आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडद्यावरच्या चेहऱ्यामागचं माणूस (अर्धे आकाश)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज पाचव्या वर्षात पाऊल टाकताना मस्त वाटतंय आम्हा सर्वांना. २९ मे २०११ रोजी औरंगाबादला दैनिक दिव्य मराठीची पहिली आवृत्ती सुरू झाली आणि तीन जून रोजी मधुरिमाचा पहिला अंक वाचकांच्या हातात आला. या चार वर्षांत आपण जवळपास दोनशे वेळा भेटलोय, असं गणित सांगतंय. दोनशे हा आकडा फार मोठा, वाचक लेखकांच्या दृष्टीने तर नक्कीच. इतक्या वेळा, इतक्या नियमितपणे आपण मित्रमैत्रिणींनाही भेटत नाही, म्हणजे प्रत्यक्ष हं. पण या चार वर्षांत शुक्रवारी तुमच्या भेटीला यायचं मधुरिमाला साताठ वेळाच जमलं नसावं, तेही अगदी अपरिहार्य कारण होतं म्हणूनच. म्हणजे आपलं नातं एकदम स्पेशल आहे, असं म्हणायला हरकत नसावी.
दरवर्षी वर्षपूर्ती अंक काही तरी वेगळा देण्याचा आमचा प्रयत्न असतो. या वर्षी आमच्याच क्षेत्रातल्या, म्हणजे पत्रकािरतेतल्या, काही विशेष मैत्रिणींची ओळख करून देतोय. या आहेत टीव्हीवरून दररोज आपल्याला जगभराच्या घडामोडींबद्दल सांगणाऱ्या न्यूज चॅनल्सवरच्या अँकर वा रिपोर्टर; उमा कदम आहे मुंबईतील अनुभवी फोटोग्राफर. टीव्हीवरची नोकरी म्हणजे अमिताभ बच्चनला किंवा सचिन तेंडुलकरला प्रत्यक्ष भेटायची/पाहायची संधी एवढं सोपं गणित नसतं. एखादं महत्त्वाचं दृश्य टिपण्यासाठी, मुलाखत घेण्यासाठी टीव्ही रिपोर्टर, कॅमेरामन अनेक तास वाट पाहत बसलेले असतात, हे प्रेक्षकाला ठाऊक नसतं.

म्हणूनच, या मुलींचा संघर्ष, आव्हान स्वीकारण्याची धडाडी, अडचणींवर मात करून पुढे जाण्याची जिगर या सगळ्याला सलाम करणारा हा अंक. पत्रकारिता या व्यवसायाचं आकर्षण असणाऱ्या अामच्या युवा मित्रमैत्रिणींना तो रुचेलच, परंतु इतर वाचकांनाही या रोज दिसणाऱ्या चेहऱ्यामागचा माणूस वाचायला आवडेल याची खात्री आहे. आपण आपलं रोजचं आयुष्य कितीही सोपं असलं तरी तक्रारखोर तर नाही ना झालेलो, असा प्रश्न या माणसांना वाचून पडू शकेल कदाचित. किंवा टीव्हीवर काही अयोग्य, चुकीचं दिसलं तर टीका करायला तोंड उघडण्यापूर्वी क्षणभर विचार करायला भाग पडण्याचीही शक्यता आहे.

तुम्हा वाचक मित्रमैत्रिणींची अत्यंत अमूल्य साथ या चार वर्षांत जशी मिळाली, तशीच पुढेही मिळो. तुमचं बोट धरूनच पुढचा प्रवास करायचाय. तुमच्या सोबतीचं, प्रेमाचं, विश्वासाचं ऋण कधीही न फिटण्याजोगं आहे, याची नम्र जाणीव आहे. मधुरिमा टीमतर्फे सर्वांचे आभार.

mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...