आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीष्मझळा! (अर्धे आकाश)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारपासून अधिकृतरीत्या ग्रीष्म ऋतू सुरू होतोय. वैशाख आणि ज्येष्ठ महिने ग्रीष्म ऋतूचे, कडकडीत उन्हाळ्याचे. म्हणजे दिनदर्शिकेवर तरी नक्कीच. प्रत्यक्ष आजूबाजूला इतकी गोंधळवून टाकणारी चिन्हं दिसताहेत ना. एकीकडे खास उन्हाळ्यातली फुलं, म्हणजे मोगरा, सोनमोहोर, बहावा, पलाश, फुललीत चहू बाजूंना. गुलमोहोराला बहर येऊ घातलाय. आंब्याच्या झाडांवरच्या कैऱ्या खाण्याजोग्या झाल्यात. पाण्याची टंचाई हळूहळू जाणवू लागलीय, पाणी यायचे दिवस कमी झालेत. घरोघरी कूलर, वाळ्याचे पडदे, माठ वापरात आलेत. पारा अनेक ठिकाणी चाळीसच्या वर गेलायदेखील. घरोघरीच्या आयाबाया पापड, सांडगे, वड्या, कुरडया, अशा वाळवणांच्या मागे लागल्यात. पोरासोरांनाही परीक्षा संपून सुट्या लागल्यात.

अन दुसरीकडे? दुसरीकडे पाऊस, गारा, ढगाळ हवामान, धुळीची वादळं, सोसाट्याचा वारा असं अगदी अनपेक्षित वातावरण सगळीकडे दिसतंय. एप्रिल सुरू आहे की जून, अशा घोळ मनात होतोय सगळ्यांच्याच. त्यात परवाच बातमी आलीय की, अल निनो या सामुद्री प्रवाहांचे दुष्परिणाम यंदा भारतात कमी पावसाच्या रूपात भोगावे लागण्याची शक्यता आहे. म्हणजे कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागणार आहे, असं दिसतंय. जिथे पाऊस सरासरीएवढा वा अधिक पडला तरी सहा महिन्यांतच नद्या अाटलेल्या असतात, नळाला पाणी कमी होतं, त्या आपल्या प्रदेशात मुळात पाऊसच कमी झाला तर काय होतं, हे आपण आजकाल अधिक तीव्रतेने भोगतोय.
एक चिनी म्हण आहे, आपल्याजवळ एक रुपया असेल तर त्यातले ५० पैसे भाकरीवर खर्च करा नि ५० पैशांचं एक फूल घ्या. आयुष्यात अन्नाइतकंच महत्त्व सौंदर्य आणि कलेला आहे, हेच यातून सांगायचं आहे. मुद्दा हा की, आपण पर्यावरण जपत मोठे झालो, विकास करताना पर्यावरणाचंही भान ठेवलं, तरच पुढच्या पिढ्यांना भाकरीसोबत विकत घ्यायला फुलं दिसतील. चित्रांमधनं ती पाहता येतील, पण त्यांचा सुगंध, पाकळ्यांचा नाजूक स्पर्श नाही कळणार त्यांना.
म्हणूनच, पाणी जपून वापरा, झाडं लावा, ती जपा. तरच ग्रीष्मझळांचा संदर्भ लागेल येणाऱ्या पिढीला.

mrinmayee.r@dbcorp.in