आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पृथ्‍वीवरील उर्जेसाठी अवकाश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृष्णविवर किंवा ब्लॅक होल्स हा शब्द आता बर्‍याच लोकांचा परिचयाचा झालाय. कृष्णविवर ही अवकाशाचा एक इतका दाट भाग असतात की तिथे गुरुत्वबल शक्तिशाली असते. ते इतके प्रबळ असते की तिथून काहीही अगदी प्रकाशाची किरणे म्हणजेच अत्यंत हलके ऊर्जा कण आणि लहरी (वेव्ह) आरपार येऊ शकत नाहीत. परंतु कल्पना करा की दोन कृष्णविवरे एकमेकांवर आदळली आणि मिसळून गेली तर काय होईल? कदाचित आपल्याला नक्की सांगता येणार नाही. परंतु कॅनेडियन अवकाश संस्थेचे अध्यक्ष स्टीव्ह मॅक्लिन यांनी मात्र 'यामुळे वायूचे उच्चगतीचे प्रवाह बाहेर पडतील', असे खात्रीने सांगितलेय. अवकाश हे आतापर्यंत पुरेसा उपयोग न झालेले साधन आहे. पृथ्वीची ऊर्जा गरज भागविण्यासाठी एक पर्याय म्हणून त्याचा वापर निदान सैद्धांतिकदृष्ट्या तरी शक्य आहे. तिथल्या एका टाचणीच्या टोकावरील ऊर्जेमुळेच पृथ्वीची अनेक वर्षांची ऊर्जा गरज सहज भागू शकेल असा आशावाद मॅक्लिन यांनी व्यक्त केला. ही ऊर्जा शोधून नीट वापरणे मात्र आवश्यक आहे. परंतु अवकाश ऊर्जेचा संभाव्य स्रोत तर आहेच; परंतु त्याहीपेक्षा त्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे पृथ्वीतलावरील पारंपरिक आणि पर्यायी ऊर्जा स्रोतांचा शोध आणि आरेखन (मॅपिंग) करण्यामधील त्याची भूमिका. जागतिक हवामान परिस्थितीबाबत या अवकाशस्थ विज्ञानाची खूपच मदत होऊ शकेल. ग्लोबल वॉर्मिंगबाबत ते खूपच महत्त्वाचे ठरू शकते. भौतिकशास्त्रज्ञांना 'प्रोटोस्टेलार' प्रणाली आणि न्यूट्रॉन तार्‍यांसारख्या 'फिनामिना'ची उकल संपूर्णपणे झालेली नाही. या दोहोंमध्ये एका सूर्याचे वस्तूमान 20 कि.मी. किंवा 12 मैलांच्या व्यासामध्ये कोंबणे शक्य होते. तरी देखील हे समजावून घेण्यासाठीच्या प्रयत्नांतून पृथ्वीवरील ऊर्जेची कमतरता दूर करण्यास हातभार लागू शकतो. उपग्रहाधारित आकडेवारीच्या साहाय्याने अवकाश संस्था 'ऊर्जा दारिद्रय़' दूर करण्यासाठी त्वरित हातभार लावू शकतात. अशी आकडेवारी गोळा करणे आणि उपलब्ध करणे गरजेचे आहे. अवकाशस्थ फलाटांद्वारे विस्तृत आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू असून, त्यामधून ऊर्जेची नवी साधने सापडू शकतात. त्याचबरोबर हवामान बदल आणि ऊर्जेचा वापर आणि पुरवठा या संदर्भातदेखील मदत होऊ शकते. सध्या 70 पेक्षा जास्त उपग्रह 'पृथ्वीचे भविष्य जोखण्याचे' काम करीत असून, पुढील 8 वर्षांत ती संख्या 300 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दशकांत अवकाशातून प्राप्त आकडेवारीची गुणवत्ता प्रकार आणि एकूण प्रमाण खूपच वाढलंय. अर्थात माहितीचे विश्लेषणदेखील बरेच सुधारलेय. 1999 मध्ये 'टेरा' नावाच्या नासाच्या पहिल्या अर्थ ऑब्झर्व्हिंग प्रणालीच्या अवकाश यानावरून 'मॉपिट' नावाचे एक कॅनेडियन उपकरण अवकाशत पाठविण्यात आले होते. 'अयनांबरातील' म्हणजेच 'ट्रोपोस्पिअर'मधील प्रदूषणाचे मापन करण्यासाठी ते सोडण्यात आले. त्याद्वारे कार्बन मोनॉक्साइडचे उत्सर्जन, त्यांच्या हालचाली आणि पृथ्वीवरील अनियंत्रित ज्वलनावर लक्ष ठेवता येते. त्यामुळेच स्थानिक पातळीवरील प्रदूषणाचे जागतिक परिणाम असतात, असे दिसून आले आहे अशाच प्रकारे कार्बन डायॉक्साईडसारख्या इतर वायू प्रकारांच्या भूपृष्ठावरील 'कार्या'वर लक्ष ठेवता येते. कार्बन मोनॉक्साईडविषयीचे मोजमाप अचूक असले तरी अवकाशातून इतर प्रमुख हरितगृह वायूंवर लक्ष ठेवण्यासाठीचे तंत्र अजून विकसित करावे लागेल. आपल्या तंत्रज्ञान प्रगतीसाठी ते एक मोठे आव्हान आहे. कार्बन डायॉक्साइडचा वेध घेण्याकरिता सोडलेल्या उपग्रहाकडून आकडेवारी प्राप्त होऊ लागली आहे. गो सॅट (ग्रीन हाऊस गॅसेस ऑब्झर्व्हिंग सॅटेलाइट) नावाचा एक उपग्रह 2009 मध्ये जपानने अवकाशात सोडला होता. त्या कडूनदेखील चांगली माहिती मिळू लागली आहे. त्याचा उपयोग शेवटी आंतरराष्ट्रीय कराराचे आणि नियमनांचा पालन नीटपणे होतेय अथवा नाही यावर लक्ष देण्यासाठी होऊ शकेल. निदान हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याच्या संदर्भात तरी, हे शक्य होईल. जमिनीवरील देखरेखीस पूरक म्हणून अवकाशस्थ देखरेख उपयुक्त आहे. कारण जमिनीवरील देखरेखीतून प्रदूषण किती प्रमाणात अवकाशात पोहोचलंय ते कळते, परंतु इतर सूक्ष्म कणांची हालचाल त्यातून कळत नाही. या ठिकाणी अवकाशातील देखरेख उपयुक्त ठरते. म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगवर देखरेख ठेवण्याच्या कामी अवकाशाची खूपच मदत होते; परंतु उपग्रहांकडून प्राप्त माहितीचा खरा उपयोग संभाव्य स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांच्या निवडीकरिता आणि त्याच्या उपयुक्ततेबाबत होऊ शकतो. 200 पेक्षा जास्त देशांमधील 2,65,000 पेक्षा जास्त उपयोगकर्त्यांद्वारे वापरण्यात येणारं 'रेट स्क्रीन' (RETScreen) नावाचे एक विश्लेषण सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामुळे अनेक व्यक्ती आणि संस्थांना एखादा प्रस्तावित नूतनीकरणक्षम ऊर्जा, ऊर्जा कार्यक्षमता वा सहनिर्मितीचा प्रकल्प परवडण्याजोगा आहे वा नाही ते समजण्यास मदत होते. हे सॉफ्टवेअर कॅनेडियन सरकारचे आहे. त्यामध्ये नासाच्या उपग्रहाद्वारे गोळा करण्यात येणा-या वैज्ञानिक माहितींवर आधारित अल्गॉरिदम्सचा वापर करण्यात येतो. उदा. आफ्रिकेमधील सौरशक्तीधारित ‘वॉटर पंप्स’ची उपयुक्तता समजावून घेण्यासाठी किलो प्रमाणात सौर प्रारणांची गरज आहे ते यातून तपासण्यात आले. ‘रेटस्क्रीन’द्वारे जमिनीवरील पाच हजार निरीक्षण केंद्रे चालविली जातात. परंतु यापैकी बहुतांश केंद्र विकसित देशातील विमानतळ वा सैन्य तळांवरच आहेत विकसनशील देशांबाबत तर उपग्रह हाच आकडेवारीचा विश्वासार्ह स्रोत असल्याचे रेटस्क्रीन इंटरनॅशनलचे संचालक ग्रेगरी लेंग सांगतात. त्यांचा चमू नासाच्या लँग्ली रिचर्स सेंटरबरोबर गेल्या एक दशकापासून कार्यरत आहे. नासाची हवामानविषयक माहिती आणि रेटस्क्रीन सॉफ्टवेअर या दोहोंनी स्वच्छ ऊर्जा विश्लेषण क्षेत्राकरिता प्रमाणकाचे जागतिक स्थान प्राप्त केलेय.
छोट्या शेतक-यांपासून ते मोठमोठ्या वीज कंपन्यांपर्यंतच्या सर्वच प्रकारच्या रेटस्क्रीन उपयोग कर्त्यांना नवीन मॉनिटरिंग टूल्समुळे ऊर्जा प्रकल्पांवर सहज लक्ष ठेवता येते. त्यासाठी नासाच्या उपग्रहांकडून प्राप्त आठ दिवसांपूर्वीची माहिती वापरावी लागते. साधनांचा कार्यक्षम वापर करण्यासाठी या उपग्रहांची भूमिका विलक्षण म्हणावी अशीच आहे.
आपत्ती व्यवस्थापनात सुधारणा करण्यापासून ते आॅफशोअर (सागरातील) तेलविहिरींचे स्थान निश्चित करण्यापर्यंतच्या विविध उपयोगांमध्ये अवकाशस्थ आकडेवारी खूपच महत्त्वाची ठरते. भूगर्भातील फॉल्ट लाइनमध्ये बदल झाल्याबरोबर सुनामी लाट निर्माण होणा-या दक्षिण पॅसिफिकमध्ये आपण तेल रिग उभारायलाच नको. अवकाशातून प्राप्त प्रतिमांमुळेच भूकंपानंतर आलेल्या हैती देशातील पुरानंतर डेंग्युचे थैमान सुरू होईल हे समजले. जमिनीच्या वापरासंबंधी आणि त्यामधील आर्द्रतेविषयक माहिती शेतक-यांना कमी ऊर्जेतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यास प्रवृत्त करू शकते. त्याचबरोबर यापूर्वी न गेलेल्या क्षेत्रातील प्रवास सुरक्षितपणे करण्यासाठी जहाजांना उपग्रहाकडून प्राप्त माहिती उपयुक्त ठरते. तसेच नवीन ऊर्जा साठ्यांचा शोधही घेता येतो. आपल्याला मिळू शकणा-या संभाव्य फायद्यांच्या तुलनेत या क्षेत्रात करावी लागणारी गुंतवणूक खूपच कमी आहे. शासनाच्या पायाभूत सोयींचा (इन्फ्रास्ट्रक्चर) पाया म्हणून अवकाश आणि त्याच्या ‘अ‍ॅसेट्स’ना महत्त्व द्यायला हवे. ऊर्जा धोरणासाठी ही आकडेवारी वापरायला हवी. या आकडेवारीत खूपच सुधारणा होऊन तिच्या वापराने खरोखरच खूप फरक पडू शकतो. तेव्हा भारतानेदेखील या दृष्टीने दमदार पावले टाकून ‘अवकाश’ महासत्ता? बनण्याचा पुढचा टप्पा गाठायला हवा.