आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial By Mrinmayee Ranade In Madhurima About Loneliness

एकटेपणाचं काय कराल?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरा नोकरीसाठी बाहेरगावी/परदेशात अाहे, अशा अनेक स्त्रिया आपल्या आजूबाजूला असतात. कदाचित तुमचाच नवरा असा लांब राहात असेल. मुलं सोबत असतीलही कदाचित. तुम्ही स्वत:ला एकटं समजता का? नवरा नाही, म्हणून तुमचं अडतं का? कोणत्या गोष्टी अशा आहेत, ज्या तुम्हाला एकटीला करणं जड जातं? कोणती कामं अशी आहेत, जी तुम्ही यापूर्वी कधीच केली नव्हती आणि आता केल्याशिवाय गत्यंतर नाही?
की, आता तुम्ही तुम्हाला हवं तसं जगायला शिकला आहात?
आता तुम्हाला हवं तसं जगू शकताय?
आतापर्यंत कधीच नव्हत्या एवढ्या मोठ्या संख्येने सध्या एकट्या महिला आसपास आहेत. विविध कारणांमुळे त्या एकट्या आहेत. वर उल्लेखलेलं एक कारण आहेच. अशा घराबाहेर राहून नोकरी करणाऱ्या पुरुषांची संख्या जशी वाढती आहे, तशीच अविवाहित, वा घटस्फोटित अशाही एकट्या महिलांची संख्या वाढते आहे. यातून काय समस्या निर्माण होतात, ही वेगळी बाब. परंतु, आपण असं एकटं राहताना स्वत:बद्दल काय विचार करतो आपण? सहानुभूतीची अपेक्षा करतो का दुसऱ्याकडून? की एकटं राहण्यातला आनंद घेऊ शकतो?
एकटं राहण्यातही आनंद असतो?
का नसावा? चित्रपट/नाटक पाहणं, भटकणं, आवडतं जेवण, संगीत ऐकणं, पुस्तक वाचणं या गोष्टी एकट्याने केल्याने त्यातला आनंद कमी होत नाही, कदाचित वाढतोच. बँकेची कामं, तांत्रिक म्हणजे टीव्ही/संगणक/मोबाइल यांसारख्या उपकरणांच्या अडचणी, मुलांचे प्रश्न सोडवणं, यांसारख्या अनेक गोष्टी नवराच सांभाळत असेल म्हणून त्या आपल्याला येतच नाहीत, जमणारच नाहीत, असं तुम्हाला सुरुवातीला वाटत असेल; पण काही काळानंतर त्या सहजी जमतात, हेही लक्षात आलं असेल. कधीच न केलेलं काहीतरी आपल्याला जमतंय, यातला आनंद आता तुम्हाला कळला असेल. आपल्याकडे, एकूण भारतातच मुलींना एकटं राहण्यासाठी आपण कधी तयारच नाही केलेलं. इतक्या वर्षांत कदाचित तशी वेळही फार महिलांवर नसेल आलेली. पण आता कमी वयापासून मुली एकट्या राहू लागल्या आहेत, बाय चाॅइस. त्यांना या एकटेपणाचा बाऊ न वाटता, त्यातली मजा कशी घेता येईल, ते शिकवायला हवं ना? शेवटी माणूस एकटाच असतो, सोबत कोणाला नेता येत नाही, असंही आपण शिकवतोच ना मुलांना?

(तुम्ही कदाचित असे बायको-मुलांपासून दूर एकटे राहात असाल. तर तुम्हालाही एकटं राहायला आवडतं का, की एकट्या पुरुषालाही जिणं कठीणच वाटतं?)

तुमचे अनुभव सांगणार ना आम्हाला?

mrinmayee.r@dbcorp.in