आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्फ्युजलेले दिवस (अर्धे आकाश)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरणपोळ्या झाल्या असतील ना करून, किमान पुरण तरी शिजलंच असेल घरोघरी. आज पौर्णिमा लागतेय, उद्या संध्याकाळी साडेपाचला संपणारही आहे. म्हणजे रात्री होळ्या पेटतील जागोजागी तेव्हा पौर्णिमा संपलेली असेल. हे एक कन्फ्युजन.

गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असा भलामोठा सप्ताहांत. म्हणजे मजेचे दिवस. पण परीक्षाही सुरू होतायत लगेच, काही जणांच्या सुरूही आहेत, मग दुसरं कन्फ्युजन. अभ्यास करायचा, की मजा?

एकीकडे दुष्काळ स्पष्ट दिसतोय, पाण्यासाठी गावोगाव वणवण सुरू आहे. दुसरीकडे होळी/धुळवड/रंगपंचमी आहे म्हणून थोडे तरी रंग खेळावे, पाण्यात भिजावं, असं वाटतंय. मग करायचं काय नि कसं, हे तिसरं कन्फ्युजन.

शनिवारी शिवजयंती. तिथीनुसार. मागच्या महिन्यात झाली ती तारखेनुसार. कोणती साजरी करायची, हे चौथं कन्फ्युजन.

परीक्षा संपतील आणि सुट्या लागतील. सुटीत काय काय करायचं, हा पोरांना पडलेला प्रश्न; तर सुटीत पोरांना कसं सांभाळायचं, हा आईबापाला पडलेला. हे पाचवं कन्फ्युजन.

अशा या गोंधळाच्या वातावरणातच उन्हाळ्याचं अधिकृत आणि औपचारिक आगमन झालेलं आहे. तरीही कुठेकुठे पाऊस पडतोय, गार वारं सुटतंय मधूनच, रात्री पांघरूण घ्यावं लागतंय. हेही कन्फ्युजल्याचंच लक्षण.

खेरीज आपल्या आपल्या वैयक्तिक आयुष्यातले गोंधळ वेगळेच. ते आपल्यालाच निस्तरावे लागतात. हे बाकीचे गोंधळ बाहेरचे, त्यात आपण फार काही करू शकत नाही. खूप उकडत असताना, झळांनी असह्य होत असताना डोकं शांत ठेवून कोणताही निर्णय घेणं सोपं नसतं, पण ते करावं लागतं. या दिवसांत चिडचिड फार होते, सगळ्यांचीच. त्यामुळे सर्वांनीच सावरायला हवं, स्वत:ला आणि आजूबाजूच्या आपल्या लाडक्या व्यक्तींना. मधुरिमाच्या मैत्रिणींवर तर ही फार मोठीच जबाबदारी, डोकं शांत ठेवायची. एक करू शकतो आपण. सकाळी उठून घराबाहेर झाडांवर नजर टाकायची. हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा नजरेत साठवून ठेवायच्या. पाखरांचे निरनिराळे आवाज रेकाॅर्ड करून ठेवायचे मनात. माॅर्निंग वाॅकच्या वेळेस नाकात घुसलेले सर्व गंध जपून ठेवायचे. आणि येत्या दिवसाला प्रसन्नपणे सामोरं जायचं. कन्फ्युजलेला दिवस असो किंवा सरळसोट, तो मस्तच असणार. बरोबर ना?

mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...