आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणस्नेही पर्णगणेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

4-5 वर्षांपूर्वी पेपरमधून व टीव्हीवरून इको-फ्रेंडली गणपती स्पर्धा जाहीर झाली अन् मी स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवले. मला वाटले शाडूचा गणपती, बाजारात गेले की लगेच मिळेल. मी माझ्या मिस्टरांना गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी शाडूचा गणपती आग्रहाने आणायला सांगितले; परंतु हडको परिसरात कुठेही शाडूचा गणपती मिळाला नाही, सगळीकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचेच गणपती विक्रीला होते.


घरी माझा साग्रसंगीत स्वयंपाक तयार, मोदकाचा नैवेद्य तयार. गणपतीची इको-फ्रेंडली आरास तयार. फक्त गणपतीबाप्पा नाही. सर्वांना भूक लागलेली आणि माझा हट्ट की स्पर्धेसाठी मला शाडूचाच गणपती हवा.
शाडूच्या गणपतीची ऑर्डर दिली तरच त्या वेळी शाडूचा गणपती उपलब्ध होत असे, आता काय करायचं? माझा नातू सार्थक मला म्हणाला, आजी, तू पानाफुलांचं शुभेच्छापत्र बनवतेस ना? मग पानाफुलांचा गणपतीही करून बघ, तुला स्पर्धेतही भाग घेता येईल. ‘गरज ही शोधाची जननी असते’ म्हणल्याप्रमाणे मी ही शुभेच्छापत्राचं साहित्य म्हणजे, पानं, फुलं, गवती तुरे, गोंद, कार्डशीट घेऊन तयारीनिशी गणपती बनवण्यात गुंतले. इको-फ्रेंडली गणेश स्पर्धेत भाग घ्यायची मनातून तीव्र इच्छा असल्यामुळे लवकरच आकर्षक सुंदर असा पानाफुलांचा गणपती तयार झाला. आणि नंतर तो सुशोभित रोपांच्या नारळाच्या करवंटीच्या सृष्टीत स्थानापन्न झाला. गणपतीच्या आजूबाजूला पर्यावरण, ध्वनिप्रदूषण, पाणीबचत, स्त्री भ्रूणहत्या आदी विषयांवर सामाजिक जागृती करणारी घोषवाक्ये (सामाजिक संदेश) लावली गेली.


दहा दिवसांनंतर गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी घरीच बादलीभर पाण्यात विधिवत गणेश विसर्जन करून ते पाणी बागेतील झाडाला घातले. विसर्जन गर्दीतून सुटका, पाण्याची बचत, पर्यावरणाचा विचार हे सारं लक्षात घेता मी आता दरवर्षी ‘पर्णगणेश’च बसवायचं ठरवलं आहे.


‘बघायची असेल सुंदर सृष्टी, गणराया दे आम्हाला पर्यावरणदृष्टी’
अशी माझी पानाफुलांच्या (वाळलेल्या) कच-यातली कला (पर्णाविष्कार) मला इथे उपयोगी आली. प्रत्येकाला कुठला तरी छंद असावा.


‘असावा प्रत्येकाला कुठला तरी छंद, त्यातून मिळतो नवनिर्मितीचा आनंद’
‘केला गोळा पालापाचोळा, त्यातून साकारला गणेश सोहळा.’