आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूप खाल्लं की रूप येतं !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आयुर्वेदिक औषधांचा वापर करताना रुग्णांना होणारा शारीरिक व मानसिक त्रास एवढेच न बघता त्याच्या संपूर्ण दिनचर्याचाच उलगडा करावा लागतो. रुग्ण केव्हा उठतो-झोपतो, केव्हा जेवण करतो. दिवसभर काय काय खातो. त्याला असलेला जुना आजार त्याची पूर्वीपासूनची खाण्यापिण्याची पद्धत वगैरे सर्वच माहिती काढून घ्यावी लागते, थोडक्यात ‘हर पल की खबर’ ठेवावी लागते.

रोजची रुग्णांची दिनचर्या बघता बघता असं जाणवले की सध्याची तरुण पिढी विशेषत: मुली आहाराला मुळीच महत्त्व देत नाही. वेळ झाली म्हणून पोटात काहीतरी ढकलायचे..... हो अगदी काहीतरी...... ते पण आईचा तगादा असतो म्हणून ! कित्येकांना तर भुकेची संवेदनादेखील होत नाही. वेळ झाली म्हणून खायचे किंवा मग अगदीच अनियमित वेळी किंवा दिवस दिवसभर पूर्ण उपाशी ! त्यातल्या त्यात आहार कोणता? 4-5 कप चहा, पाणीपुरी, समोसा, कचोरी, भेळ सर्व असे पदार्थ जे चटपटीत आहे. तिखट एवढे की नाका कानाला झोंबतील! आंबट असे की नाव काढताच तोंडाला पाणी सुटेल... ठीक आहे खा! खायला काहीच हरकत नाही; परंतु काही लिमिटेशन! तुम्ही अगदी रोज पंढरीच्या वारीसारखी नियमित भेळ-पाणीपुरीच्या ठेल्याची वारी केली तर कसे जमणार? वरून तुमच्या आहारात तुपाचा मुळीच समावेश नसतो. कुणाला तूप आवडत नाही तर कुणाला त्याच्या वासाने देखील मळमळते. कुणाला आवडत असले तर भेटत नसते. घरी तयार केलेले साजूक तूप वरच्या वर दुर्मिळ होत चालले आहे, तर कुणी वजन वाढेल या भीतीने तूप खात नाही. गुलाबजामून, आइस्क्रीम, केक, पेस्टी, बटर हे सर्व पदार्थ मात्र चालू असतात. तर कुणाला आपली त्वचा तेलकट आहे तूप खाल्ले तर अजून पिंपल्स वाढतील ही चिंता असते, पण असे लोकसुद्धा तळलेले भजे पापडी खाताना ही काळजी मनात आणीत नाहीत. आयुर्वेदानुसार तुपात अनेक औषधीय गुण आहेत. त्याच्या गुणप्राप्तीसाठी कमीत कमी रोज 7 - 8 चमचे तूप तुमच्या पोटात गेलेच पाहिजे. ते पण घरचे साजूक तूप. त्यातल्या त्यात गाईचे तूप मिळाल्यास तुमचे अहोभाग्यच म्हणावे लागेल.

तूप हे स्निग्ध, शीत, बुद्धिवर्धक, नेत्राची ज्योती वाढवणारे, सांध्याची कार्यशक्ती वाढवणारे, त्वचेची कांतिवर्धक आहे, शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करणारे, आम्लपित्त या विकारात अतिशय उपयुक्त असणारे, असे अनेक गुणांनी युक्त होय. तसेच गर्भवती स्त्रियांसाठी तूप हे अमृतवत आहे. गर्भिणी स्त्रियांनी तूप हे किमान 10 - 12 चमचे येन केन प्रकारे रोज घ्यायलाच हवे. त्यामुळे बाळाचा रंग उजळतो. बाळ छान सुदृढ होतो. बाळाची प्रतिकारशक्ती चांगली वाढते व त्या गर्भिणी स्त्रीची प्रकृती देखील संपूर्ण गर्भारपणात उत्तम राहण्यास मदत मिळते. थोडक्यात तुपामुळे संपूर्ण शरीराचे पोषण होते. लहानपणापासून तूप खाण्याची सवय मुलांना लावायला हवी. गरम गरम भाकरीला माखलेले लोणी असे भरले ताट त्याची लज्जत काही वेगळीच.मुंबईच्या हॉटेल ताजचे देखील जेवण यासमोर फिके, बरं का! जेवणाव्यतिरिक्त तुम्ही शिरा, लाडू, लापशी या प्रकारामधूनदेखील तूप घेऊ शकता.

शरीराचे छान पोषण होईल. कृश प्रकृती असणा-या नी तर तूप अवश्य घ्यायला पाहिजे. ज्यांना नेहमी पित्ताची तक्रार असेल, शौचाला नीट साफ होत नसेल त्यांनी 1 कप गरम दुधात 2 चमचे साजूक तूप घालून रोज संध्याकाळी जेवणाच्या 10-15 मिनिटे आधी घ्यायला हवे. ज्यांना तूप आवडतच नाही. त्यांच्या नकळतपणे त्यांच्या आहारात थेंब थेंब तूप टाकून त्यांना हळूहळू तूप खाण्याची सवय लावायलाच पाहिजे. त्यांच्या चपातीच्या पिठातच तुपाचे मोहन रोज घ्यावे. शिवाय जोडीला थोडा व्यायामदेखील हवा. तूप सहजासहजी पचत नसते. असे म्हणतात. आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी तूप सर्वतोपरी मदत करते. आरोग्य उत्तम तर त्वचेवर तेज येईलच आणि सौंदर्य खुलेलच! म्हणूनच पूर्वीपासून तूप खाल्लं की रूप येतं, अशी तुपाची ख्याती आहे.

laddapvn@gmail.com