आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • E Liturature Festival : Sucessfull Medium Of Virsul Exchangne

ई-साहित्य संमेलन: व्हर्च्युअल आदान-प्रदानाचे यशस्वी माध्यम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पुण्यातील युनिक फीचर्सच्या वतीने नुकतेच तिसरे ई-साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पडले. व्हर्च्युअल माध्यमातून कुठल्याही तथाकथित राजकारणाचा स्पर्शदेखील संमेलनाला न होऊ देता केवळ साहित्य आणि साहित्यविचारांचे आदानप्रदान करणा-या या संमेलनाचा थोडक्यात आढावा.

ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी, महाकवी ग्रेस यांच्यासारखे पहिल्या व दुस-या संमेलनास अध्यक्ष लाभल्यानंतर नुकताच जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे या तिस-या संमेलनाचे अध्यक्ष होते. नव्या पिढीचे माध्यम म्हणवल्या जाणा-या या इंटरनेटवरील संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिकांनी असणे म्हणजे नव्या आणि जुन्या पिढीमधील जनरेशन गॅप भरून काढण्यासारखेच होते.


ई-रीडिंग फॅन तरुणांसाठी खास :
आजच्या पिढीला कागदी वाचनापेक्षा ई-रीडिंग अत्यंत जवळचे वाटत आले आहे. मात्र, त्यांच्यासाठी महाराष्‍ट्रभरातील मराठी लेखकांचे लेखन, विचार पोहोचवण्यात, त्यांचे एकत्र संमेलन भरवण्यात इंटरनेटसारखे माध्यम क्वचितच वापरले जाते. मात्र, कागद न लागणा-या या माध्यमाद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा अभिनव उपक्रम युनिक फीचर्स गेल्या दोन वर्षांपासून चांगल्या पद्धतीने राबवत आहे.


साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज रूपात इंटरनेटवर नोंदवण्याचा उपक्रम :
यंदाच्या संमेलनामध्ये विशेष बाब होती ती मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात इंटरनेटवर नोंदवून ठेवण्याचा युनिक फीचर्सने या संमेलनाच्या निमित्ताने सुरू केलेला उपक्रम. हा उपक्रम नव्या पिढीला मराठी साहित्यातील लेखनसृष्टी ज्या लेखकांनी बहरवली ते लेखक माहीत होण्याच्या दृष्टीने वाखाणण्यासारखा आहे. संमेलनाच्या म्हणजे युनिक फीचर्सच्या संकेतस्थळावर आपल्याला यंदा हरी नारायण आपटे, ताराबाई शिंदे, बहिणाबाई चौधरी आदी जुन्या-नव्या लेखकांची माहिती इंग्रजीत आणि मराठीमध्ये विस्तृतपणे वाचता येते. हा साहित्यिक दस्तऐवज भविष्यकाळात अत्यंत मोलाचा ठरणार आहे.


दहा ब्लॉग्जचे वाचन तरुणांसाठीची चांगली संधी :
याशिवाय अभिनवगुप्त यांनी या संमेलनासाठी शिफारस केलेल्या ‘ब्लॉग विश्व’ या सदराअंतर्गत दहा ब्लॉग्जचे वाचनदेखील एक चांगली संधी तरुणांसाठी ठरू शकते. ब्लॉग हे आताच्या काळातलं अभिव्यक्तीचं अत्यंत चांगलं असं माध्यम आहे. त्यामुळे शब्दांच्या पलीकडले, अक्षरधूळ, शाणपट्टी असे विविध लेखकांचे ब्लॉग्ज आपल्याला या संमेलनामध्ये वाचताना आपण समृद्ध होत असल्याची जाणीव होते.
* संमेलनस्थळावर दुर्गा भागवत,
कमल देसाईवर माहितीपट :
ज्यांनी लिहिलेलं आपण वाचतो, त्यांना पाहण्याचं, त्यांच्याविषयी समजून घेण्याचं कुतूहल असतं. माहितीपट हे कुतूहल शमवतात. म्हणून या संमेलनस्थळावर आपल्याला ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत आणि कमल देसाई यांच्याविषयीचे माहितीपट बघायला मिळतात.
* मराठीतल्या काही प्रसिद्ध कलाकृती


ऑडिओ स्वरूपात :
स्नॉवेल या कंपनीने मराठीतल्या काही प्रसिद्ध कलाकृती ऑडिओ स्वरूपात आणल्या आहेत. त्यांच्या सौजन्याने या संमेलनामध्ये त्यातील काही कलाकृती आपणास ऐकावयास मिळतात. तसेच स्नॉवेलच्या या प्रयोगाविषयी समीर धामणगावकर, वैभव कुलकर्णी यांच्याशी युनिक फीचर्सने साधलेला संवाद आपल्याला बरेच काही देऊन जातो. रारंग ढांग ही प्रभाकर पेंढारकर यांची कलाकृती तसेच चिं.त्र्यं. खानोलकरांची कोंडुरा ही कलाकृती आपल्याला इथे ऐकावयास मिळते व साहित्यश्रवणाचा आनंद घेता येतो.


अनुभव मासिकातून ‘लिहिते लेखक’ ही मालिका युनिक फीचर्सने चालवली होती. त्यापैकी भारत सासणे, मोनिका गजेंद्रगडकर, राजन खान, मिलिंद बोकील, मेघना पेठे, सानिया, राजन गवस अशा लेखकांविषयी या संमेलनस्थळावर आपणास वाचावयास मिळते.


नियतकालिक - अनियतकालिकांविषयी वाचासंमेलनस्थळावर : केवळ कवितेसाठी काम करणा-या वा साहित्याला वाहिलेल्या नियतकालिक-अनियतकालिकांविषयी या संमेलनास्थळावर आपल्याला वाचायला मिळते ज्यात काव्याग्रह, कविता-रती, नवाक्षर दर्शन या नियतकालिका-अनियतकालिकांविषयी वाचताना लोकसंस्कृती व मराठी साहित्य जपणारी ही माध्यमे किती संवेदनशीलतेने काम करतात याचीही आपल्याला जाणीव होते.


राजकारणविरहित ई-संमेलन, मनोगते ऑनलाइन : थोडक्यात पाहणे, वाचणे, ऐकणे या तिन्ही माध्यमांचा या ई-संमेलनामध्ये आपल्याला वापर करता येतो. व्हर्च्युअल आदान-प्रदानाचे हे एकप्रकारचे यशच म्हणावे लागेल. मोठ्या साहित्यिकांची मनोगते ऑनलाइन वाचायला मिळणं ही एक अपूर्व संधी असते. अनेकदा छापील व पुस्तकी स्वरूपाच्या होणा-या इतर साहित्य संमेलनांमध्ये राजकारणामुळे ती असून नसल्यासारखी होते किंवा ठरावकी प्रदेशातीलच रसिकांना त्याचा लाभ घेता येतो, मात्र ई-संमेलनामध्ये अशा प्रकारचे कुठलेही अडसर येत नाही.


नव्या पिढीचे माध्यम ज्येष्ठांनाही आपलेसे : शिवाय नव्या पिढीच्या म्हणवल्या जाणा-या या माध्यमाला ज्येष्ठांनीही आपलेसे केले आहे, स्वीकारले आहे, ही दोहोंमधल्या संवादाची वृद्धी होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या संमेलनाला फेसबुकवरील सवंग चर्चांचे स्वरूप सुदैवाने आलेले नाही हेही कौतुकास्पदच म्हणावे लागेल. कुठलाही कागद न वापरता हे संमेलन नव्या पिढीस वाचनसंस्कृती रुजवण्यास प्रोत्साहित करते यापेक्षा आणखी काय हवे?