आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईद मुबारक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिनाभराचे उपास, खरेदी, तयारी या सगळ्याचा कळस आज होईल. आज रमजान ईद. म्हणजेच ईद उल फित्र. मुलांमध्ये ईदी किती मिळेल याची उत्सुकता, तर आम्हा बायकांना घरी जमलेल्या सर्व कुटुंबीयांची खातिरदारी व्यवस्थित होते की नाही, याची काळजी. शीरकुर्मा करण्यासाठी तीनचार दिवस आधीपासूनच दूधवाल्याकडे अधिकच्या दुधाची ऑर्डर नोंदवावी लागते. बाकी स्वयंपाकाचीही पूर्वतयारी करावी लागते, कारण आजचा दिवस म्हणजे सर्व कुटुंबीयांनी एकत्र जमण्याचा दिवस.


खेरीज महिनाभर साफसफाई सुरू असते. रमजानमध्ये नवीन वस्तूंना महत्त्व असते त्यामुळे नवीन कपडे, नवीन दागिने, घर सजवण्यासाठी नवीन वस्तू, घराची रंगरंगोटी या सगळ्यात महिना निघून जातो.


फित्र म्हणजे दान. रमजानचा संपूर्ण महिना दानाला अतिशय महत्त्व आहे. आपल्या उत्पन्नाच्या अडीच टक्के उत्पन्न आपल्याच गरीब नातलगांना दान करावे, जेणेकरून त्यांनाही ईद साजरी करता यावी, असा यामागचा उद्देश आहे. त्यालाच जकात म्हणतात. उर्दू कालगणनेनुसार नववा महिना रमजानचा महिना असतो. अनेक भाविक सातवा रज्जब, आठवा शाबान आणि नववा रमजान असे तिन्ही महिने उपवास करतात. मात्र, बहुतांश लोक रमजानमध्येच उपास करतात. या महिन्यात केलेल्या उपासाला आणि उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याला बरकतों का महिना, इबादत का महिना, असेही म्हणतात.


इस्लाममध्ये दिवसातून पाच वेळा नमाज पढण्यास सांगितले आहे. रमजानमध्ये मात्र याखेरीज सहावीही नमाज पढली जाते. परंतु, उपास केलाच पाहिजे वा नमाज पाच वेळा पढलीच पाहिजे, असे कोणतेही बंधन नाही. आजारी, वृद्ध, प्रवासात असलेले लोक उपास करत नाहीत. नमाजदेखील दिवसातून पाचदा नाही तर एकदा, महिन्यातून एकदा, किमान वर्षातून एकदा पढावी, इतके स्वातंत्र्य आहे.


उपास आणि उपासना म्हणजे काय आहे, तर वाचेवर, इंद्रियांवर नियंत्रण. सहनशीलता. या सगळ्याचा फायदा मानसिक पातळीवर होतो, तर प्रत्यक्ष उपवासामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो.


महिनाभराच्या उपासानंतर येणा-या ईदला मग खाण्यापिण्याची चंगळ स्वाभाविकच म्हणावी लागेल. शीरकुर्मा म्हणजेच शेवयांची खीर, याशिवाय ईद साजरी होत नाही. त्याखेरीज मग बिर्याणी, कबाब, आणि वेगवेगळे जितके करता येतील तितके पदार्थ आम्ही घरी करतो. शीरकुर्म्यासाठी घरी केलेल्या शेवया मिळाल्या तर उत्तमच. या शेवया तुपावर भाजून घ्याव्या. काजू, बदाम, पिस्ते, खजूर असा सुका मेवा पाण्यात थोडा वेळ भिजवून त्याचे बारीक काप करून तेही तुपावर परतून घ्यावे. शेवया व सुका मेवा एकत्र करून त्यात साखर आणि पाणी घालून ते उकळावे. शेवया शिजल्यानंतर त्यात गरम दूध घालावे. काही घरांमध्ये त्यात खवाही घालतात. खीर वेलची, केशर घालून सजवावी. किमान पाच लिटरची तरी खीर सर्व घरांमध्ये होतेच. त्यामुळेच त्याची आधीपासून ऑर्डर नोंदवून ठेवावी लागते. हा शीरकुर्मा शेजा-यांमध्ये वाटण्याची जुनी पद्धत आहे, जी अजूनही अनेक घरांमध्ये पाळली जाते.


ईदच्या निमित्ताने कुटुंब एकत्र येतं. बाहेर शिकत असलेले, नोकरी करत असलेले सदस्य याच निमित्ताने एकत्र येतात. ईदच्या दिवशी नवीन लग्न झालेली मुलगी नव-यासोबत माहेरी येते. घरातल्या लहान मुलांना आकर्षण असते मोठ्यांकडून ईदी (बक्षिसी) किती मिळणार याची. मुलं कितीही मोठी झाली तरी आईबापासाठी लहानच असतात, त्यामुळे त्यांनाही ईदी देऊन त्यांचे कौतुक केले जाते.
ईदच्या दुस-या दिवशी असते बासी (शिळी) ईद. या दिवशी आपण घराबाहेर पडून इतरांच्या भेटी घ्याव्यात, असा रिवाज आहे.