आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लताचं गाणंच नसतं तर?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळ सरतो. सरताना आठवणी, स्मृती भूतकाळाच्या कप्प्यात जमा करत जातो. पण भारतरत्न लता मंगेशकरांच्या गाण्यांबाबतीत तो आभाळाएवढी सहृदयता दाखवतो. अमरत्वाचं वरदान जणू त्यानं दिलेलं असतं.  म्हणूनच १९४२ ते २०१७ इतक्या मोठ्या, जवळपास सहा ते सात पिढ्यांनी व्यापलेल्या काळात त्यांचं गाणं रोज नवा आनंद देत राहतं. कधी लडिवाळ, कधी करूण, कधी धीरगंभीर, कधी प्रेममयी, कधी व्याकूळ तर कधी खट्याळ अशा कितीतरी रूपांत ते रसिकांना भेटत राहतं. एक क्षण असा येतो, मन स्वत:लाच भिववणारा प्रश्न करतं- या जगात लता मंगेशकरांचं गाणंच नसतं तर? उत्तर येतं - अवघं जगणंच निरर्थक ठरलं असतं...अशा या अलौकिकत्वाचा परिसस्पर्श लाभलेल्या, जगण्याला नवा अर्थ देणाऱ्या लतादीदींच्या गायन कारकीर्दीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा "रसिक' विशेषांक...


लता मंगेशकर नसती तर...
खरंच. मी असा विचार, यापूर्वी कधी केला नव्हता. कशाला उगाच अभद्र विचार करायचे?
पण खरंच, महात्मा गांधी नसते तर...
डॉन ब्रॅडमन नसते तर...
शिवाजी महाराज नसते तर...
मधुबाला नसती तर... वगैरे विचार करून आपण काय गमावलं असतं, हे पहाता येईल.


महात्मा गांधी नसते, तर स्वराज्य मिळालं नसतं,असं नाही. पण अहिंसा आणि सत्याग्रह ही धारदार  शस्त्र बनू शकतात, हे जाणवलं नसतं.
डॉन ब्रॅडमन नसते, तर फलंदाजाची कसोटी सरासरी शंभराच्या उंबरठ्यापर्यंत पोहचते हे कधी आपल्याला कळलंच नसतं.
शिवाजी महाराज नसते, तर आदर्श राजाची व्याख्या कशी करता आली असती?
आणि मधुबाला नसती, तर विश्वामित्रांना स्वर्गाच्या राज्यापासून दूर ठेवणारी स्त्री किती सुंदर असू शकते, याची कल्पना आपण करू शकलो नसतो.
आणि लता नसती तर... (हा एकेरी उच्चार केवळ प्रेमापोटी आहे. आईला कुणी ‘अहो’ म्हणतं का?) हेमंतकुमारने याचं उत्तर खूप चांगलं दिलंय. तो एकदा म्हणाला, ‘देवाचे आभार की,ज्या काळात लता मंगेशकर होती, त्या काळात त्याने मला जन्माला घातले. नाहीतर एखाद्या शुष्क शतकात मी जन्मलो असतो, तर केवढ्या मोठ्या आनंदाला मी मुकलो असतो!’


हिंदी सिनेसृष्टीत लता येण्यापूर्वी संगीत होतं आणि आजही लताने निवृत्ती स्वीकारल्यावरही सिनेसंगीत आहे. त्यावेळी लोकप्रिय गायक होते. आणि आजही आहेत. पण मधला काळ लताने व्यापला नसता तर...? तर आपण विंध्य आणि सातपुड्याला हिमालय मानलं असतं. सिनेमाच्या गाण्यातलं एव्हरेस्ट काय असतं, ते कधी कळलंच नसतं. असं काय होतं, लतामध्ये की,१९५० ते २००० पर्यंत तिने अधिराज्य गाजवलं.


सुरुवातीचा काळ नूरजहां, शमशाद वगैरे गायिका गाजवत होत्या. नूरजहाँ तर लतासाठी ‘आयडॉल’ होती. पण आता वाटतं,की ते आवाज त्यावेळच्या कोवळ्या अभिनेत्रीसाठी खरंच योग्य होते का? नौशाद म्हणतो,त्याप्रमाणे ‘बैठकीच्या गायिकीसारखी ती गाणी होती. लता आली आणि आवाजातला कोवळेपणा एेकताना एक परकर-पोलक्यातली मुलगी गातेय,असं वाटायचं. शमशादचं किंवा जोहराबाईचं गाण बाहेर एेकायला कितीही चांगलं वाटलं तरी ते त्या कोवळ्या नायिकेच्या कोवळ्या गळ्याला ते भारदस्त वाटायचं. दुसरी गोष्ट,लताच्या आवाजात एवढा गोडवा होता की, मधाला जर बोलता आलं असतं, तर त्याने लताला विचारलं असतं, ‘लता, थोडा गोडवा उसना देणार का?’


 चौदा वर्षाची लता, वसंत देसाईंकडे काळी दोन मधे गायिली, तेव्हा त्यांनी विस्फारलेले डोळे महिनाभर तसेच राहिले असं म्हणतात. कारण त्यावेळी इतर गायिका काळी चार काळी पाचमधे गात. परंतु लताचा नाजूक आवाजही आकाशाला गवसणी घालायचा. किंबहुना ब्रह्मदेवाने तिचं स्वरयंत्र असं बनवलं होतं,की देवांना स्वर्गात बसून तिचं गाणं आरामात एेकायला येईल. आवाज असं वळण घ्यायचा की, हा गळा नाही हे साक्षात वाद्य आहे असं वाटावं. त्यामुळेच कठीणातल्या कठीण चाली तिच्या गळ्याने इतक्या लिलया पेलल्या की त्याला शिवधनुष्याची उपमाही तोकडी वाटावी. म्हणून तर नौशाद म्हणाला, लता आहे म्हणून ‘मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे’ सारखं गाणं मी तयार करू शकलो...


तुम्ही ‘ऐ दिलरूबा’ हे ‘रुस्तम सोहराब’मधलं सज्जाद या मनस्वी संगीतकाराने दिलेलं गाणं ऐकलंय? हे गाणं ऐकल्यावर सी. रामचंद्रसारखा महान संगीतकार म्हणाला होता, ‘मी कितीही प्रयत्न केला, तरी इतकं चांगलं गाणं कधीच देऊ शकणार नाही.’ हे गाणं गुणगुणून पहा,कठीण चाल म्हणजे काय याचा प्रत्यय येईल. माझ्या ‘स्टेज शो’मध्ये हे गाणं मी काहीवेळा घेतलंय. पण, एरवी हसतमुखाने गाणं म्हणणाऱ्या गायिकांच्या चेहऱ्यावर त्या गाण्यामुळे पडणारे कष्ट स्पष्टपणे जाणवतात. म्हणूनच, लतादीदी नसत्या तर अशी चाल सज्जादने तयार करूनही त्याचा काही फायदा नव्हता.


शमशाद बेगम लताच्या सुरुवातीच्या काळात एका गाण्यासाठी १५०० रुपये घेत होत्या. १९४८-४९चा तो काळ होता हं! त्यावेळी लतादीदींना पन्नास रुपये मिळत. दोन वर्षात लतादीदी टॉपवर गेल्या. एकदा कारदार स्टु़डिओत (निर्माता-दिग्दर्शक-लेखक-नट अशी ख्याती असलेल्या अब्दुर रशीद कारदार याच्या मालकीच्या)नौशाद फोन करायला बाहेर आले. त्यांना बाहेर एक कृश मुलगी गाणं गुणगुणताना दिसली. नौशानने तिला विचारलं, ‘नाव काय?’ तिने उत्तर दिलं. ‘लता मंगेशकर’ त्यांनी तिला ‘चांदणी रात’ या सिनेमात संधी दिली. पण लतादीदींसाठी महत्वाचा ब्रेक होता. त्यांच्या ‘अंदाज’ सिनेमात मिळालेली संधी!


तोपर्यंत शमशाद बेगम त्यांच्या संगीताची पट्टराणी होती. ‘अंदाज’च्या वेळी त्यांनी मेहबूबकडे लतासाठी हट्ट धरला. मेहबूबना लता नको होती. पण नौशादच्या हट्टापुढे त्यांनी मान तुकवली. त्यानंतर नौशादने शमशादकडे मागे वळून फारवेळा पाहिले नाही.


ज्यांनी ज्यांनी त्या काळात हा आवाज ऐकला, त्यांना त्यांना लक्षात आलं की हा आवाज म्हणजे द्रौपदीची थाळी आहे. सी. रामचंद्र तर लताच्या गळ्याच्या प्रेमात एवढे पडले की, शक्य असतं तर त्यांनी हिरोंनाही लताचा आवाज दिला असता. पण परमेश्वराने हा त्यांचा प्लॅन हाणून पाडला. एकेकाळी सी. रामचंद्र, संगीत देण्यासाठी दिलीपकुमारएवढे पैसे घेत. एका भांडणानंतर लता मंगेशकर त्यांच्या आयुष्यातून निघून गेली. आणि ते कोसळले. या आवाजाने अनेकांना तोंडघशी पाडलंय. शशधर मुखर्जी हे एकेकाळी हिंदी सिनेमातलं मोठं प्रस्थ, गुलाम हैदर नावाचा संगीतकार जेव्हा  दीदींना घेऊन त्यांच्याकडे गेला. तेव्हा त्यांनी हैदरला सांगितलं, ‘हिचा आवाज पातळ आहे. तो चालणार नाही.’ गुलाम हैदर म्हणाले, ‘तुम्ही चूक करताय. एक काळ असा येईल की निर्माते तिच्या घरासमोर रांग लावतील.’ तिला घेऊन ते मालाड स्टेशनवर गेले. त्याने ५५५ सिगारेटच्या डब्याचा ठेक्यासाठी उपयोग करून लताला चाल ऐकवली. आणि "मजबूर'मधल्या गाण्याची तयारी करून घेतली. ‘दिल मेरा तोडा’ हे गाणं त्यावेळी खूप गाजलं. पुढे अनारकलीच्या वेळी शशधर मुखर्जींना सी. रामचंद्रनी सरळ सांगितलं. ‘मी सर्व गाणी लताला देणार, मान्य असेल तरच संगीत देईन.’ शशधर मुखर्जीने ‘हो’ म्हटले.


लता नसती तर... तर ओ. पी. नय्यर या संगीतकाराच्या मोठेपणाला सोनेरी किनार कशी लाभली असती? पन्नास आणि साठच दशक या माणसाने लता मंगेशकरचा आवाज न वापरता गाजवला. हे सोपं नव्हतं. हे म्हणजे, विराट कोहलीला न खेळवता, मालिका मागून मालिका जिंकणं होतं. सचिन देव बर्मननेही लताबरोबर झालेल्या गैरसमजुतीमुळे १९५७ ते १९६२ या काळात लताचा आवाज वापरला नाही. लताची गाणी आशाला दिली. ‘बंदिनी’च्यावेळी त्यांचं भांडण मिटलं. ‘गोरा मोरा अंग लै ले’ हे गाणं त्यांनी लताला दिलं. पुढे त्यांनी फक्त १६ गाणी आशाला दिली आणि तब्बल ६० गाणी लताला! वर हे यात सांगितलं. ‘मी टेनिसपटू आहे. लता माझी पहिली सर्व्हिस आहे. ती चालत असताना दुसरी सर्व्ह कशाला करू?’


लता मंगेशकर नसती तर... काही कचकड्याच्या बाहुल्यांच्या घरची चूल कशी पेटली असती? कारण लता गाते, तेव्हा ती गाण्यातून अभिनय करते. त्या शब्दामधल्या भावना तिच्या गळ्यातून व्यक्त होतात. संगीताचे हे  वाहक त्या भावना आपल्या हृदयापर्यंत पोचवणारे, तिच्या स्वर्गीय आवाजाचे भोई असतात. नर्गीस एकदा म्हणाली, ‘राजा की आयेगी बारात’वर मला अभिनय करावा लागला नाही. आपोआप डोळे पाणावले. तुम्ही प्रिया राजवंश नावाची नटी पाहिलीय? मायकेल एन्जलोचा पुतळा तिच्यापेक्षा किती तरीपटीने जास्त प्रभावीपणे भावना व्यक्त करतो. तरी सुद्धा तिच्या मुखातली गाणी सुसह्य होतात, कारण तो स्वर भावना व्यक्त करतो. ‘जरा सी आहट पे’ हे प्रियावर चित्रित झालेलं गाणं ऐका. म्हणजे,मी काय म्हणतो, ते कळेल. मदन मोहन त्या गाण्याचा संगीतकार! लता नसती तर मदन मोहनने काय केलं असतं? त्याची दुसरी आवड होती क्रिकेट! तो बहुधा क्रिकेट खेळत राहिला असता. त्याने जे संगीत दिलं,ते सिनेमातल्या व्यक्तिरेखेसाठी किंवा प्रसंगापेक्षा लतासाठी दिलं असं बऱ्याचदा वाटतं. तुम्ही ‘देख कबिरा रोया’ची गाणी एेका. गाण्याचे शब्द, गाण्याच्या भावना, त्या प्रसंगासाठी आहेत असं वाटतच नाही. पण तिची गाणी रेडियोवर एेकताना ग्रेट वाटतात.


हं, लता नसती तर... कदाचित, सुमन कल्याणपूर, मुबारक बेगम, सुधा मल्होत्रा, वाणी जयराम यांचं मार्केट वधारलं असतं. मंगेशकर भगिनींवर आरोप नेहमी ठेवला जातो,की त्यांनी मोनोपॉलीचं राजकारण केलं. आपण धरून चालू की ते खरंय. पण याचाच अर्थ असा की ‘लता’ला तिच्या शंभर मैलाच्या आसपासही स्पर्धक नव्हता. लताने डोळे वटारले ,की भले भले घाबरायचे. हिंदी सिनेमाची संस्कृती पुरुषप्रधान आहे. आजही आहे. पण त्या काळात जास्त होती. क्वचित एखादी नटी दादागिरी करायची. पार्श्वगायन सोडलं, तर इतर सर्व क्षेत्र पुरुषांनी व्यापलेली होती. अशा या पुरुषप्रधान संस्कृतीत फक्त एकच पाहिज,े तेव्हा ‘दादागिरी’ करू शकायची आणि भले भले पुरुष तिच्या पुढे लोळण घ्यायचे. ‘मधुमती’तलं ‘आजा रे परदेसी’ गाणे बिमल रॉय वगळायला निघाले होते. बिमल रॉय केवढा मोठा निर्माता-दिग्दर्शक! त्याच्या आशीर्वादासाठी सर्व धडपडत - लताने त्याला स्पष्ट बजावले. ‘तू जर हे गाणं वगळलंस. तर मी तुझ्याकडे पुन्हा गाणार नाही.’ बिमल रॉयची हिंमत झाली नाही, गाणं वगळायची.


आणखीन एक किस्सा सांगतो. ‘राज कपूर’ म्हणजे सिनेमातला ‘मुघल’. रॉयल्टीवरच्या भांडणानंतर लता मंगेशकरने त्याच्या सिनेमात गाणं सोडलं. ‘सत्यम शिवम् सुंदरम्’च्या वेळी राज कपूरला लताच हवी होती. ‘लक्ष्मी-प्यारे’ हे लतादीदीच्या खास मर्जीतले. त्यांनी लताला विनंती केली. लताने अट घातली. ‘मी गाईन,पण रेकॉर्डिंगला राज कपूर नको.’ तरीही रेकॉर्डिंगप्पा वेळी राज कपूर आला. लक्ष्मी -प्यारेला तो सांगू लागला. इथे आलाप टाकायला सांग, तिथे आलाप वाढवं वगैरे वगैरे! लताने ‘लक्ष्मी-प्यारे’ना सांगितले. ‘त्याला गप्प बसायला सांग. नाहीतर अख्ख गाणं मी आलापाने भरेन.’ तरीही राज कपूरची वटवट सुरू होती, म्हटल्यावर तिने पायात चप्पल घातली आणि ती निघून गेली. ती थेट परदेशी दौऱ्यावर गेली. लक्ष्मी-प्यारेने राज कपूरला सांगितले, ‘आशाच्या आवाजात आपण गाणं गावून घेऊ.’ राज कपूर तयार झाला नाही. शेवटी,रेकॉर्डिंगच्यावेळी स्टुडियोत न येण्याची अट त्याला पाळावीच लागली. हे लताशिवाय कुणालाही शक्य नव्हते.


लता नसती तर १९५०-१९६५च्या संगीताला सुवर्णयुग म्हटलंच असतं असं नाही. सैगल, रफी, तलत, आशा, शमशाद, नूरजहाँ, किशोरकुमार वगैरे गायक महानच होते. पण लता परीस होती. तिने ज्या गाण्याला स्पर्श केला, ते सोनेरी झालं. माझा क्रिकेटपटू मित्र वासू परांजपेचं ब्रॅडमन आणि लता दोघांवर प्रेम. मी त्याला म्हटले. ‘लता विकेट खेळत असती, तर ब्रॅडमन झाली असती.’ तो म्हणाला ‘एक अंगुळे वर! ब्रॅडमनची सरासरी ९९.९४ आहे लताची १०० असती. ती सुरात कधीच चुकत नाही.’ लता नसती तर... आपला जन्म झाला नसता तरी चाललं असतं, असं म्हणणाऱ्या अनेकात एक वासू परांजपे नक्की असेल...

- द्वारकानाथ संझगिरी

बातम्या आणखी आहेत...