आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक कप कॉफी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुकवर एक पोस्ट पाहून ती विचारात पडली. एका बाईचा कॉफी पितानाचा फोटो आणि सोबत दोन ओळी - सकाळी कोणीही माझ्याशी बोलत नसताना प्यायला मिळालेली कॉफी माझी फेव्हरिट आहे. किती किमान अपेक्षा आहे ना यात. आणि तरीही किती बायका असतील, शहरातल्या वा गावातल्या, नोकरी करणा-या वा घर सांभाळणा-या, तरुण वा वयस्कर, ज्यांना असा निवांत कॉफी वा चहाचा कपही दुर्लभ असतो. तिला तिचीच सकाळ आठवली. उठून आधी चहाचं आधण टाकायचं, एकीकडे भाजी चिरायला घ्यायची, नाष्ट्याची तयारी सुरू करायची, नव-याला/मुलांना उठवायचं, त्यांना आवरायला मदत करायची आणि कणीक भिजवता भिजवता तोवर गारढोण झालेला चहा घशाखाली ढकलायचा हेच बहुतेकींच्या नशिबात. एक कप चहा प्यायला लागतात ती पाच मिनिटंसुद्धा तिला रोज मिळत नसत. सकाळी ताजा पेपर वाचणं तर दूरच राहिलं. तो हातात येणार रात्री जेवणखाण झाल्यानंतर मागचं आटोपून झालं की.
मग एक दिवस तिने ठरवलं, आज मी काही झालं तरी वाफाळता चहा एकटी निवांत बसून पिणार. मग ती पाचच मिनिटं लवकर उठली. चहा टाकला, कप घेऊन तिच्या आवडत्या झुलत्या खुर्चीत बसली पक्ष्यांची चिवचिव ऐकत. तो चवीने प्याली आणि मग कामाला लागली. त्या उत्साहात कामं पटापट आवरली आणि मस्त मूडमध्ये ती ऑफिसला गेली.

फक्त पाच मिनिटं काढण्यासाठी इतका निर्धार करावा लागणं किती वाईट आहे ना? अर्थातच अनेक पुरुषही असे असतीलच की ज्यांना चहा पिण्यासाठी/पेपर वाचण्यासाठी असा निवांतपणा मुश्किलीनेच मिळत असेल. तो हवा तर घरातल्या सर्व सदस्यांच्या नाष्ट्याच्या, औषधाच्या, अंघोळीच्या, जेवणाच्या, क्लासच्या, शाळा-कॉलेजच्या वेळांनुसार कामं आटोपण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे हे खरं. आपली प्रकृती, मानसिक आणि शारीरिक दोन्ही, उत्तम तर कुटुंबीयांची प्रकृती उत्तम राखणं शक्य आहे, हे लक्षात ठेवून असा पाच-दहा मिनिटांचा निवांतपणा दिवसातून तीन-चार वेळा तरी काढायला हवा. काढणार ना तसा?