आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतती प्राप्तीसाठी काही साधे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक लोकसंख्या वाढीचा दर वेगाने वाढत असल्याने त्याचे नियंत्रण करण्यासाठी सरकारी यंत्रणा प्रचंड पैसा खर्च करत आहे. अशा वेळी ज्यांना मूलबाळ नाही अशा लोकांकडे कुणी लक्ष देत नाही. मागील 50 वर्षांत अनेक वेळा निश्चय करूनदेखील लैंगिक शिक्षणाची सुरुवातच होऊ शकलेली नाही. त्यामुळे आपले शरीर आणि प्रजनन प्रक्रिया यासंबंधी पायाभूत माहितीदेखील नसलेली अनेक जोडपी आहेत.


* 80 टक्के जोडपी प्रजनन संस्थेची रचना आणि कार्य तसेच गर्भधारणेची नैसर्गिक प्रक्रिया याबाबत अज्ञानी : संतती नसलेली जोडपी डॉक्टरांच्या चांगुलपणावर अवलंबून राहत वर्षानुवर्षे उपचार करवून घेतात. यातील 80 टक्के जोडपी प्रजनन संस्थेची रचना आणि कार्य तसेच गर्भधारणेची नैसर्गिक प्रक्रिया याबाबत अज्ञानी असतात. त्यामुळे ही जोडपी उपचारादरम्यान डॉक्टरांच्या सूचनांवर अवलंबून असतात. हे डॉक्टर्स जर नावाजलेले असतील तर त्यांच्याकडे असे लहानसहान बारकावे समजावून सांगण्यासाठी वेळच नसतो.
संतती प्राप्तीसाठी शरीर समागम आवश्यक आहे. या सर्वात महत्त्वाच्या क्रियेविषयी काही चौकशीच केली जात नाही. ज्या क्रियेविषयी आपण लहानपणापासून कुणाशी बोलू शकत नाही, ज्याविषयी आपल्या आईवडिलांना विचारता येत नाही. अशी क्रिया उपजत आणि सुलभपणे घडू शकत असेल असे मानणे चुकीचे आहे.


* अल्ट्रा सोनोग्राफीसारख्या रोजच्या तपासणीची गरज : संतती प्राप्तीसाठीचे उपचार स्त्री शरीरातील ‘ओव्हुलेशन’ या एकाच घटनेभोवती विणलेले असतात. यासाठी अल्ट्रा सोनोग्राफीसारख्या रोजच्या तपासणीची गरज पडते.
स्त्री शरीरात महिनाभरात काही नेमक्या घटना वेळापत्रकाप्रमाणे घडत असतात. या घटनांचा मागोवा घेऊन नोंद करणे आवश्यक असते. स्त्रियांनाही योग्य मार्गदर्शन केल्यास त्या आपले ओव्हुलेशन नेमके कधी होते ते ओळखू शकतात. यासाठी फक्त तासाभराचे मार्गदर्शन पुरेसे ठरते. 1950 च्या दशकात लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याची जगात आवश्यकता भासू लागली त्या वेळी मूल होण्याचे टाळण्यासाठी कुटुंब नियोजनासाठी अनेक साधने आणि रासायनिक उपाय तसेच गोळ्या-इंजेक्शनचे शोध लावले गेले.
* प्रगत देशांतील काही धर्मांत कुटुंब नियोजनासाठी रासायनिक किंवा अडथळ्याचे उपाय करण्यास विरोध : प्रगत देशांतील काही धर्मांत कुटुंब नियोजनासाठी रासायनिक किंवा अडथळ्याचे उपाय करण्यास विरोध होता. त्यामुळे त्या काळात धार्मिक आदेशांच्या मर्यादेत राहून संतती नियमनाच्या अनेक नैसर्गिक पद्धती शोधून काढण्यात आल्या. रिदम मेथड, सेफ पीरियड मेथड, बिलिंग्ज मेथड, बीबीटी, स्पीन बार्केट टेस्ट मेथड अशा अनेक पद्धतींचा वापर धर्मगुरूंनी मान्य केला. त्यामुळे अपराधी भावना न बाळगता लोक कुटुंबाचे नियोजन करू शकतात.
स्त्री शरीरात एका मासिक पाळीपासून पुढच्या मासिक पाळीपर्यंतच्या 28 ते 30 दिवसांत फक्त एकदाच स्त्रीबीज तयार होते. हे स्त्रीबीज सहा ते 24 तास जिवंत आणि संयोगक्षम असते. या काळात पुरुषाचे शुक्रजंतू स्त्रीबीज फलित करू शकतात.
पुरुषाचे शुक्रजंतू स्त्रीच्या प्रजनन संस्थेत कमाल 72 तास जिवंत आणि कार्यक्षम राहू शकतात.
म्हणजे पूर्ण महिन्यात फक्त 5 दिवसच गर्भधारणेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. जर संतती टाळायची असेल तर हे दिवस ‘अनसेफ’ असतात. इतर दिवस गर्भधारणेचा धोका नसलेले म्हणजे ‘सेफ’ असतात.
* ‘कॅलेंडर मेथड’ : हे ‘सेफ’ आणि ‘अनसेफ’ दिवस शोधून काढण्याच्या अनेक पद्धती विकसित झाल्या. प्रथम पाळीच्या दिवसांनुसार आकडेमोड करून ‘सेफ’ दिवस ठरवण्याच्या पद्धतीला ‘कॅलेंडर मेथड’ नाव दिले गेले. याच पद्धतीत आणखी अचूकपणा येण्यासाठी शरीराच्या तापमानातील बदल मोजण्याची बेसल बॉडी टेंपरेचर किंवा बीबीटी पद्धतीचा शोध लागला. नंतर बिलिंग नावाच्या डॉक्टरने स्त्री शरीरातील स्रावाचा अभ्यास करून ओव्हुलेशनचा नेमका दिवस शोधण्याची पद्धत समजावली. ओव्हुलेशनचा नेमका दिवस कोणता याचे आधीच ज्ञान होऊ लागले. त्यानुसार ओव्हुलेशनच्या आधीचे तीन दिवस, ओव्हुलेशनचा दिवस आणि त्यापुढचा एक दिवस असे पाच दिवस शरीरसंबंध टाळून वर्षानुवर्षे नको असलेली गर्भधारणा टाळणे शक्य झाले. लाखो-करोडो स्त्रियांनी या पद्धतीचा उपयोग करून त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे. अगदी अशिक्षित स्त्रियादेखील या पद्धतीचा सहज उपयोग करू शकतात.
ज्या जोडप्यांना संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करायचा आहे त्यांना घरच्या घरी करण्याजोग्या निरीक्षण पद्धतीने आपला ओव्हुलेशन दिवस शोधून काढता येईल. हे पाच दिवस गर्भधारणेसाठी महत्त्वाचे ठरवून या काळात शरीरसंबंध केल्यास संतती प्राप्तीची शक्यता शेकडो पटीने वाढेल. संतती होण्यासाठी ज्या जोडप्यांनी अजून डॉक्टरी उपचार सुरू केले नाहीत त्यांना या पद्धतीचा नक्कीच फायदा होईल. ज्यांचे डॉक्टरी उपचार सुरू आहेत त्यांनाही या पद्धतीचा नक्कीच फायदा होईल.
अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल कौन्सिल फॉर सेक्स एज्युकेशन अँड पॅरेंटहूडतर्फे जगभर मोफत मार्गदर्शनाची सोय आहे. नाशकात महिन्यातून एक दिवस एक तासाचे मार्गदर्शक लेक्चर आणि स्लाइड शोचे आयोजन केले जाते.


स्त्रीबीज सहा ते 24
तास जिवंत, संयोगक्षम
स्त्रीच्या शरीरात एका मासिक पाळीपासून पुढच्या मासिक पाळीपर्यंतच्या 28 ते 30 दिवसांत फक्त एकदाच स्त्रीबीज तयार होते. हे स्त्रीबीज सहा ते 24 तास जिवंत आणि संयोगक्षम असते. या काळात पुरुषाचे शुक्रजंतू स्त्रीबीज फलित करू शकतात. पुरुषाचे शुक्रजंतू स्त्रीच्या प्रजनन संस्थेत कमाल 72 तास जिवंत व कार्यक्षम राहू शकतात. म्हणजे पूर्ण महिन्यात फक्त 5 दिवसच गर्भधारणेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात.

(लेखक फेलो इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ
सेक्य एज्युकेशन अँड पॅरेंटहूड ऑफ अमेरिकन युनिव्हर्सिटी आहेत)