला घेतलं. मंगेशचे उंची कपडे, घड्याळ, रुमाल, अनेक बारीकसारीक गोष्टींवर त्याचा प्रभाव अजूनही होता. पण या सा-या गोष्टी अण्णा, आई आणि तिला अस्वस्थ करत. त्याची आठवण सतावत म्हणून तिने सर्व खेड्यावर पाठवायचं ठरवलं. सर्व सामान एका बॅगमध्ये भरलं. फोटोचा अल्बम ठेवलेल्या ड्रॉवरमध्ये तेवढ्यात तिला एक कागद दिसला. उघडून बघितलं तर मंगेशचं अक्षर. वाचायला सुरुवात केली...

(पूर्वार्ध)